इंद्र, तिसरा : (सु. ८७९–? डिसेंबर ९२७). महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील एक राजा. दुसऱ्या कृष्णाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा त्याच्या अगोदरच मेल्यामुळे, त्याचा नातू तिसरा इंद्र ९१५ ते ९२७ पर्यंत राष्ट्रकूटांच्या मान्यखेट येथील गादीवर होता. राज्याची सूत्रे हातात येताच इंद्राने उत्तर हिंदुस्थानवर स्वारी केली. त्यात त्याने प्रतीहार महीपालाचा पराभव केला आणि त्याची कनौज ही राजधानी उद्ध्वस्त केली. परंतु त्याने तो भाग कायमचा आपल्या ताब्यात घेतला नाही. इंद्राने वेंगीच्या चालुक्यांचाही पराभव केला. त्याने पाचवा विजयादित्य याला मारले परंतु त्याचे राज्य त्यास नामशेष करता आले नाही. काहींच्या मते ही घटना इंद्राचा पुत्र चौथा गोविंद याच्या कारकीर्दीत घडली असावी.
इंद्र हा शूर व कुशल सेनापती होता. त्याची उत्तर भारतातील स्वारी इतिहासात संस्मरणीय ठरली. परंतु त्याने कायम स्वरूपाची कोणतीही विधायक योजना अंमलात आणली नाही किंवा फारसा राज्यविस्तारही केला नाही. त्याचे श्रीविजयसारखे सेनापती पराक्रमी होते. त्यांनीही इंद्राच्या अनुपस्थितीत दक्षिणेकडील काही शत्रूंना खडे चारले. त्याची राज्यव्यवस्था पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीवर होती. त्यात कोणताही आमूलाग्र बदल त्याने केला नाही.
पहा : राष्ट्रकूट घराणे.
संदर्भ : 1. Altekar, A. S., Rashtrakutas and Their Times, Poona, 1967.
देशपांडे, सु. र.