आवाझ : नैर्ऋत्य इराणच्या खुझिस्तान प्रांताची राजधानी व महत्त्वाचे तेलकेंद्र. लोकसंख्या २,०६,२६५ (१९६६). हे कारून नदीच्या दोन्ही तीरावर वसले असून येथील हवामान कोरडे व उन्हाळ्यात अतिशय उष्ण असते. याचे प्राचीन नाव ऑगिनिस अथवा हॉर्मझ शहर. बाराव्या शतकात ऊस, तांदूळ व रेशीम यांसाठी हे प्रसिद्ध होते. इराणमधील तेलखाणींमुळे हे पुन्हा ऊर्जितावस्थेस आले. इराण आखातावरील तेलबंदर बंदरशाहपूर, तसेच आबादान व खुर्रमशहर यांच्याशी हे लोहमार्ग व सडकांनी जोडलेले आहे. नदीमार्गे बोटी आवाझपर्यंत येतात. शहरात पेट्रोलियन रसायनोद्योग असून रासायनिक खते व प्लॅस्टिकच्या वस्तूंचे उत्पादन होते.

गद्रे, वि. रा.