इंग्‍लिश खाडी: इंग्‍लंडचा दक्षिण किनारा व फ्रान्सचा उत्तर किनारा यांमधील अटलांटिकचा भाग. डोव्हरच्या सामुद्रधुनीने ही खाडी उत्तर समुद्राला जोडली गेली आहे. पश्चिमेस इंग्‍लंडच्या नैर्ऋत्येकडील सिली बेटे व फ्रान्सच्या किनाऱ्यावरील पश्चिमतम बेट अशंत यांमध्ये तिची रुंदी सु. १८० किमी. आणि इंग्‍लंडच्या आग्नेयीकडील डोव्हर व फ्रान्सच्या वायव्येकडील कॅले यांमधील डोव्हर सामुद्रधुनीची रुंदी सु. ३४ किमी. असून

खाडीचा पूर्वपश्चिम विस्तार सु. ५६० किमी. आहे. ही पश्चिमेकडून पूर्वेकडे अरुंद होत जाते. वाइट बेटाजवळ ती मध्येच अरुंद झाली आहे. वाइट बेट व चॅनेल बेटे ही या खाडीतील बेटे होत. फ्रान्सच्या किनाऱ्यावरील सँ मालोचे आखात व इंग्‍लंडच्या किनाऱ्यावर लाइम वे यांच्या दरम्यान खाडीची रुंदी जास्तीत जास्त सु. २४० किमी. आहे. हिच्या तळाशी वायव्य यूरोपची समुद्रबूड जमीन आहे. डोव्हरजवळ तिची खोली फक्त सु. ४० मी. असून लँड्स एंडजवळ सु. १०५ मी. आहे. जास्तीत जास्त खोली सु. १७२ मी. आढळली आहे. डोव्हर सामुद्रधुनीत काही लांबट वाळूचे बांध तयार झाले आहेत. वाइट बेटाजवळ खाडीत खडूचे तुटक डोंगर आहेत. हिमयुगानंतर समुद्राची पातळी वाढून ब्रिटिश बेटेमुख्य खंडभूमीपासून डोव्हर सामुद्रधुनीने अलग झाली व खाडीच्या किनाऱ्यावर अनेक नैसर्गिक चांगली बंदरे तयार झाली. अटलांटिकचे पाणी या खाडीमार्गे सतत उत्तर समुद्रात जात असते. खाडीच्या तळावर जाड बारीक वाळू व लहानमोठे दगडधोंडे आहेत. बारीक माती व चिखल फारसा कोठे नाही. वाइट बेटाजवळ भरतीओहोटीमधील फरक सर्वांत कमी असतो. त्याच्या पश्चिमेस भरती वाढत असते, तेव्हा पूर्वेस ती कमी होत असते. सँ मालोच्या आखातात भरती ओहोटीचा फरक सर्वांत जास्त सु. ९ मी. असतो. खाडीत ठिकठिकाणी दीपस्तंभाच्या व नौकानयनास मदत करण्याच्या सोयी आहेत. हिवाळ्यात खाडीच्या पाण्याचे तपमान सु. ७ से. असते.उन्हाळ्यात ते सु. १६ से. होते. खुल्या अटलांटिकच्या मानाने खाडीची क्षारता कमी आहे व ती किनाऱ्याजवळ हजारी सु. ३४·८ आहे. खाडीत कॉड, हेरिंग, हेक, पिल्चर्ड, मुलेट इ. मासे पकडण्याचा मोठा उद्योग चालतो. इतिहासपूर्व काळापासून यूरोपच्या मुख्य भूमीवरून ही खाडी ओलांडून इंग्‍लंडमध्ये आक्रमक व व्यापारी जात असत. त्यामुळे दोन्ही कडील किनाऱ्यांवर बंदरांची वाढ झालेली आहे. फोक्स्टन ते बूलोन, डोव्हर ते कॅले, डंकर्क ते ऑस्टेंट, साउथॅम्प्टन ते सँ मालो, शेअरबुर्ग ते ल हाव्र आणि न्यू हेवन ते डिएप अशी सागरी वाहतूक नेहमी चालू असते. खाडीखालून बोगदा खणून फ्रान्स व इंग्‍लंड यांमध्ये थेट सडकेने किंवा रेल्वेने वाहतूक सुरू करण्याची योजना दीर्घकालपर्यंत विचाराधीन आहे. ब्‍लँचर्ड व जेफ्रिझ यांनी १७८५ मध्ये ही खाडी बलूनमधून ओलांडली, मॅथ्यू वेबने १८७५ मध्ये ती पोहून पार केली, त्यानंतर अनेकांनी ती पोहून ओलांडली त्यांत काही स्त्रियाही होत्या. मिहिर सेन व नीतीद्र नारायण रॉय हे इंग्लिश खाडी पोहून पार करणारे भारतीय होते. बांगला देशचा ब्रोजन दास याने ती सहा वेळा पार केली. ब्‍लेर्योने १९०९ मध्ये ती विमानातून ओलांडली. १९५९ मध्ये ब्रिटिश हॉवरक्राफ्ट ही खाडी ओलांडून गेले.

कुमठेकर, ज. ब.