काटेरी इंद्रायण

इंद्रायण, काटेरी : (काटेरी इंद्रावणी; गु. काटांळा इंद्रावणां; इं. स्क्‍विर्टिंग कुकंबर; लॅ. एक्‌बॅलियम इलॅटेरियम; कुल-कुकर्बिटेसी). ही विचित्र बहुवर्षायू (पुष्कळ वर्षे जगणारी) व सरपटणारी ओषधीय वेल [→ओषधि] मूळची मध्य व पूर्व भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील असून तिच्या तडकणाऱ्या फळांकरिता ब्रिटन, अमेरिका व द. यूरोप येथील बागांत वाढविली जाते. काटेरी इंद्रायण या नावाने भारतीय बाजारात तिची कोवळी, सुकी फळे मिळतात. काकडी, कडू इंद्रायण व कलिंगड यांसारख्यांची काही लक्षणे या वनस्पतीत आढळतात [→ कुकर्बिटेसी]. खोड प्रसर्पी (रांगते), केसाळ; पाने हृदयाकृती, थोडीफार त्रिखंडी; प्रताने नसतात; फुले पिवळी; पुं-पुष्पे मंजरीवर, स्त्री-पुष्पे त्याजवळच बहुधा पानांच्या बगलेत; संदले सुटी व पाच [→ फूल]; मृदुफळ काटेरी, लंबगोल; ते पिकल्यावर लहानशा धक्क्यानेही टोकास तडकते व तेथे पडलेल्या छिद्रांतून आतील कडूशार रस बियांसकट जोराने बाहेर (पिचकारीप्रमाणे) फेकला जातो त्यावरून इंग्रजी नाव पडले आहे. या फळातील मगजापासून (गरापासून) फार पूर्वीपासून तीव्र विरेचक बनविण्यात येते (ट्रिटुरॅशिओ इलॅटेरिनी) इलॅटेरियम हे औषध या फळापासूनच बनवितात. फळ मादक असून हिवतापावर व पिसाळलेले कुत्रे चावल्यावर पोटात घेण्यास वापरतात. जलोदर व मूत्रपिंड-विकृती यांवर पाण्याचा निचरा होण्यास हे जहाल विरेचक म्हणून देतात.

 

परांडेकर, शं. आ.