आवळी : (हिं. अमलिका गु. आमला, अंबाल क. अमलका सं. आदिफल, अम्लिका इं. एंब्लिक मायरोबलान लॅ. एंब्लिका ऑफिसिनॅलिस कुल-यूफोर्बिएसी). हा मध्यम आकाराचा (९-१२ मी. उंच) पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र व उष्ण कटिबंधात आणि उपोष्ण कटिबंधातील जंगलांत वाढतो किंवा त्याची लागवड करतात श्रीलंका, चीन व मलाया येथेही तो आढळतो. तो महाराष्ट्रात (कोकण, पश्चिम घाट, दख्खनचे पठार इ. ठिकाणी) निसर्गत: किंवा लागवडीत आढळतो. खोड साधारण वाकडे-तिकडे, फांद्या पसरट, मोठ्या साल जाड, हिरवट करडी असून तिच्या ढलप्या निघतात. पाने एका आड एक लहान देठांची वा लहान असून लहान फांद्यांवर दोन रांगांत असतात. फुलांचे झुबके पानांच्या बगलेत किंवा पानांखालच्या फांदीच्या भागावर मार्च-मेमध्ये येतात. एकलिंगी फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे यूफोर्बिएसी कुलात
वर्णिल्याप्रमाणे संवर्त सहा दलांचा, प्रपिंडे सहा केसरदलांचा स्तंभ आखूड किंजपूट तीन कप्प्यांचा, किंजले तीन, किंजल्क दोनदा विभागलेला [→ फूल] मृदुफळ (आवळा) गोल, दोन सेंमी. व्यासाचे व गुळगुळीत, फिकट हिरवट पिवळे व त्यावर सहा उभ्या रेषा असतात. बी एकच व त्रिधारी ऑक्टोबर ते फेब्रुवारीत फळे पिकतात. फळ तुरट, शीतल, मूत्रल (लघवी वाढविणारे) व सारक वाळलेली फळे (आवळकाठी) अतिसार, रक्तस्राव व आमांश यांवर उपयुक्त लोहाबरोबर ही फळे कावीळ, रक्तक्षय, अग्निमांद्य इत्यादींवर देतात. हिरडा व बेहडा यांच्या फळांच्या सालीबरोबर आवळकाठीची पूड मिसळून ‘त्रिफळा चूर्ण’ बनवितात. फुले थंड व सारक मूळ आणि साल तुरट बिया दमा, श्वसन नलिका दाह व पित्ताधिक्यावर उपयुक्त फळात क जीवनसत्त्व भरपूर व ते स्कर्व्ही या विकारावर गुणकारी असते. सालीत, पानात व फळात टॅनीन भरपूर असते. त्याचा उपयोग चामडी कमाविण्यास होतो. आवळा (फळ) उपयुक्त खाद्य आहे. त्यापासून लोणचे, वडी, मुरंबा (मोरावळा), सुपारी इ. करतात. इमारतीच्या बांधकामात किरकोळ उपयोगासाठी लाकूड वापरतात शेतीची अवजारे व सरपण यांसाठीही उपयुक्त. पाला व फळे जनावरे खातात. पानांपासून तपकिरी पिवळे रंगद्रव्य निघते. हिंदुधर्मात आवळी पूजनीय मानली आहे.
जमदाडे, ज. वि.
रोग : आवळीच्या फांद्या, पाने, फळे, इत्यादींवर पिगंट उंचवटे कधीकधी आढळतात. ते रॅव्हेनेलिया एंब्लिकी या कवकामुळे होणाऱ्या तांबेरा रोगाचे असतात. ह्या रोगाच्या नाशाकरिता बोर्डो मिश्रण (३ : ३ : ५००) यासारखी कवकनाशके फवारतात.
कुलकर्णी, य. स.
आवळी, भुई : (हिं.गु. भूमी आमली क. किरिनेल्ली सं. अमला, वितंतिका लॅ. फायलॅंथस निरुरी, कुल-यूफोर्बिएसी). सु. ३०–६० सेंमी. उंचीच्या या वर्षायू (एक वर्ष जगणाऱ्या) ओषधीचा प्रसार सर्व भारतात आणि श्रीलंकेत व ऑस्ट्रेलियाशिवाय उष्ण कटिबंधातील इतर देशांत आहे. कोकणात व दक्षिणेत पिकामध्ये तणासारखी वाढते. पाने अनेक, दोन रांगांत, दीर्घवृत्ताकृती व लहान फुले विपुल, कक्षास्थ (बगलेत), एकलिंगी, पिवळट एकाच झाडावर जुलै-ऑगस्टमध्ये येतात पुं-पुष्पे १-३, स्त्री-पुष्पे एकाकी बिंब दोन्ही फुलांत निराळे [ → फूल ] फळ (बोंड) फार लहान व बिया तीन. मुळे काविळीवर, पाने व मुळांचे चूर्ण गळवे व व्रण यांवर गुणकारी पाने दीपक (भूक वाढविणारी) चीक जखमांवर लावतात. आमांशावर कोवळ्या फांद्यांचा फांट (काढा) देतात. पानांत फायलँथीन नावाचे कटुद्रव्य असते. ते बेडूक व माशांना विषारी असते.
पहा : यूफोर्बिएसी.
जमदाडे, ज. वि.
“