ऑर्डोव्हिसियन : भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. या विभागातल्या खडकांना ऑर्डोव्हिसियन संघ व ते तयार झाले त्या कालविभागाला ऑर्डोव्हिसियन कल्प म्हणतात. हा कल्प ४९ कोटी वर्षांपूर्वीपासून ते ४२ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत (७ कोटी वर्षे) होता. १८३१ च्या सुमारास ब्रिटनमधील वेल्स परगण्याच्या दोन निरनिराळ्या क्षेत्रांत ॲडम सेज्विक व रॉडरिक मर्चिसन हे ब्रिटिश वैज्ञानिक तेथल्या खडकांचे परीक्षण करीत होते. त्यांची कल्पना अशी की, त्या दोहोंतले खडक वेगवेगळ्या गटांचे आहेत. सेज्विक यांनी वेल्सच्या उत्तर सीमेजवळील खडकांचे अध्ययन करून त्यांना कँब्रियन असे नाव दिले. मर्चिसन यांनी मध्य वेल्समधील खडकांचे अध्ययन करून त्यांना सिल्युरियन असे नाव दिले. पुढे असे दिसून आले की, सेज्विक यांच्या कँब्रियन संघाच्या माथ्याकडचे थर व मर्चिसन यांच्या सिल्युरियन संघाच्या तळाकडचे थर सारख्याच प्रकारचे आहेत. त्या थरांना कँब्रियनाच्या माथ्याचा गट म्हणावे का सिल्युरियनाच्या तळाचा गट म्हणावे याविषयी साहजिकच वाद निर्माण झाला. तो मिटविण्यासाठी त्या थरांचा ऑर्डोव्हिसियन नावाचा एक वेगळाच गट करावा, असे चार्ल्स लॅपवर्थ या ब्रिटिश वैज्ञानिकांनी १८७९ मध्ये सुचविले. रोमन लोक येण्यापूर्वी वेल्समध्ये राहणाऱ्याआदिवासी लोकांच्या नावावरून हे नाव दिलेले आहे. ब्रिटनमधील बहुतेक वैज्ञानिक हे कँब्रियन संघातील ट्रेमॅडॉक थरांचा माथा व सिल्युरियन संघातील लँडोव्हेरी थरांचा तळ या दोहोंच्या मधे असणाऱ्याथरांचा समावेश ऑर्डोव्हिसियन संघात करतात. पण इतर देशांतले वैज्ञानिक ट्रेमॅडॉक थरांचाही समावेश ऑर्डोव्हिसियन संघात करतात. काही देशांतले भूवैज्ञानिक ऑर्डोव्हिसियनाऐवजी पूर्व (खालचा) सिल्युरियन ही संज्ञा वापरतात.
ट्रायलोबाइट, ब्रॅकिओपोडा व ग्रॅप्टोलाइट हे ऑर्डोव्हिसियन कल्पातले मुख्य प्राणी होत. इतरांचे जीवाश्म (जीवांचे अवशेष) विरळाच आढळतात. पण अपृष्ठवंशींचे (पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांचे) सर्व वर्ग त्या काळी होते. वनस्पतींपैकी चूर्णिय (कॅल्शियमी) शैवलांचे जीवाश्म क्वचित आढळतात. जमिनीवरील वनस्पतींचे किंवा प्राण्यांचे जीवाश्म मिळालेले नाहीत.
ग्रॅप्टोलाइटांचे जीवाश्म सामान्यत: मृण्मय खडकांत आढळतात. ते सशाख (शाखा असलेल्या) जातींचे असून सर्वांत जटिल शाखा असणारे सर्वांत जुने होते. उत्तर अमेरिका, उत्तर यूरोप, ऑस्ट्रेलिया यांसारख्या दूरदूरच्या प्रदेशांत सारखेच ग्रॅप्टोलाइट, सारख्याच अनुक्रमाने आढळतात. सूचक (भूवैज्ञानिक काल निदर्शक) जीवाश्म म्हणून त्यांचा उपयोग होतो.
वालुकामय खडकांत ट्रायलोबाइटांचे व ब्रॅकिओपोडांचे विपुल जीवाश्म सापडतात. त्यांचा भौगोलिक प्रसार ग्रॅप्टोलाइटांसारखा विस्तृत नसे व निरनिराळ्या प्रदेशांतील खडकांत निरनिराळ्या गोत्रसमुच्चयांचे जीवाश्म आढळतात. या काळात ट्रायलोबाइटांचा परमोत्कर्ष झाला. त्यांचे अवसानक (शेपटीसारखा भाग) सामान्यत: मोठे व वक्ष लहान असे. ब्रॅकिओपोडांपैकी इनार्टिक्युलेटा कमी होऊन आर्टिक्युलेटा पुष्कळ वाढले. ते मुख्यत: ऑथॉइड व स्ट्रोफोमेनॉइड या गटांपैकी होते. या कल्पाच्या मध्यात प्रवाळ अवतरले. त्यांच्यापैकी काही प्रवाळभित्ती (रीफ) निर्माते होते. सेफॅलोपोडांपैकी फक्त नॉटिलॉइडांचे जीवाश्म आढळतात. कोलोरॅडोतील खडकांत आदिम मत्स्यांचे शल्क (खवले) सापडलेले आहेत. म्हणजे ऑर्डोव्हिसियन कल्पात पृष्ठवंशी अवतरले होते.
आफ्रिकेच्या काही थोड्या क्षेत्रांतच, मोरोक्कोत व अल्जीरियात, ऑर्डोव्हिसियन खडक आहेत. पण इतर खंडांतल्या अनेक क्षेत्रांत ते आढळतात. त्यांपैकी उत्तर अमेरिकेतल्या व उत्तर यूरोपातल्या खडकांचे विशेष अध्ययन झालेले आहे. काश्मिरात, स्पिटीच्या खोऱ्यात, कांग्रा जिल्ह्यात, कुमाऊँत, नेपाळात व ब्रम्हदेशातील शान संस्थानात ऑर्डोव्हिसियन खडक आहेत.
संदर्भ : Dunbar, C.O. Historical Geology, New York, 1960.
केळकर, क. वा.