आल्फॉन्सो, दहावा : (२३ नोव्हेंबर १२२१–४ एप्रिल १२८४). लेऑन आणि कॅस्टील ह्या स्पेनमधील प्रदेशांचा राजा, विद्वान लेखक व कवी. १२५२ मध्ये त्यास राजपद प्राप्त झाले. आश्रयास असलेल्या विद्वांनाकडून त्याने अरबी आणि लॅटिन भाषांतील अनेक मौल्यवान ग्रंथांचे– विशेषत: खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषविषयक ग्रंथांचे-स्पॅनिश अनुवाद करून घेतले. Siete Partidas ह्या त्याच्या विधिसंहितेने स्पॅनिश कायद्याच्या विकासाला महत्त्वाचा हातभार लावला. इतिहासाच्या लेखन-अध्ययनासाठी त्याने एक स्वतंत्र संस्थाच स्थापन केली. प्रथमत:च स्पॅनिशमध्ये लिहिले गेलेले दोन इतिहासग्रंथ हे ह्या संस्थेचे विशेष उल्लेखनीय कार्य होय. General estoria हा विश्वेतिहासलेखनाच्या दृष्टीने केलेला एक प्रयत्न असून ख्रिस्तजन्मापर्यतचा भाग त्यात आला आहे. Estoria De Espana किंवा Primera cronica general मध्ये दुसऱ्या फर्डिनँडपर्यतचा स्पेनचा इतिहास आहे. बायबल, Poema De mio Cid सारखे स्पॅनिश महाकाव्य, अनेक लॅटिन इतिवृत्ते इ. सामग्रीचा उपयोग हा इतिहास लिहिताना साक्षेपाने करून घेतला असल्यामुळे तो स्पेनच्या इतिहासाबरोबरच वाङ्मयाच्या अभ्यासासही उपयुक्त आहे. त्याने आपल्या सहकार्‍यांसह तयार केलेल्या ग्रहगतिविषयक सारण्या प्रसिद्ध आहेत. Cantigas Sants Maria हा त्याचा ४०० भावकवितांचा संग्रह. त्यात कुमारी मेरीविषयीच्या अनेक आख्यायिका त्याने काव्यबद्ध केल्या आहेत. काव्यलेखनासाठी मात्र स्पॅनिशऐवजी गॅलिशियन भाषेचे माध्यमच त्याने पसंत केले. त्याच्या अनेक भावकविता श्रेष्ठ दर्जाच्या आहेत. राजकारणात मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. सेव्हिल येथे झालेल्या यादवी युद्धात तो मरण पावला.

कुलकर्णी, अ. र.