इंका : दक्षिण अमेरिकेचा वायव्य किनारा व त्याच्या आसपासचा भाग यातील एक जूनी संस्कृती. १२०० ते १६०० या दरम्यानच्या काळात ती भरभराटीस आली. इंकांच्या साम्राज्यात पेरू, एक्वादोर, अर्जेंटिना, बोलिव्हिया व चिलीचा काही भाग एवढा प्रदेश समाविष्ट होता. त्याचा विस्तार ९,८४,२०० चौ. किमी. होता आणि लोकसंख्या सु. ऐंशी लक्षांच्या आसपास असावी.
इंका ह्या शब्दाचा अर्थ ‘राजा उर्फ राज्यकर्त्या कुटुंबाचा अधिपती’ असा होतो. येथील लोकांनाही याच नावाने संबोधण्यात येऊ लागले. ही जमात साधारणतः बाराव्या शतकात पेरुमध्ये अस्तित्वात होती, ती पुढे तेराव्या-चौदाव्या शतकांत प्रबळ होऊन तिने आपले साम्राज्य उभारले. इंकांविषयीची माहिती प्रामुख्याने स्पॅनिश लोकांनी लिहिलेल्या बखरींवरून, तसेच रूढी व परंपरा ह्यांवरून मिळते. तथापि या बखरी स्पॅनिश लोकांनी दक्षिण अमेरिका पादाक्रांत केल्यानंतरच्या आहेत. अलीकडे थोडा फार पुरातत्त्वीय पुरावाही उपलब्ध झाला आहे.
मध्ययुगापूर्वीही ह्या प्रदेशात मानवी वस्ती होती आणि तीतील पाराकास, मोचे, चीमू, त्यावानाको व वारी हे समाज, तसेच आयमारांचे राज्य, इंकांपूर्वी सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत अवस्थेत होते. १२०० च्या सुमारास तितिकाका या सरोवरा नजीकच्या प्रदेशातून इंकांचा संस्थापक मांको कापाक आपल्या बहिणीबरोबर पेरु देशात आला आणि त्याने आपल्या बहिणीबरोबर विवाह करुन या साम्राज्याची स्थापना केली, अशी दंतकथा प्रचलित आहे. त्याच्यानंतर ह्या साम्राज्यात एकूण बारा सम्राट झाले. त्यांपैकी पहिल्या सात सम्राटांविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत मात्र विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. इंकांचा खरा विस्तार व भरभराट १४३८ ते १४९३ या काळात वीराकोचा इंका व त्याचा मुलगा पाचाकुटी इंका युपान्क्वी या दोन सम्राटांच्या कारकीर्दीत झाली. त्यानंतर १५३२ मध्ये स्पॅनिश खलाशी फ्रांथीस्को पिझारो इथे आला, त्यावेळी इंकांचा शेवटचा सम्राट अतावाल्पा हा राज्य करीत होता. त्याच्याबरोबर स्पॅनिशांचे युद्ध झाले आणि त्यात अतावाल्पाचा खून होऊन इंकांचे साम्राज्य संपुष्टात आले. १५६९ साली इंकांनी पुन्हा एकदा स्पॅनिश लोकांविरुद्ध लढा पुकारला, पण त्यातही त्यांचा पराभव झाला.
इंकांची राज्यपद्धती राजेशाही तत्त्वांवर आधारित होती. येथील राजा किंवा इंका हा सर्वश्रेष्ठ असे आणि तो स्वतःस सूर्यदेवतेचा वंशज समजत असे. राजाचा शब्द हाच कायदा व अखेरचा न्याय असे परंतु त्यास रुढी व चालीरीतींचे बंधन होते. राज्याची विभागणी प्रांतांत व इतर लहान विभागात केलेली असून राजाचे नातेवाईक हेच बहुतांशी राज्यपाल किंवा प्रांताधिपती म्हणून काम पहात. काही नवीन जिंकलेल्या प्रदेशांवरही त्यांचीच उच्चाधिकारपदावर नेमणूक होई. राज्यपालांच्या मदतीला क्युराका नावाचे दुय्यम अधिकारी असून त्यांच्या हाताखाली इतर अधिकारी व नोकरवर्ग असे. अशा रीतीने अधिकारतंत्रपद्धती अस्तित्वात होती. बहुतेक सम्राटांनी आपल्या सख्या बहिणींशी विवाह केले. सर्वसाधारणतः एक प्रांत ४०,००० कुटुंबाचा असे.
इंकांचा प्रमुख व्यवसाय शेती होता तथापि इंकांचे वास्तव्य असणारा अँडियन प्रदेश डोंगराळ असल्यामुळे त्यांस शेतीकरता फार कष्ट करावे लागत. इंकांनी डोंगर फोडून, कडे कापून सोपानशेती केली होती. शेतीकरिता जलसिंचनाची खास सरकारी व्यवस्था असे. नांगरणी टोकदार काठ्यांच्या साहाय्याने करण्यात येई. शेतीपासून मका, बटाटे, टोमॅटो, भुईमूग, मिरी, मॉनिॲक, कोका (कोकेन करण्याकरिता), कापूस इ. पिके काढीत. लामा व अल्पाका ह्या प्राण्यांचा उपयोग मुख्यत्वे ओझी वाहण्यासाठी करीत. क्वचित त्यांचा खाण्यांसाठीही उपयोग करीत. तर व्हिक्युना ह्या प्राण्यांची लोकर गरम कपडे तयार करण्यासाठी वापरीत. दुष्काळात धान्याचा तुटवडा पडू नये म्हणून धान्याची सार्वजनिक कोठारे असत. शेतीमधून निघणारे धान्य राजा, प्रजा व धार्मिक संस्था ह्या तिघांत विभागले जाई. कोणीही उपाशी राहणार नाही, याची दक्षता घेतली जाई. सर्वांनी काम केलेच पाहिजे, असा दंडक होता. मात्र अपंग व वृद्ध यांची त्यात गणना होत नसे व सरकार त्यांची व्यवस्था करी. राज्यात तयार होणाऱ्या मालावर कर आकारत. परंतु कोणाही व्यक्तीवर प्रत्यक्ष कर नसे. मजुरीच्या रुपाने कर वसूल करीत. सैन्य हंगामी व कायम अशा दोन्ही स्वरुपाचे होते. हंगामी सैन्यात शेतमजूर व कामगार फावल्या वेळेत भरती होत. हंगामी नोकरीस मिटा म्हणत. मात्र ह्या नोकरीतून तरुण मुले व सुंदर तरुण मुली ह्यांना वगळत. तरुण मुले राजाच्या कायम स्वरुपाच्या नोकरीत घेतली जात, तर सुंदर तरुण कुमारिका राजवाड्यात आवश्यक ते शिक्षण घेऊन विणकाम करीत, राजवाड्याची वा मंदिराची देखभाल करीत किंवा पुरोहितांच्या वा सरदारांच्या रखेल्या म्हणून वावरत. त्यांपैकी काही त्यांच्याशी विवाहबद्ध होत. साम्राज्यातील सर्व मालमत्ता – देऊळे, राजवाडे, किल्ले, जमीन, लामा इ. – राजाच्या मालकीची असे. खासगी मालकी अस्तित्वात नव्हती. सर्व जमीन कसण्यासाठी कुटुंबाच्या आकारमानानुसार विभागली जाई. कुटुंब मोठे असावे, ह्याचीही दक्षता घेतली जाई.
इंकांचा समाज राज्यकर्ते, सरदार व सामान्य लोक अशा तीन गटांत विभागला गेला होता. सर्वांना शिक्षणाची सोय नव्हती. परंतु तरुण मुलेमुली, सैनिक व सरदार ह्यांना आवश्यक ते शिक्षण देत. अधिकाऱ्यांना कूस्को या राजधानीत इतिहास, धर्म, युद्धशास्त्र ह्यांचे शिक्षण दिले जाई, तर तरुणतरुणींना चालीरीती, शिष्टाचार व विणकाम ह्यांचे धडे दिले जात. सर्व इंका केचूअन भाषा बोलत मात्र इंकांना लेखनकला अवगत नव्हती. ते दोरीला गाठी मारुन त्यांवरुन हिशोब करीत व त्या जतन करीत. ह्या पद्धतीस किपू म्हणत.
इंकांच्या धर्मात वीराकोचा ह्या देवतेस श्रेष्ठ स्थान होते तथापि सूर्यदेवास सर्वत्र अधिक मान दिला जाई. चंद्र, तारे, हवा, पृथ्वी, विद्युत् आदींना दुय्यम देव मानण्यात येई. ते सूर्योपासक होते. इंकांत सूर्यदेव हा आपला पूर्वज आहे. अशी समजूत रूढ असावी. चांगले पीक येण्यासाठी, रोगराई नष्ट होण्याकरिता किंवा भविष्यकाल उज्ज्वल व्हावा म्हणून धार्मिक विधी वा सण पाळले जात. देवाला बळी देण्याचीही प्रथा होती. पूर्वजांची पूजा करणे हा त्यांच्या धार्मिक रीतिरिवाजातील एक महत्त्वाचा भाग होता. मृतांच्या शरीरांचे जतन करून ती वारंवार दर्शनाकरिता वा पूजेकरिता बाहेर काढली जात.
पेरू व त्याच्या आसपासच्या भागांत अवशिष्ट असणारी घरे, किल्ले, राजवाडे, मंदिरे, रस्ते वगैरेंवरुन इंकांनी वास्तुकलेत अनन्यसाधारण प्रगती केली होती, असे दिसते. इंकांच्या नगरांमधून केलेली जलनिकास पद्धती, अँडियन प्रदेशातील सोपानशेती व जलसिंचन योजना अभिनव होत्या. इंकांना लेखनकला अवगत नव्हती, तरीसुद्धा त्यांनी मोठमोठ्या इमारतींचे आलेख तयार केले त्यांच्या प्रतिकृती बनविल्या आणि ब्राँझ व दगडांच्या हत्यारांनी मोठमोठी मंदिरे, राजवाडे, किल्ले आदी वास्तू बांधल्या. उदा., तितिकाका सरोवराजवळील उन्हाळी राजवाडा, द पिरॅमिड ऑफ द मून, वीराकोचाचे भव्य मंदिर, साक्सावामान किल्ला. सर्वत्र मुख्यत्वे दगडांचाच उपयोग केलेला आहे. काही ठिकाणी कच्च्या किंवा भाजलेल्या विटांचा उपयोग केलेला आढळतो. साक्सावामान किल्ल्याच्या भिंतींची लांबी ५२२ मी. असून
किल्ल्याच्या बांधकामात काही ठिकाणी सहा मी. उंचीच्या शिळा बसविलेल्या आहेत. इंकांच्या स्थापत्य अभियांत्रिकीमधील सर्वांत विलक्षण गोष्ट जर कोणती असेल, तर ती म्हणजे त्यांच्या साम्राज्यातील रस्त्यांचे जाळे. कूस्को ह्या राजधानीशी दूरदूरचे प्रदेश हमरस्त्यांनी जोडलेले होते. त्यांपैकी समुद्रकिनाऱ्याने गेलेला एक रस्ता ४,८०० किमी. लांबीचा, ७|| मी. रुंदीचा, ठिकठिकाणी दगडी व झुलत्या पुलांनी जोडलेला होता. ह्याच रस्त्यावर विशिष्ट अंतर दर्शविणारे दगडही पुरलेले आढळतात शिवाय ठिकठिकाणी चौक्याही उभारल्या होत्या. इंकांनी कूस्को, माचू-पिक्चू इ. सुंदर नगरे वसविली. इंकांची बहुतेक घरे एकमजली होती. सर्व वास्तुकामात त्यांनी चुना किंवा तत्सम द्रव्याचा कुठेही उपयोग केलेला आढळत नाही मात्र प्रचंड शिळा वा दगड त्यांना मुद्दाम पाडलेल्या खाचांत अडकवून प्रासाद वा मंदिरे उभारण्यात आली होती. एकूण ह्या लोकांचे घरबांधणीचे कौशल्य व ज्ञान असाधारण होते.
वास्तुकलेप्रमाणेच इंकानी मृत्स्नाशिल्प, कापडउद्योग, धातुकाम आणि वैद्यकशास्त्र ह्यांतही खूपच प्रगती केलेली आढळून येते. इंकांची मृत्पात्रे रंगीत, चकचकीत आणि वैविध्यपूर्ण आहेत. त्यांचे आकार आणि रंग आकर्षक असून इतरत्र अशा प्रकारची मृत्पात्रे क्वचितच आढळली आहेत. मृत्पात्रांचे दोन प्रमुख प्रकार होते : काही मृत्पात्रे समारंभासाठी किंवा दफनविधीसाठी वापरीत तर काही खास घरगुती उपयोगासाठी केलेली असत. सर्व मृत्पात्रांवर रंगीत नक्षीकाम केलेले असे. मृत्पात्रांसाठी वापरलेली माती, त्यांची भाजणी, त्यांवर केलेले नक्षीकाम व त्यांचा टणकपणा इ. इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहेत, की इंकांची मृत्पात्रे इतरांहून वेगळी दिसतात. मृत्पात्रांवरील आकृत्यांत मानवी आकृत्याही आहेत, परंतु त्यांत वास्तवता नाही. काही मृत्पात्रांचे आकारच मानवी आकृत्यांसारखे घडविण्यात आलेले होते.
इंकांचे विणकामही अप्रतिम होते. तथापि सुती कापडाची निर्मिती फारशी नव्हती. मात्र व्हिक्युना ह्या रानटी प्राण्याच्या लोकरीपासून ते उत्तम तलम कापड विणीत. एकूण विणकामात कौशल्य आढळून येते.
धातुकामाच्या बाबतीत इंकांनी खूपच प्रगती केली होती. इंकांच्या साम्राज्यात अनेक खाणी होत्या. इंकांना ब्राँझ, तांबे, सोने, चांदी व कथिल हे धातू माहीत होते. ब्राँझ व तांबे सामान्य लोक वापरीत अथवा हे धातू सार्वजनिक उपयोगासाठी वापरण्यात येत. याउलट सोने, चांदी व कथिल ह्यांचा उपयोग राजे, सरदार व धर्मगुरू करीत. इंकांचे कारागीर धातू शुद्ध करणे, मिश्रधातू बनविणे, धातूंना विशिष्ट आकार देणे, धातूंवर कलाकुसर व रंगीत काम करणे, दोन धातू जोडणे, त्यांवर दुसऱ्या धातूचा थर चढविणे वगैरे गोष्टींत वाकबगार होते. वैद्यक आणि शस्त्रक्रिया या क्षेत्रांतही इंकांनी प्रगती केली होती. मानवी कवट्यांना ते भोके पाडीत, पण ती शस्त्रक्रियेसाठी की पाप, भूतबाधा आदी पिडा घालविण्यासाठी, हे निश्चित सांगता येत नाही.
स्पॅनिश लोकांनी हा प्रदेश जिंकला, तेव्हा त्यांनी अनेक वास्तूंची नासधूस केली परंतु पुढे त्यांना ह्या अमोल सांस्कृतिक ठेव्याची महती कळल्यावर त्यांनी त्याच्या जतनाचे अवघड काम हाती घेतले. १९५० व १९७० साली झालेल्या दोन जबरदस्त धरणीकंपांत इंका अवशेषांचे बरेच नुकसान झाले.
संदर्भ : 1. Baudin, L. Trans. Woods, Katherine, A Socialist Empire-The Incas of Peru, London, 1961.
2. Bradford, Winifred, Inca Adventure, London, 1956.
3. Hagen, V. W. V. The Ancient Sun Kingdoms of the Americas, London, 1962.
माटे, म. श्री.; देशपांडे, सु. र.