आल्माआता : रशियाच्या कझाकस्तान राज्याची राजधानी. प्राचीन नाव व्ह्येर्नी. लोकसंख्या ७,३०,००० (१९७०). हे ताश्कंदच्या ईशान्येस ६९२ किमी. असून येथे अवजड यंत्रोद्योग, कापड गिरण्या, फळे डबाबंद करणे, मांससंवेष्टन, मद्य, लाकूड उद्योग, तंबाखू-प्रक्रिया कारखाने, चर्मोद्योग इ. आहेत. हे कझाकस्तानचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र असून येथे विद्यापीठ, विदेशी भाषाशिक्षण केंद्र, संगीत व नृत्य यांच्या संस्था, संग्रहालये तसेच विज्ञान अकादमी आहे. ट्रान्स-ईली पर्वताच्या पायथ्याशी वसलेले, सफरचंदांच्या बागांनी वेढलेले हे शहर रशियातील नयनरम्य शहरांपैकी एक आहे. कझाक भाषेत आल्माआता याचा अर्थच ‘सफरचंदांचा पिता’ असा आहे.
शाह, र. रू.
“