ऑक्लंड : न्यूझीलंडमधील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या १,५१,५८८ (१९७१). न्यूझीलंड बेटसमूहातील उत्तरेकडील बेटावर १८४१ मध्ये हे वसविण्यात आले. १८६५ पर्यंत ही न्यूझीलंडची राजधानी होती. देशातील सर्वांत उत्तम नैसर्गिक बंदर असल्याने येथील प्रमुख व्यवसाय जहाजबांधणीचा आहे. देशातील दुग्धपदार्थ, अंडी, मांस, फळे इ. येथे डबाबंद करून किंवा शीतगृही जहाजावरून परदेशांत पाठविले जातात. याशिवाय येथून लोकर, हाडे व लाकडे यांचीही मोठी निर्यात होते. शहरात साखर–शुद्धीकरण, अन्न–प्रक्रिया, कापड, खते, यंत्रसामग्री, कातडी सामान, धातुकाम, औषधे इ. उद्योग असून शहराची बांधणी आखीव आहे. उद्याने, कलावीथी, ऑक्लंड विद्यापीठ, अँग्लिकन व कॅथलिक कॅथीड्रल, माओरी लोकांच्या कलेचे संग्रहालय असलेले युद्धस्मारक या प्रेक्षणीय वास्तू असल्या, तरी शहराची ख्याती प्रामुख्याने आसमंतात असणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी आहे.
दिवाकर, प्र. वि.