ऑलिंपिया – २ : ग्रीसमधील एक प्राचीन पवित्र स्थान. हे ग्रीसच्या दक्षिणेस ॲल्फीअस आणि क्लॅडेअस ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. इथे ऑलिंपिक क्रीडास्पर्धांना इ. स. पू. ७७६ मध्ये आरंभ झाला. झ्यूस ही येथील प्रमुख स्थलदेवता. या स्पर्धा तिच्या आराधनेचाच एक भाग होत. पाच दिवसांच्या ह्या स्पर्धांत तिसऱ्या दिवशी झ्यूससमोर बळी देण्यात येई. स्पर्धांचे पटांगण व प्रेक्षागृह यांचे अवशेष १९३६ साली सुरू केलेल्या उत्खननाद्वारे उघडकीस आले मात्र रथांच्या शर्यतीचे मैदान भूकंपाने नष्ट झाले. त्याचा मागमूसही उत्खननात लागला नाही. इ. स. पू. ६४० मध्ये हेरियम हे मंदिर बांधण्यात आले. ग्रीसमध्ये अवशिष्ट असणाऱ्या सर्व मंदिरांत हे प्राचीन असून त्यात प्रॅक्सीटेलीझ ह्याने घडविलेली हर्मीझची प्रसिद्ध मूर्ती सापडली. इ. स. पू. ४६८–४५६ च्या दरम्यान झ्यूसचे प्रसिद्ध मंदिर उभे करण्यात आले. हे धार्मिक विधींचे केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. पांढऱ्या संगमरवरी दगडांची ही वास्तू मूलतः डौलदार असून त्यावर चुनेगच्ची नक्षीकाम व कोरीव काम केलेले होते. याच्या त्रिकोणी चांदईवर संगमरवरी शिल्पपट्ट बसविण्यात आले होते. या मंदिरात अनेक मूर्ती व शिल्पे होती. त्यांतच मेंडे येथील पिओनोअसने घडविलेली ‘विंग्ड व्हिक्टरी’ची मूर्तीही होती. येथील वास्तूंची बरीच नासधूस सहाव्या शतकातील भूकंपात झाली. चौथ्या शतकात या क्रीडोत्सवावर बंदी घातली गेल्याने या स्थानाचे महत्त्व कमी झाले.

देव, शां. भा.