आयुर्मान, सरासरी : कोणताही लोकसमूह अनेक व्यक्तींचा समूह असतो. त्या समूहातील एखादी व्यक्ती किती वर्षे जगेल, हे जरी प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत सांगता येणे शक्य नसले तरी त्या समूहाच्या मृत्युमानात बदल झाला नाही, तर त्यातील व्यक्ती सरासरी किती वर्षे जगण्याची शक्यता आहे याचा निष्कर्ष काढता येतो. अशा निष्कर्षास त्या समूहातील व्यक्तीचे सरासरी आयुर्मान (ॲव्हरेज एक्स्पेक्टेशन ऑफ लाइफ) असे म्हणतात. हे आयुर्मान कोणत्याही विशिष्ट वयाच्या व्यक्तींच्या बाबतीत काढता येते व साहजिकच निरनिराळ्या वयाच्या व्यक्तींच्या बाबतीत ते निरनिराळे असते. हे आयुर्मान सरासरी असल्यामुळे त्यावरून त्या वयाची विशिष्ट व्यक्ती नेमकी किती वर्ष जगेल, हे निश्चितपणे समजू शकणार नाही. प्रत्येक वयोगटाचे मृत्युमान त्या गटाच्या सरासरी आयुर्मानात प्रतिबिंबित झालेले असते परंतु या मृत्युमानात भविष्यकाळात होणारे बदल आयुर्मानाच्या आकड्यात आढळून येत नाहीत.
आयुर्मानात झालेली वाढ ही समाजाच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे लक्षण मानतात. आरोग्यविषयक सुखसोयी वाढल्या, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली आणि अधिक जीवनसत्त्वे असलेला मुबलक आहार मिळू लागला, की आयुर्मान वाढू लागते. पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्या दोन शतकांत सरासरी आयुर्मानात दुपटीहुनही अधिक वाढ झाल्याचे दिसून येते. अठराव्या शतकात स्वीडनमध्ये पुरुषांचे सरासरी आयुर्मान ३३·२ वर्षे होते, तेच १९४६ – ५० या काळात ६९ वर्षे झाले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये १७८० च्या सुमारास आयुर्मान ३५·५ वर्षे होते, तेच १९६२ मध्ये पुरुषांचे ६६·८ वर्षे व स्त्रियांचे ७३·४ वर्षे झाले. ते २००० साली ८२ पर्यंत जाईल, असे अर्व्हिग फिशर यांचे अनुमान आहे. इतर प्रगत राष्ट्रांमधील सरासरी आयुर्मानाचे आकडे असेच आहेत. जपान (१९६०) व ग्रेट ब्रिटन (१९६०-६२) या देशांत ते अनुक्रमे पुरुषांसाठी ६६·२ व ६८·० वर्षे, तर स्त्रियांसाठी अनुक्रमे ७१·२ व ७४·० वर्षे एवढे होते. हॉलंड (पुरुष : ७०·६ स्त्री : ७२·९ वर्षे : १९५०-५२) आणि नॉर्वे (पुरुष : ६९·२ स्त्री : ७२·६ वर्षे : १९४६ – ५०) ह्या देशांत सरासरी आयुर्मानाचे असे प्रमाण आहे. अर्धविकसित देशांमध्ये आयुर्मान अजूनही कमी आहे, परंतु आर्थिक विकासाबरोबर त्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे.
लहान वयातील मृत्यूंचे घटते प्रमाण, हेच सरासरी आयुर्मानात वाढ होण्याच्या मुळाशी आहे. अमेरिकेत १९००-१९५३ ह्या काळात श्वेतवर्णीय पुरुष व स्त्री ह्यांचे जन्माच्या वेळचे सरासरी आयुर्मान अनुक्रमे १९ व २२ वर्षांनी (सरासरी आयुर्मानातील लाभ ३९ टक्के व ४२ टक्के) वाढले. परंतु वयाच्या ४० वर्षांनंतर सरासरी आयुर्मानात अशी मोठी वाढ झालेली दिसून येत नाही तिचे प्रमाण पुरुष व स्त्री ह्यांच्या बाबतीत अनुक्रमे १३ टक्के व २७ टक्के एवढे होते. वृद्धांच्या रोगांवर व आजारांवर नियंत्रण करणाऱ्या उपाययोजना उपलब्ध झाल्याशिवाय वयाच्या ४० वर्षानंतरच्या आयुर्मानात अधिक वाढ होणे कठीण असते.
सामान्यतः स्त्रियांच्या बाबतीत सरासरी आयुर्मानाचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आढळते. अमेरिकेत १९५३ मध्ये श्वेतवर्णीय स्त्रीचे सरासरी आयुर्मान श्वेतवर्णीय पुरुषापेक्षा ६.१ वर्षांनी जास्त आढळले. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांत जननमानात झालेली घट आणि प्रसूतिविद्येमध्ये झालेल्या अनेक सुधारणा व त्यासमयी घेतली जाणारी काळजी, ह्यांमुळेही स्त्रियांच्या सरासरी आयुर्मानात निश्चितच वाढ होत गेल्याचे दिसून आले आहे. १९२० मधील मातृक मृत्युमानाचे प्रमाण प्रत्येक दहा हजारांमागे ८० होते, तेच १९५४ मध्ये (केवळ ३४ वर्षांच्या काळात) प्रत्येक दहा हजारांमागे ५ झाले.
आयुर्मानामध्ये वंश व सामाजिक दर्जा ह्यांनुसारही बदल होत असल्याचे दिसते. अमेरिकेत १९५३ मध्ये कृष्णवर्णीय पुरुषांचे व स्त्रियांचे आयुर्मान श्वेतवर्णीय पुरुष व स्त्री यांच्यापेक्षा अनुक्रमे ७·१ व ८·५ वर्षांनी कमी होते. परंतु आता ह्या प्रमाणामधील फरक फारच कमी झाला आहे. अनेक समाजशास्त्राज्ञांच्या मते व्यक्तीवर पडणारा ताण, हा कुटुंबासरख्या समूहाच्या भावनिक आधाराने कमी होऊ शकतो व त्याचा आयुर्मानावर अनुकूल परिणाम होतो. उदा., विवाहित स्त्री-पुरुषांचे सरासरी आयुर्मान अविवाहित, विधुर किंवा घटस्फोटित व्यक्तींपेक्षा अधिक असते.
संयुक्त राष्ट्रांच्या जनांकिकी वार्षिकाच्या (जुलै १९७०) आकडेवारीप्रमाणे भारत, नायजेरिया, अपर व्होल्टा ख्मेर प्रजासत्ताक, श्रीलंका, जॉर्डन व पाकिस्तान ह्या उच्च जननमान व उच्च मृत्युमान यांबद्दल प्रसिद्ध असलेल्या सात देशांतील पुरुषांचे सरासरी आयुर्मान स्त्रियांच्यापेक्षा अधिक असू शकेल. केवळ पाच उत्तर यूरोपीय देशांत मुलगा ७० वर्षे जगू शकेल, तर ४१ देशांत मुलींचे सरासरी आयुर्मान ७० वर्षे राहील. स्वीडनमधील मुलींचे सरासरी आयुर्मान जगात सर्वाधिक म्हणजे ७६·५ वर्षे आहे. डच मुलींचा क्रम स्वीडिश मुलींच्या खालोखाल लागतो. पुरुषांचे सर्वोच्च सरासरी आयुर्मान जगात स्वीडनमध्येच सापडते (७१·९ वर्षे). नॉर्वे, नेदर्लंड्स, आइसलँड व डेन्मार्क हे इतर असे आहेत, की ज्यांमध्ये आज जन्मलेला मुलगा, सांख्यिकीय दृष्ट्या २०४१ साली जिवंत असण्याची शक्यता संभवते. सामान्यतः यूरोप खंडामधील सरासरी आयुर्मान हे इतर खंडांतील सरासरी आयुर्मानापेक्षा कितीतरी अधिक आहे. यूरोपीय देशांपैकी अल्बेनिया, पश्चिम जर्मनी, लक्सेंबर्ग, पोर्तुगाल व यूगोस्लाव्हिया या देशांतील पुरुषांचे सरासरी आयुर्मान ७० वर्षांच्या खाली असल्याचे आढळले आहे.
खालील तक्त्यात १८७२ ते १९६१ ह्या काळातील भारतातील पुरुष व स्त्री ह्यांच्या जन्माच्या वेळचे सरासरी आयुर्मानाचे आकडे दिलेले आहेत:
सरासरी आयुर्मान (वर्षे) | ||
काळ | पुरुष | स्त्री |
१८७२ – १८८१ | २३·६७ | २५·५८ |
१८८१ – १८९१ | २४·५९ | २५·५४ |
१८९१ – १९०१ | २३·६३ | २३·९६ |
१९०१ – १९११ | २२·५९ | २३·३१ |
१९११ – १९२१ | २४·८० | २४·७० |
१९२१ – १९३१ | २६·९१ | २६·५६ |
१९३१ – १९४१ | ३२·०९ | ३१·३७ |
१९४१ – १९५१ | ३२·४५ | ३१·६६ |
१९५१ – १९६१ | ४१·८९ | ४०·५५ |
वरील आकड्यांवरून १८७२-१९२१ ह्या काळात जन्माच्या वेळच्या सरासरी आयुर्मानात फारच थोडा बदल झाल्याचे दिसून येते परंतु १९२१-६१ ह्या काळात मात्र सरासरी आयुर्मानात ५० टक्क्यांहुनही अधिक वाढ झाल्याचे आढळते. देशात मृत्युमानामध्ये होत गेलेली घट, हे यामागील एक कारण आहे. आर्थिक विकासालाही त्याचे थोडेबहुत श्रेय देता येईल.
भारतात १९४१ – ५० या दशकात सरासरी आयुर्मान ३२ वर्षे होते परंतु १९६८ अखेर हे प्रमाण पुरुष व स्त्री ह्यांच्या बाबतीत अनुक्रमे ५३.२ व ५१.९ असे झाले. भारतामध्ये पुरुषांच्या बाबतीत सरासरी आयुर्मानाचे प्रमाण स्त्रियांच्यापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. खालील तक्त्यात १९६१ च्या जनगणनेनुसार भारतातील राज्यवार पुरुष व स्त्री ह्यांच्या सरासरी आयुर्मानाचे आकडे दिलेले आहेत :
सरासरी आयुर्मान (वर्षे) | |||
राज्याचे नाव | पुरुष | स्त्री | |
१. | आंध्र प्रदेश | ५०·३ | ४८·५ |
२. | आसाम | ४१·१ | ४९·५ |
३. | बिहार | ४९·९ | ५०·३ |
४. | गुजरात | ५२.१ | ५०.५ |
५. | केरळ | ५९·५ | ५७·१ |
६. | मध्य प्रदेश | ५२·५ | ५१·३ |
७. | तमिळनाडू | ५२·० | ५०·१ |
८. | महाराष्ट्र | ५६·१ | ५४·३ |
९. | म्हैसूर (कर्नाटक) | ५२·५ | ५०·५ |
१०. | ओरिसा | ५२·० | ५२·४ |
११. | पंजाब | ५९·९ | ५५·० |
१२. | राजस्थान | ५९·२ | ५४·३ |
१३. | पश्चिम बंगाल | ५४·१ | ५४·५ |
१४. | उत्तर प्रदेश | ५०·७ | ४९·६ |
वरील तक्त्यावरून पुरुषांच्या बाबतीत पंजाब राज्यातील पुरुषाचे सरासरी आयुर्मान सर्वाधिक (५९·९ वर्षे) व स्त्रियांच्या बाबतीत असल्याचे दिसून येते.
पहा : लोकसंख्या जननमान जन्ममृत्युसांख्यिकी.
गद्रे, वि. रा.
“