आल्फ्येअरी, व्हीत्तॉर्यो : (१६ जानेवारी १७४९–८ ऑक्टोबर १८०३). इटालियन नाटककार. जन्म इटलीतील आस्ती येथे एका उमराव कुटुंबात. उमरावपुत्रांसाठी असलेल्या ट्यूरिन येथील अकादमीतून पदवीधर झाल्यानंतर सहा वर्षे यूरोपातील अनेक देशांत तो निरुद्देशपणे भटकला. ह्या कालखंडात त्याने व्हॉल्तेअर, रूसो यांसारख्या फ्रेंच विचारवंतांचे ग्रंथ वाचले. तथापि प्लूटार्क ह्या ग्रीक लेखकाच्या साहित्याने तो फारच प्रभावित झाला. प्रवास संपवून ट्यूरिनला आल्यानंतर तो लिहू लागला. क्लीओपात्रा (१७७५) हे त्याचे पहिले नाटक यशस्वी झाल्यानंतर त्याने अनेक नाटके लिहिली. त्याने लिहिलेल्या शोकात्मिकांपैकी Filippo, Antigone, Agamennone, Oreste, Virginia, Saul, Mirra या विशेष उल्लेखनीय होत. Saul (१७८२) ही त्याची सर्वश्रेष्ठ नाट्यकृती. त्याच्या शोकात्मिकांतून मुख्यतः मानवी स्वातंत्र्याचा त्याने उद्घोष केला आहे. Virginia ही शोकात्मिका त्या दृष्टीने विशेष लक्षणीय आहे. शोकात्मिका लिहिताना अरिस्टॉटलप्रणीत ऐक्यत्रयाचे त्याने कसोशीने पालन केले आहे. त्याने काही सुखात्मिका लिहिल्या व उपरोधप्रधान लेखनही केले. तथापि हे लेखन फारसे महत्त्वाचे नाही. त्याच्या राजकीय लेखनात Della Tirannide (१७७७, इं. . ऑन टिरनी) आणि Del Principe e delle Lettere (१७८६, इं. शी. द प्रिन्स अँड लिटरेचर) हे ग्रंथ महत्वपूर्ण आहेत. या ग्रंथांतून मॅकिआव्हेली, माँतेस्क्यू आणि रूसो यांचा परिणाम जाणवतो. Il Misogallo या ग्रंथाचे स्वरूप संकीर्ण असून त्यात काही चतुरोक्ती, उपरोधपूर्ण सुनीते आणि काही गद्यलेखन समाविष्ट केले आहे. या लेखनाचा रोखही मुख्यतः जुलुमशाहीविरोधीच आहे. त्याचे आत्मचरित्र मरणोत्तर प्रकाशित झाले (१८०४). फ्लॉरेन्स येथे तो मरण पावला.
आहलूवालिया, राजेंद्र सिंह (इं) कुलकर्णी, अ. र. (म.)