आफ्रिका : क्षेत्रफळाने आशियाच्या खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खंड. बेटांसह क्षेत्रफळ ३,०२,७७,१३५ चौ. किमी. उत्तरेस केप ब्‍लँक (३७२१’उ.) ते दक्षिणेस केप अगुल्हास (३४५१’ द.) दक्षिणोत्तर लांबी सु. ८,००० किमी. पश्चिमेस केप व्हर्द (१७३२’ प.) ते पूर्वेस केप गार्डाफुई (५१२५’). पूर्वपश्चिम विस्तार सु. ७,४०० किमी. किनारा सु. ३६,८८८ किमी. या खंडातून विषुववृत्त, कर्कवृत्त व मकरवृत्त ही तीनही वृत्ते जातात. विषुववृत्त हे जवळजवळ मध्यातून जात असले, तरी या खंडाचा सु. दोन तृतीयांश भाग त्याच्या उत्तरेस आहे व सु. पाच षष्ठांश भाग उष्णकटिबंधात आहे. उत्तरेस जिब्राल्टरच्या चिंचोळ्या सामुद्रधुनीने ते यूरोप खंडापासून अलग झालेले असून ईशान्येस सिनाईच्या द्वीपकल्पाने ते आशियाशी जोडले गेले आहे. याच्या उत्तरेस भूमध्य समुद्र, पश्चिमेस अटलांटिक महासागर व पूर्वेस तांबडा समुद्र व अरबी समुद्र यांसह हिंदी महासागर असून, दक्षिणेस २० पू. रेखावृत्त ही अटलांटिक व हिंदी महासागर यांमधील सीमा मानली जाते.

या खंडात मोरोक्को, अल्जीरिया, ट्युनिशिया, लिबिया, ईजिप्त, मॉरिटेनिया, माली, नायजर, चॅड, सूदान, इथिओपिया, सोमालिया, सेनेगल, गँबिया, गिनी, सिएरा लेओन, लायबीरिया, आयव्हरी कोस्ट, अपर व्होल्टा, घाना, टोगो, दाहोमी, नायजेरिया, कॅमेरून, मध्य आफ्रिका संघराज्य, विषुववृत्तीय गिनी, गाबाँ, झाईरे, काँगो प्रजासत्ताक, युगांडा, केन्या, रूआंडा, बुरूंडी, टांझानिया, झँबिया, मालावी, बोट्‍स्वाना, र्‍होडेशिया, दक्षिण आफ्रिका संघराज्य, स्वाझीलँड, लेसोथो हे स्वतंत्र देश स्पॅनिश सहारा हा स्पेनच्या व पोर्तुगीज गिनी, अंगोला, मोझँबीक हे पोर्तुगालच्या आणि नैर्ऋत्य आफ्रिका हा दक्षिण आफ्रिकेच्या अमलाखालील प्रदेश मादागास्कर (मॅलॅगॅसी) व मॉरिशस ही स्वतंत्र बेटे, सेशेल, रॉड्रिगेस व सोकोत्रा ही ब्रिटनची, कॉमोरो व रीयून्यन ही फ्रान्सची, फर्नांदो पो, अन्नाबॉन व कानेरी  ही स्पेनची आणि साऊं टोमे, प्रिन्सिपे, मादीरा व केप व्हर्द ही पोर्तुगालची बेटे यांचा समावेश होतो. ॲसेन्शन, सेंट हेलीना व ट्रिस्टन द कुना ही ब्रिटनची बेटेही दक्षिण अमेरिकेपेक्षा आफ्रिकेला अधिक जवळ आहेत.

आफ्रिकेच्या उत्तरेचा भूमध्यसागरतटावरील प्रदेश यूरोपीयांना दीर्घकाळपर्यंत माहीत होता परंतु बाकीच्या बऱ्याच भागाशी पाश्चात्त्यांचा संबंध अगदी अलीकडचा आहे. येथील हिरे, सोने, तांबे, कोबाल्ट वगैरे मौल्यवान खनिजे व कापूस, कोको, पामबिया, पामतेल, शिसल, भुईमूग इ. कच्चा माल, येथील अरण्यांत मिळणारे लाकूड, येथील विविध प्राण्यांची शिकार व त्यांपासून मिळणारे हस्तिदंत, कातडी वगैरे किंमती पदार्थ यांमुळे या खंडातील शक्य तेवढा प्रदेश आपल्या अमलाखाली आणण्याची यूरोपीय राष्ट्रांची एकोणिसाव्या शतकात मोठीच स्पर्धा लागली. मुळचे लोक मागासलेले असल्यामुळे त्यांना बाजूला सारून आपले वर्चस्व स्थापणे यूरोपीयांना सुलभ झाले.

दुसऱ्या महायुद्धानंतर पुष्कळशी स्वतंत्र आफ्रिकी राष्ट्रे अस्तित्वात आली. या नवोदित राष्ट्रांचे स्थिरपद होण्याचे व विकासाचे प्रयत्‍न व त्यांच्यापुढील समस्या, त्यांच्याकडून शक्य तेवढ्या सवलती व लाभ मिळविण्याचे पुढारलेल्या राष्ट्रांचे प्रयत्‍न, तेथे आपलीच हुकमत कायम ठेवण्याचा पोर्तुगालसारख्या देशांचा अट्टाहास आणि वर्णभेदावर आधारलेले दक्षिण आफ्रिका वा र्‍होडेशिया यांचे शासकीय धोरण यांमुळे या खंडाकडे लक्ष वेधले जात आहे. संयुक्त राष्ट्रांत आफ्रिकी राष्ट्रांच्या गटाचे सामर्थ्य जाणवू लागले आहे.

भूवर्णन : हे खंड बहुतांशी प्राचीन खडकांच्या विस्तीर्ण, ताठर गटाचे बनलेले असून, त्याच्या उत्तरभागी ॲटलास पर्वत व दक्षिणभागी केप पर्वत रांगा हे भूवैज्ञानिकदृष्ट्या अलीकडील पर्वत आहेत. त्यांच्या दरम्यान पठारांची मालिका असून ही पठारे म्हणजे सपाट किंवा किंचित ऊर्मिल असे विस्तृत भूप्रदेश आहेत. त्यांवर क्वचित काही ठिकाणी अधिक कठीण व प्रतिकारक्षम खडक उभे आहेत. या प्रदेशांभोवती पठारे उतरती होत गेलेली असून उतारांच्या शेवटी अरुंद किनारपट्ट्या आहेत. या पट्ट्या भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर,  टांगानिका व मोझँबीक किनार्‍यांवर, कुनेने व नायजर नद्यांमधील लहान प्रदेशात आणि गँबिया व सेनेगल नद्यांच्या उत्तरेकडील भागात रुंद होत गेलेल्या आहेत.

विस्ताराच्या मानाने आफ्रिकेत उंच पर्वत व सखल मैदाने कमी आहेत. २,५०० मी. पेक्षा उंच प्रदेश मर्यादित असून, ते एक तर प्रतिकारक्षम गिरिपिंड तरी आहेत नाही तर ज्वालामुखी शिखरे आहेत. १५० मी. पेक्षा कमी उंचीची सर्व भूमी किनाऱ्यापासून ८०० किमी. च्या आत आहे. फक्त सहारामधील दोन द्रोणीच याला अपवाद आहेत. आफ्रिकेचा दक्षिण व पूर्व भाग अधिक उंच असून उत्तर व पश्चिम भाग कमी उंच आहे. काँगो नदीच्या मुखापासून एडनच्या आखातापर्यंत एक रेषा मानली, तर तिच्या दक्षिणेस सर्व प्रदेश ३०० मी. हून अधिक उंच आहे. यापैकी बराच भाग ९०० मी. पेक्षाही अधिक उंच आहे. या भागात पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्याचा सखल प्रदेश कमी रुंद आहे. या रेषेच्या उत्तरेस बहुतेक प्रदेश १५० मी. ते ३०० मी. उंचीचा आहे. त्यात थोडासाच भाग ९०० मी. पेक्षा अधिक उंचीचा आढळतो. येथे वायव्य भाग व नाईल नदीच्या पलीकडील पूर्वेचा भाग सोडून बराचसा किनारी प्रदेश सखल व रुंद आहे. सर्वांत उंच व विस्तीर्ण प्रदेश इथिओपियात आहे. त्यापैकी काही १,५०० मी. पेक्षाही अधिक उंच आहे. दक्षिणेत पूर्व आफ्रिकेचे पठार केन्यामध्ये सर्वांत उंच आहे. ते २,५०० मी. किंवा अधिकही उंच आहे. क्वचित काही ज्वालामुखी शिखरे त्याहूनही उंच आहेत. उदा., किलिमांजारो (५,८९५ मी.), केन्या (५,१९९ मी.), म्वेरू (४,५६६ मी.), एल्गन (४,३८१ मी.) रूवेनझोरी (५,११९ मी.) हा मात्र ज्वालामुखी नाही.

पूर्व आफ्रिकेपासून दक्षिणेकडे पसरलेल्या पठारावर कित्येक ठिकाणी विशेषतः ड्रेकन्सबर्ग पर्वतात पठाराच्या कडेपाशी उभे उतार आहेत. थाडेंटसोन्याने (सु. ३,५०० मी.) व माँटोसूर्स (३,२७६ मी.) येथे पठाराची कड विशेष उठून दिसते, कारण तेथील खडक कठीण असून त्यांचे थर आडवे क्षितिजसमांतर आहेत. इथिओपियातही पठारांच्या कडा व त्यांचे उतार नजरेत भरतात. सापेक्षतः मऊ व कमी प्रतिकारी खडकांच्या भागात पठारांचे उतार कमी स्पष्ट दिसतात. भूमिस्वरूपांचा एकसारखेपणा आणि तोचतोपणा हे आफ्रिकेतील मोठमोठ्या प्रदेशांचे वैशिष्ट्य आहे. सपाट व किंचित ऊर्मिल प्रदेश पुष्कळ टिकाणी आढळतात आणि ते पुष्कळ उंचावर असूनही कित्येकदा सखल मैदानी प्रदेशांसारखे वाटतात.

उत्तरेकडे व पश्चिमेकडे काँगो, नायजर व नाईल यांच्या खोर्‍यांकडे आफ्रिकेच्या पठाराची उंची कमी होत जाते. ९०० मी. पेक्षा अधिक उंचीचे प्रदेश फक्त उत्तरेकडे ॲटलास पर्वतात व मध्य सहारातील अहॅग्गर व तिबेस्ती यांच्या ग्रॅनाइटी गिरिपिंडात आढळतात. पश्चिम आफ्रिकेच्या व कॅमेरूनच्या अंतर्भागातील उंच प्रदेश हे प्राचीन स्फटिकी खडकांचे असून, गिनीमधील फूटा जालन पठार, सिएरा लेओन व लायबीरिया यांची सरहद्द, नायजेरियातील जॉस पठार  व ॲडामावा आणि कॅमेरून पठार येथेच फक्त त्यांची उंची अधिक आढळते. या बाजूस किनाऱ्याजवळ विस्तीर्ण सखल प्रदेश असून ते सेनेगल, गँबिया, व्होल्टा व नायजर-बेन्वे या नद्यांच्या खोर्‍यांतही आहेत. सूदानमधील ३,०५० मी. उंचीचा दारफुर प्रदेश व ४,०६९ मी. उंचीचा माँट कॅमेरून हे ज्वालामुखीजन्य असून, त्यांच्या निर्मितीस कारण झालेले भूपृष्ठातील ताण व पूर्व आफ्रिकेतील खचदऱ्या व ज्वालामुखीक्रिया यांच्या निर्मितीस कारण झालेले ताण एकच होत.

या खंडात सु. ३३% भागावर प्राचीन स्फटिकी तळखडक उघडे पडलेले दिसतात. काही ठिकाणी ग्रॅनाइट, शिस्ट व नाइस पृष्ठभागावर दिसतात. र्‍होडेशिया, झँबिया वा टांगानिका आणि काही कोरड्या हवेचे प्रदेश येथे द्वीपगिरींची वैशिष्ट्यपूर्ण भूरचना दिसून येते. वलीकरण व क्षरण अधिक झालेल्या भागात प्रदेश फारच उंचसखल झालेला आढळतो. तळखडकांच्या काही भागात, आफ्रिकेच्या दक्षिण भागात, काँगो-झँबीझी जलविभाजक क्षेत्रात आणि पश्चिम आफ्रिकेत महत्त्वाचे खनिज-उत्पादक प्रदेश आहेत.

विस्ताराच्या मानाने आफ्रिकेच्या किनाऱ्याची लांबी फार कमी आहे. किनारा दंतुर नाही आणि आखाते, भूशिरे, उपसागर हेसुद्धा फार थोडे आहेत. उत्तर किनाऱ्यावरील गॅबेस व सिद्रा आखाते आणि पश्चिम किनाऱ्यावरील विस्तीर्ण गिनीचे आखात हीच काय ती नाव घेण्याजोगी मोठी आखाते आहेत. इतर खंडांच्या तुलनेने या खंडाजवळपास बेटेही थोडीच आहेत. किनाऱ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सागरमग्न खंडभूमी फारच कमी रुंदीची असून काही  ठिकाणी तर किनाऱ्याला लागून एकदम खोल समुद्र आहे. नाईलखेरीज इतर नद्यांच्या मुखांशी मोठाले त्रिभुज प्रदेश बनलेल नाहीत. किनाऱ्याच्या या रचनेमुळे चांगली नैसर्गिक बंदरेही फरा थोडी आहेत.

पूर्व आफ्रिकेतील मोठमोठ्या खचदऱ्या हे आफ्रिका खंडाचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. त्या क्रिटेशस किंवा उत्तर तृतीयक कालात अस्तित्वात आल्या असाव्या आणि मादागास्कर बेट मुख्य भूमीपासून वेगळे झाले, त्या घटनेच्या समकालीन असाव्या. त्या ज्या ज्वालामुखी क्रियेमुळे निर्माण झाल्या, तिच्याशी संबंधित क्रियेमुळेच पूर्व आफ्रिकेतील बहुतेक उंच शिखरे तयार झाली. या खचदर्‍यांच्या पश्चिमेकडे अजूनही ज्वालामुखी व भूकंपीय हालचाल होत आहे. किवू सरोवर एका खचदरीला शिलारसाचा बांध पडून तयार झालेले आहे. त्या भागातून पूर्वी नाईलची एक उपनदी वाहात होती. या सरोवराच्या ईशान्येकडील विरूंगा पर्वतात दर दहाबारा वर्षांनी उद्रेक होऊन जे शिलारसप्रवाह वाहिलेले आहेत, त्यांची तारीखवार नोंद आहे.

आफ्रिकेतील मुख्य खचदरी सु. ६,४०० किमी. लांबीची आहे. पूर्व आफ्रिकेच्या पुष्कळशा सरोवरांनी व जवळपासच्या ज्वालामुखी शिखरांनी तिचा मार्ग रेखाटलेला आहे. आशिया मायनरमधील मृतसमुद्रापासून सुरू होऊन अकाबाच्या आखातापासून ती तांबड्या समुद्राच्या अनुरोधाने इथिओपियाच्या गिरिपिंडातून जाते तेथून रूडॉल्फ, नैवाशा व मगाडी सरोवरांपर्यंत आल्यावर मग दक्षिणेकडे ती टांझानियात जाते. तेथे तिचा मार्ग अगदी सहज दिसणारा नाही. पूर्वेकडच्या भिंती अधिक क्षरण झालेल्या असून सरोवरे लहान आहेत व ती एका ओळीत नाहीत. काही सरोवरे तर वाळून गेलेल्या क्षारांचे थरच आहेत. त्यातल्या त्यात मोठी सरोवरे नेट्रॉन व मॉन्यारा ही असून इयासी हे मुख्य खचदरीच्या एका फाट्यात आहे. तेथून दक्षिणेस मालावीमध्ये खचदरीच्या बाजू अधिक स्पष्ट असून तेथे खडकांचा एक प्रचंड गट समांतर विभागांच्या बाजूने कोसळलेला दिसतो. यानंतर खचदरीच्या बाजू म्हणजे न्यासा सरोवराचे सरळ उभे उतार होत. हे सरोवर सु. ५८० किमी. लांब असून ते कोठेही ८० किमी. हून अधिक रुंद नाही. त्याची कमाल खोली सु. ३७५ मी. आहे. नंतर ही खचदरी शिरे खोऱ्याच्या दिशेने जाऊन मोझँबीकमध्ये हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर बेइरापर्यंत पोचते. मुख्य खचदरीची पश्चिम शाखा न्यासा सरोवराच्या उत्तर टोकापासून एका मोठ्या चंद्रकोरीच्या आकाराने जाते. तिच्यात रूक्का, टांगानिका, किवू, एडवर्ड व ॲल्बर्ट ही सरोवरे आहेत. टांगानिका हे सरोवर सायबीरियातील बैकल सरोवराच्या खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खोल (१,७४२ मी.) सरोवर आहे. या खचदरीच्या उपशाखांमध्ये  म्वेरू व उपेम्बा ही सरोवरे आहेत. खचदर्‍यांमधील बहुतेक सरोवरांची उंची पठाराच्या सामान्य उंचीपेक्षा कमी, ४०० मी. ते ९०० मी. असून ती बहुधा अतिशय खोल व फ्योर्डसारखी आहेत. काहींचा पृष्ठभाग समुद्रसपाटीपेक्षा शेकडो मीटर उंच असला तरी त्यांचे तळ समुद्रसपाटीपासून चांगलेच खाली आहेत. व्हिक्टोरिया सरोवर हे पूर्व आफ्रिकेतील सर्वांत मोठे सरोवर खचदरीच्या प्रमुख शाखांच्या दरम्यानच्या १,१३४ मी. उंच पठारावर, त्याच्या उथळ, खोलगट भागात आहे. त्याची कमाल खोली फक्त ८२ मी. असून क्षेत्रफळ मात्र ६९,४०५ चौ. किमी. आहे. कॅस्पियन व सुपीरियर यांच्या खालोखाल ते जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे.

जलनिःसारण : आफ्रिकेच्या उंच व सखल दोन्ही भागांत बशीसारखे खोलगट भाग तयार झालेले आहेत. समुद्राच्या बाजूला डोंगर उतार सामान्यतः एकदम तीव्र होतात आणि त्यात सापेक्षतः लहान परंतु वेगवान प्रवाहांनी खोल दऱ्या कोरलेल्या आढळतात. अंतर्भागाच्या बाजूला उतार सौम्य असतात. याला अपवाद म्हणजे ॲटलास पर्वत, ड्रेकन्सबर्ग पर्वत व इथिओपियाचा डोंगराळ प्रदेश हे होत. पठारप्रदेशाच्या उत्थापनामुळे पूर्वी पुष्कळशी अंतर्गत सरोवरे व समुद्र निर्माण झाले होते. ते आता नाहीसे तरी झाले आहेत किंवा लहान झाले आहेत. पठाराची कड मागेमागे रेटीत गेलेल्या प्रवाहांनी त्यांचा निचरा केला आहे. नायजर आणि काँगो या नद्या अपर नायजर व मध्य काँगो यांच्या द्रोणीतील सरोवरांचे पाणी वाहून नेतात या नद्या जलोढांच्या विस्तीर्ण प्रदेशातून वळणे घेत घेत जातात आणि मग पठाराच्या कडेवरून खाली कोसळून समुद्राकडे जातात. तरीसुद्धा या खंडाचा सु. ३३% भाग अंतर्गत जलनिःसारणाचा आहे त्याला समुद्राकडे वाट नाही. यात सहारा व लिबियाच्या वाळवंटांचा बराच भाग, चॅड सरोवरद्रोणी, कालाहारी वाळवंटाचा काही भाग व खचदऱ्या यांचा समावेश होतो.

किनारी प्रदेशातील लहान व हंगामी प्रवाह सोडले, तर या खंडात फक्त नऊ मोठ्या नदीसंहती आहेत. त्यांपैकी चॅड सरोवराची संहती समुद्रापर्यंत जाऊ शकत नाही. मोठ्या नद्यासुद्धा पुरेसा अवधी न मिळाल्यामुळे आपापले मार्ग पुरेसे खोल खोदू शकलेल्या नाहीत. पठाराच्या कठीण खडकांच्या कडेवरून खाली अरुंद, मैदानी किनारी प्रदेशात येताना त्यांच्या मार्गात द्रुतवाह, प्रपात व धबधबे  तयार झालेले आहेत.

काँगो या नदीचे जलनिःसारण क्षेत्र सर्वांत मोठे ३६,९०,७०० चौ. किमी. असून ते सर्वस्वी उष्णकटिबंधात आहे. तिची लांबी ४,३७१ किमी. आहे. ती विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंकडील प्रदेशातून जात असल्यामुळे तिच्या खोऱ्याच्या बहुतेक भागात विषुववृत्तीय बारमाही पाऊस भरपूर पडतो. यामुळे या खोऱ्यातील सर्व प्रमुख नद्या बारमाही आहेत. द्रुतवाह व धबधबे यांविरहितच्या भागात त्या जवळजवळ वर्षभर नौकासुलभ असतात. मध्य काँगोचे बहुतेक सर्व खोरे ३०० मी. पेक्षा अधिक उंचीवर आहे व त्याचा सौम्य उतार आग्नेयीकडून वायव्येकडे आहे. हिच्याभोवती दक्षिणेस कटांगा-अंगोला पठार, पूर्वेस पूर्व आफ्रिकेच्या खचदर्‍यांच्या काठावरील उंच प्रदेश व उत्तरेस काँगो व नायजर-शारी यांधील जलविभाजक असे उंच प्रदेश आहेत. या गाळप्रदेशातून अनेक प्रवाह वेडेवाकडे वाहात जातात व तेथे अनेक सरोवरे व दलदली आहेत. खोऱ्याच्या या भागाचा संपूर्ण निचरा अजूनपर्यंत कधीही झालेला नाही. क्रिस्टल पर्वतातून ३२ द्रुतवाहांतून व प्रपातमालिकेतून बाहेर पडण्यापूर्वीच तिला तिच्या सर्व उपनद्या मिळतात. या प्रपातद्रुतवाहमालिकेला लिव्हिंग्स्टन फॉल्स म्हणतात. येथील स्टॅन्लीपूलपासून लगेच खाली फक्त सु. ३५० किमी. त नदी सु. २२५ मी. खाली जाते. याच्यावरील भागात स्टॅन्ली फॉल्स ते स्टॅन्लीपूल यांदरम्यान १,६०० किमी. हून अधिक लांब भागात ती सु. २५० मी. खाली येते. काँगोचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार झालेला नसून खाडी आहे.

नाईलचे जलवाहनक्षेत्र सु. २८,७५,००० चौ. किमी. असून तिची लांबी सु. ६,६९० किमी. आहे. ही जगातील सर्वांत लांब नदी असून ती ॲमेझॉन, मिसिसिपी वगैरे मोठमोठ्या नद्यांच्या तोडीची समजली जाते. एका मरुभूमीतून जात असूनही तिचे पाणी कायम राहाते, याचे कारण तिला पाण्याचा बराचसा पुरवठा पूर्व आफ्रिकेच्या पठारावरील व्हिक्टोरिया सरोवर या विषुववृत्तीय पाण्याच्या प्रचंड साठ्यातून होतो. तिची मोठी उपनदी नील नाईल ही इथिओपियाच्या उन्हाळी मोसमी पावसाचे पाणी आणते. मुख्यतः यामुळेच नाईलच्या खोऱ्याच्या खालच्या टप्प्यात पाण्याचा एकूण पुरवठा खूपच कमीजास्त होत असतो. खार्टूम व आस्वान यांदरम्यानच्या सहा द्रतवाहांमुळे या नदीवरील स्वैरनौकानयनास पायबंद बसलेला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्येपासून या नदीवर बांधलेली धरणे व घातलेले बंधारे यांमुळेही तिच्यावरील नौकासंचारास मर्यादा पडलेली आहे. नाईलच्या मुखाजवळ मोठा, सुपीक त्रिभुज प्रदेश बनलेला आहे.

नायजर ही नदी अटलांटिकपासून फक्त सु. ३२५ किमी. वर फूटा जालन पठारावर उगम पावते, परंतु गिनीच्या आखाताला मिळेपर्यंत तिच्या प्रवाहाची लांबी सु. ३,१८५ किमी. भरते. लोअर नायजर ही पूर्वी एक स्वतंत्र नदी होती परंतु तिने पठाराची मागे मागे झीज करून मध्यखोऱ्याचे पाणी वाहून आणले आहे. हे मध्यखोरे पूर्वी एक अंतर्देशीय सरोवर होते. अजूनही टिंबक्टूच्या वरील भागातील पावसाळ्यात ते पुराने सहज भरून जाते. नायजरची मुख्य उपनदी बेन्वे हीसुद्धा चॅड सरोवराच्या प्रदेशात उत्तर नायजेरिया व कॅमेरूनचे डोंगर यांना जोडणाऱ्या पठारातून अशीच मागे मागे झीज करीत चालली आहे.

झँबीझी ही ३,५४१ किमी. लांब असून तिचे जलनिःसारणक्षेत्र सु. १३,३०,००० चौ. किमी. आहे. तिच्या वरच्या टप्प्यात ती १,२२० मी. उंचीवरील झँबिया व र्‍होडेशिया येथील विस्तृत व उथळ गाळद्रोणीचा निचरा करते. या भागातील तिच्या उपनद्या अधूनमधून वाहणाऱ्या आहेत, कारण येथील पाऊस अगदी हंगामी स्वरूपाचा असून बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते. तिच्या मधल्या टप्प्यात धबधबे व द्रुतवाह आहेत. त्या सर्वांत विशेष चित्तवेधक दृश्य व्हिक्टोरिया धबधब्याचे आहे. हा सु. १०८ मी. उंच असून त्याच्या खालच्या विभंगरेषांच्या अनुरोधाने तयार झालेल्या अरुंद नागमोडी मार्गांने नदी पुढे जाते. त्यापुढील भागात करिबा धरणामुळे विस्तीर्ण सरोवर तयार झालेले आहे. हिंदी महासागराजवळ या नदीची रुंदी ८ किमी. किंवा अधिकही होते.

ऑरेंज ही नदी २,०९२ किमी. लांब असून तिचे जलवाहनक्षेत्र ४,४१,३०० चौ. किमी. आहे. तिची वाल ही एकच उपनदी आहे. आफ्रिकेच्या दक्षिण भागातील काही उंच प्रदेशाचे जलवाहन ऑरेंजमुळे पश्चिमेस अटलांटिककडे होते. परंतु बाष्पीभवनामुळे तिचे पाणी इतके कमी होते, की ते आधुनिक पाणीपुरवठा योजनांस अगदी कमी पडते आणी अवर्षणाच्या काळात तर ती कोरडीसुद्धा पडते. पावसाचे बरेच पाणी नदीपर्यंत पोचतच नाही. ते उथळ खोलगट भागात साचून राहते व त्याचे बाष्पीभवन होऊन तेथे क्षारांचे थर तयार झालेले आढळतात.

लिंपोपो ही नदी व्हेल्ड पठाराला वळसा घालून ऑरेंज व झँबीझी या दरम्यानच्या प्रदेशातील पाणी वाहून नेते व मोझँबीकमध्ये हिंदी माहसागराला मिळते. लिंपोपो म्हणजे सुसर. या नदीत पुष्कल सुसरीं असल्यामुळे तिला हे नाव मिळाले आहे. पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल व व्होल्टा यांचे जलवाहनक्षेत्र वरील नद्यांच्या मानाने लहान आहे. उत्तर आफ्रिकेतील मोठमोठ्या मरूप्रदेशांत अनेक खोलगट भाग आहेत. त्यांना समुद्राकडे वाट नाही. चॅड सरोवर उथळ असून त्याचा विस्तार प्रतिवर्षी कमीजास्त होत असतो. त्याला मिळणारी शारी नदी अत्यंत अनियमित वाहणारी आहे. ईशान्येकडील बोडेले खोलगट प्रदेशात चॅडमधील जादा पाणी कधीकधी वाहत जाते. ट्युनिशियाच्या गॅबेस आखातापासून खोलगट प्रदेशांची एक मालिकाच एल् जाऊफपर्यंत गेलेली आहे. त्यांतील कित्येक प्रदेश समुद्रसपाटीपेक्षा खाली आहेत. सहारात जे काही थोडे प्रवाह वाहतात, ते वाळवंटातच लुप्त होतात.

उत्तर किनाऱ्यावर मोरोक्कोमधील मौलूया, अल्जीरियातील चेलिफ व ट्युनिशियामधील मेजेर्दा या नद्या ॲटलास पर्वतात उगम पावून भूमध्य समुद्रास मिळतात.

हवामान : ३७ उ. ते ३५ द. विस्तारामुळे आफ्रिकेचे हवामान मुख्यतः उष्णकटिबंधीय व उपोष्णकटिबंधीय आहे. भूमध्य सागरीभागांतील पठारावरील उंच प्रदेशात व दक्षिणेस आणि नैर्ऋत्येस केप प्रांतात ते समशीतोष्णकटिबंधीय आहे. पश्चिम किनाऱ्याजवळून जाणाऱ्या थंड प्रवाहांमुळे तेथील हवा थोडीशी कमी उष्ण होते. पूर्व किनाऱ्याजवळून जाणाऱ्या उष्ण प्रवाहांचा परिणाम अधिक होतो व उष्ण आणि दमट हवा बरीच आतपर्यंत येते. वार्षिक पावसाचे प्रमाण व वाटणी बरीच बदलत्या स्वरूपाची आहे. विषुववृत्तीय सखल प्रदेशात ऋतूंचा बदल जाणवत नाही इतरत्र तो स्पष्ट जाणवतो. बऱ्याच भागांत मध्यान्हीचा सूर्य डोक्यावरून उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे गेला, म्हणजे त्या पाठोपाठ अभिसरण पर्जन्य पडतो.

रूआंडाच्या पश्चिमेकडील काँगो खोऱ्याचा भाग, बुरूंडी, मध्य आफ्रिका संघराज्य, गिनी किनाऱ्याचा दक्षिण नायजेरियापर्यंतचा भाग, आयव्हरी कोस्ट व घाना यांचा काही भाग येथे विषुववृत्तीय हवामान आढळते. येथे सतत ओला उन्हाळा हाच ऋतू असतो. अभिसरण पर्जन्य बारमहा व सपाटून पडतो. स्पष्ट असा कोरडा ऋतूच नसतो. विषुववृत्ताजवळ मार्च व सप्टेंबर हे दोन अतिपावसाचे महिने असतात. तेथून दूरदूर जावे तसतसे उन्हाळ्याच्या व अतिपावसाच्या काळांतील अंतर कमी होत जाते व मग उत्तरेकडे जुलै व दक्षिणेकडे जानेवारी हे उन्हाळ्याच्या मध्याचे महिने अतिपावसाचे महिने असतात. काँगोच्या खोऱ्यात सरासरी पर्जन्यमान १५० ते १७५ सेंमी. असते. परंतु पश्चिमेकडील काही भागात ते ३७५ ते ५०० सेंमी. पर्यंतही जाते. कॅमेरूनमधील पर्वतउतारांवर फार पाऊस पडतो. नेहमीच्या अभिसरण पर्जन्याला मे ते ऑक्टोबरपर्यंत अंतर्भागात जाणाऱ्या मोसमी वार्‍यांमुळे येणाऱ्या पावसाची जोड मिळाली, म्हणजे तेथे पाऊस सतत चालू असतो कोरडा ऋतू कधी येतच नाही. दूआला येथे ३९६ सेंमी. तर पोर्ट हारकोर्ट येथे २४९ सेंमी. पाऊस पडतो. जेथे मोसमी वार्‍यांचा प्रभाव अधिक आहे, तेथे पावसाळा सु. ७ महिने टिकतो व नंतर ५ महिने कोरडे जातात. त्यावेळी ईशान्येकडून कोरडे हरमॅटन वारे वाहतात. काँगोच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी तपमान २७ से. असते. त्यात वर्षभरात फारसा फरक पडत नाही. दैनिक तपमानकक्ष मात्र ७ ते ११ से. असते.

विषुववृत्तीय हवामानाच्या प्रदेशाभोवती सु.१४ उ. व १६ द. पर्यंत उष्णकटिबंधीय हवामानाचा गवताळ प्रदेश आहे त्याला सॅव्हाना म्हणतात. विषुववृत्तावरील केन्या, युगांडा वगैरे प्रदेश उंच पठारावर असल्यामुळे त्यांचे हवामान विषुववृत्तीय नसून उष्णकटिबंधीय असते. येथे ऋतूंचा फरक स्पष्टपणे जाणवतो. उन्हाळा कडक असतो व हिवाळ्यात थंडी नसली तरी तपमान सुं. ११ से. ने उतरते. पाऊस उन्हाळ्यात येतो व त्याचे प्रमाण ७५ सेंमी. ते १५० सेंमी. पर्यंत असते. युगांडा ते पश्चिम आफ्रिकेपर्यंतच्या प्रदेशात उन्हाळ्याचे सरासरी तपमान ३२ से. पर्यंत जाते व हिवाळ्यात ते १५ ते २० से. पर्यंत उतरते. उदा., कानो-एप्रिल ३१ से., जाने. २२ से. नैरोबी-मार्च व ऑक्टोवर १८ से., जुलै १५ से. दक्षिण गोलार्धात असे हवामान र्‍होडेशिया, झँबिया, मालावी व अंगोला येथे आढळते. हा बहुतेक भाग ९०० मी. पेक्षा उंच आहे. झँबीझीचे खोरेच फक्त कमी उंचीचे आहे. तेथे तपमान ३८ से. पर्यंत जाते. उंच भागात तपमान २७ से. पर्यंत असते. पावसाचे प्रमाण ७५ सेंमी. ते १२५ सेंमी. इतके असते.

या हवामानाच्या वाळवंटाकडील कोरड्या भागात उत्तर सूदान, केन्याचा उत्तरेकडील प्रदेश, युगांडाचा कारामोजा भाग, पूर्व आफ्रिकेचा न्यीका पट्टा, टांगानिकाचा दक्षिण भाग, उत्तर कालाहारी ते दक्षिण अंगोला हे प्रदेश येतात. तेथे तपमान वर्षभर जास्तच असते आणि पाऊस कमी असतो. उदा., केझ-मे ४२ से., दैनिककक्षा १७ से., पाऊस ७५ सेंमी. न्यामे-मे ४१ से., दैनिककक्षा १७ से., पाऊस ५८ सेंमी. डोडोमा-नोव्हें. ३१ से., दैनिककक्षा १३ से., पाऊस ५५ सेंमी. मॉन-ऑक्टो. ३५ से., दैनिककक्षा १७ से., पाऊस ४३ सेंमी. वार्षिक सरासरी तपमानकक्षा मात्र ५ से. ते ११ से. इतकीच असते. हिवाळ्यात थंडी अशी नसतेच. हा प्रदेश म्हणजे उष्णकटिबंधीय हवामान व मरुप्रदेशीय हवामान यांमधील संक्रमण प्रदेशच होय.

मरुप्रदेशीय हवामान हे उत्तरेकडे सहारा वाळवंटात व दक्षिणेकडे कालाहारी वाळवंट आणि नैर्ऋत्य आफ्रिका येथे आढळते. सहारा वाळवंट हे अटलांटिकपासून तांबड्या समुद्रापर्यंत पसरलेले असून त्याचा बहुतेक भाग अगदी ओसाड आहे. पृष्ठभाग वाळू, शिलाखंड, धूळ व लहानमोठे डोंगर यांनी भरलेला असून, बहुतेक काळ हवेचे वरून खाली येणारे प्रवाह चालू असतात थोड्याशा वाऱ्यानेही धूळ उडते व आकाश धूसर होते. गिरिपिंडाखेरीज इतरत्र वर्षेच्या वर्षे बिनपावसाची जातात. पावसाचा अभाव आणि मोठी तपमानकक्षा ही या हवामानाची वैशिष्ट्ये आहेत. उन्हाळ्यात तपमान ४३ सें. च्याही वर जाते. हवा कोरडी असल्यामुळे जमीन भराभर निवते व रात्री थंडी असते. हिवाळ्यात दिवसा तपमान सु. १६ से. असते आणि रात्री पाणी गोठण्याइतकी कडक थंडी पडते. मधूनमधून स्थानिक स्वरूपाची धुळीची जोरदार वादळे होतात. त्यांस सिमूम, सिरोक्को, खामसिन इ. स्थानिक नावे आहेत. कालाहारी वाळवंट ऑरेंज नदीपासून झँबीझीपर्यंत पसरलेले असून तेथे दक्षिणेकडे सु. २५ सेंमी. व उत्तरेकडे सु. ६०-६२ सेंमी. पर्यंत उन्हाळी पाऊस पडतो. हा भाग सहारासारखा अगदी वनस्पतिविरहित नाही. काही ना काही उपयुक्त वनस्पती सर्वत्र उगवते. उन्हाळ्याचे तपमान ३२ से. पर्यंत असते ते क्वचित ४१ से.पर्यंत जाते. हिवाळ्यात दिवसाचे तपमान २१ से. पर्यंत व रात्रीचे बर्फ पडण्याइतके असते. १,००० मी. वरील प्रदेशात कडक थंडी व जोरदार बर्फ पडते. नमीब, नैर्ऋत्य आफ्रिकेच्या पठाराचा दक्षिण भाग, नमाकालँड, दक्षिण आफ्रिकेच्या कारूचा कोरडा भाग व ऑरेंज खोऱ्याचा खालचा भाग यांचाही समावेश या प्रकारात होतो. येथे पाऊस १२ ते ४० सेंमी. पडतो व त्यापैकी निम्मा हिवाळ्यात पडतो. नमीब हा किनारी, ओसाड, अरुंद व वाळवंटी प्रदेश थंड व जवळजवळ पर्जन्यहीन आहे. तो अंगोलापासून केपपर्यंत पसरलेला आहे. मोसॅमीडीस येथे फक्त ८ सेंमी. पाऊस पडतो. बेंग्वेला समुद्रप्रवाहामुळे किनारी प्रदेशाची हवा थंड होते. अंतर्भागातील उंच प्रदेशाची हवा त्या मानाने उबदार राहते. दक्षिण आफ्रिकेच्या पठाराकडून येणारे उष्ण बर्ग वारे पुष्कळदा तपमान वाढवितात.

भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील मोरोक्को, अल्जीरिया व ट्युनिशिया येथे आणि केप प्रांताच्या नैर्ऋत्य भागात भूमध्यसागरी हवामान आढळते. हे प्रदेश डोंगराळ असून उंची व वाताभिमुखता यांप्रमाणे वादळी स्वरूपाचा सु. ३७ सेंमी. ते ७५ सेंमी. पाऊस हिवाळ्यात पडतो. उन्हाळात दीर्घ व कोरडा असतो. उत्तरेकडील प्रदेशात किनारपट्टी, ९०० ते १,२०० मी. उंचीचे पठार व ॲटलास पर्वताचे अरण्यमय उतार यांचाही समावेश होतो. पर्वतमय भागात उन्हाळा व हिवाळा दोन्ही वेळा भरपूर पाऊस पडतो. अटलांटिक किनाऱ्यावर थंड कानेरी प्रवाहाचा परिणाम होऊन उन्हाळा सौम्य होतो, हवा आर्द्र असते व तपमानकक्षा कमी असते. येथून पूर्वेकडे उन्हाळी तपमान वाढत जाते. मॉगॅदोर येथे २० से. तर अल्जीअर्स व ट्यूनिस येथे ३३ से. तपमान असते. तपमानकक्षा वाढत जाते. हिवाळ्यातील न्यूनभारांबरोबर पश्चिमी वारे व ढग येतात. अल्जीअर्स येथे जानेवारीचे सरासरी तपमान १३ से. असते. किनाऱ्यावर बर्फ क्वचितच पडते परंतु ॲटलास पर्वताच्या रांगांवर, तेथील शॉट्सच्या पठारावर व कोरड्या स्टेप भागात ते पुष्कळदा आढळते.

केप प्रांतातील भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश उत्तरेकडील प्रदेशाच्या मानाने लहान आहे. परंतु तेथे पाऊस व तपमान यांचे फरक अधिक मोठे आहेत. किनाऱ्यापासून थोडेसेच आत गेले, तरी उन्हाळ्यातील हवामान बेचैन करण्याइतके असते. वेलिंग्टन येथे जानेवारीचे सरासरी तपमान ३१ से. असते. किनारी भागात ते २१ते २३ से. पर्यंत असते. हिवाळ्यात वायव्येकडून व उन्हाळ्यात आग्नेयीकडून जोरदार वारे वाहतात. केपटाऊन येथे ६०-६५ सेंमी. पाऊस पडतो, परंतु डोंगराळ भागात तो १५०-१७५ सेंमी. पर्यंत जातो. उत्तरेकडे व अंतर्भागाकडे पावसाचे प्रमाण झपाट्याने कमी होते. कारूच्या बाजूला निमओसाड प्रदेशाच्या हवामानात रूपांतर होते. पावसाचे प्रमाण ३० सेंमी. ते १० सेंमी. पर्यंत कमी होते.

मोझँबीकच्या आग्नेयीकडील मैदानी प्रदेश व त्याच्या दक्षिणेची दक्षिण आफ्रिकेची चिंचोळी किनारपट्टी येथे आर्द्र, उपोष्णकटिबंधीय हवामान असते. येथे पाऊस मुख्यतः उन्हाळ्यात ७५ सेंमी. ते १२५ सेंमी. पर्यंत पडतो. उन्हाळ्याचे जानेवारीतील तपमान २५ से. ते ३० से. असते. जुलैत ते २२ से. ते २४ सें. असते. या वेळी हवा अतिशय सुखकारक असते. दरबान येथे जानेवारी २७ से., जुलै २२ से. व पाऊस सु. ११२ सेंमी. असतो.

मोझँबीकमधील पावसाळा नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत असून तो उत्तरेकडील आशियाई मान्सूनचाच विस्तार होय. हिवाळ्यातील व्यापारी वारे तेथे सहसा पाऊस आणीत नाहीत. मोझँबीक व नाताळ यांच्या किनाऱ्यावर उष्ण मोझँबीक प्रवाहाचा परिणाम होऊन तेथील तपमान थोडेसे वाढते.

दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख शेती प्रदेश व विट्वॉटर्झरँड हा खनिजयुक्त प्रदेश ९०० ते १,८०० मी. उंच असून त्याला हाय व्हेल्ड म्हणतात. तेथे सौम्य, पठारी  हवामान असते. स्वच्छ आकाश, कमी  पाऊस व दररोजच्या हवेत मोठा बदल हे या हवामानाचे विशेष होत. उन्हाळा उबदार असतो व पाऊस त्याचवेळी पडतो. यावेळी हवा शीतल असते. तपमान सु. २६ ते ३० से. पर्यंत असते व हिंदी महासागरावरून आलेल्या वार्‍यांबरोबर आलेल्या आर्द्रतेमुळे अभिसरणपर्जन्य सु. ५० सेंमी. ते १०० सेंमी. पर्यंत पडतो (जोहॅनिसबर्ग ७५ सेंमी., किंबर्ली ९० सेंमी.). तो पश्चिमेकडे कमी कमी होत जातो. हिवाळ्यातील हवा दिवसा सुखकर व रात्री मात्र थंड असते. यावेळी दक्षिणेकडून थंड हवेचे लोट येतात व त्यांमुळे कधी कधी डोंगरावर पाऊस व बर्फही पडतो. दऱ्याखोर्‍यांत दाट धुके दिसते व तपमानाची विपरीतताही काही भागांत अनुभवास येते. पूर्वेच्या प्रमुख पठारान्त कड्यांवर काही काही ठिकाणी आर्द्र, थंड व दाट धुके असलेले पर्वतीय हवामान असते.

रूवेनझोरी, केन्या, किलिमांजारो, एल्गन इ. उंच पर्वतांच्या उतारांवर आणि इथिओपियाच्या विस्तीर्ण पठारावर, १,८०० मी. पेक्षा अधिक उंचीवर पर्वतीय हवामान असते. उंची आणि विगोपन यांना अनुसरून हवामानात महत्त्वाचे स्थानिक फरक पडतात. पर्वतांची उंची ४,५०० मी. पेक्षा अधिक आहे. पठार मात्र सु. २,५०० मी. उंच आहे. १,८०० ते २,५०० मी. उंचीपर्यंत हवामान सुखकारक असते. इथिओपियातील पाऊस जून ते सप्टेंबरपर्यंत पडतो. तो मोसमी प्रकारचा असतो (अदिस अबाबा १२५ सेंमी.). दक्षिण गोलार्धात बोट्स्वानाच्या उंच प्रदेशात या प्रकारचे हवामान आहे. अधिक उंचीवरील डोंगर उतारांवर थंड, आर्द्र, धुक्याने युक्त हवामान असते. या सु. २,४०० मी. उंचीवरील ठिकाणी हिवाळ्यात जुलैचे सरासरी कमाल तपमान -४ से. व वार्षिक पाऊस ५५ सेंमी. असतो.

आफ्रिकेतील गोऱ्या लोकांच्या कायम वसाहतीच्या शक्यतेबाबत हवामान हा एक मोठा निर्णायक घटक आहे. गिनीच्या आखाताच्या किनारपट्टीवरील उष्ण, दमट व सापेक्षतः अनारोग्यकारक हवामानपरिस्थितीमुळे तो प्रदेश बराच काळपर्यंत ‘गोऱ्या माणसाचे स्मशान’ म्हणून ओळखला जात होता. याउलट पूर्व व दक्षिण आफ्रिकेच्या पठारी प्रदेशाचे, तेथील १,५०० मी. उंचीवरील अंतर्भागातील निरोगी हवामानामुळे यूरोपीयांस मोठेच आकर्षण वाटले. र्‍होडेशिया व दक्षिण आफ्रिका येथे त्यांच्या कायम वसाहती झाल्या. गोर्‍यांशिवाय इतरांना तेथे कायम वसाहती करू देण्यास बंदी घालण्याच्या त्यांच्या धोरणामुळे व मोझँबीक आणि अंगोला येथील पोर्तुगीज सत्ताधार्‍यांच्या त्यांना पाठिंबा देण्याच्या धोरणामुळे आफ्रिकेतील वंशभेद व वर्णभेदविषयक प्रश्नाला उग्र स्वरूप प्राप्त झाले आहे.

खनिजसंपत्ती : जगाच्या खनिज उत्पादनाच्या किंमतीचा ५ % भाग आफ्रिकेच्या खनिजांच्या किंमतीचा आहे. येथील बहुतेक सर्व खनिजे निर्यात होतात. अवजड खनिजांचे उत्पादन थोडेच आहे. कोळसा जागतिक उत्पादनाच्या २ % हून कमी, १९६० ते ७० च्या मध्यास पेट्रोलियम १ % पेक्षा कमी, मीठ १.५ %, बॉक्साइट १.५ % व लोहधातूक २ % एवढेच होते. याउलट काही मौल्यवान खनिजांबाबत आफ्रिका अग्रगण्य आहे. जगातील हिर्‍यांपैकी ९८% हिरे आफ्रिकेत मिळतात. झाईरेतील हिर्‍यांपैकी ८५ % उद्योगधंद्यांत वापरले जातात व फक्त १५ % रत्ने म्हणून उपयोगी पडतात. झाईरेमध्ये जगातील पहिली महत्त्वाची युरेनियमची खाण होती व कित्येक वर्षे रेडियम मिळण्याचे ते एकमेव ठिकाण होते. जगातील सोन्याचे निम्म्यापेक्षा अधिक उत्पादन आफ्रिकेत होते व त्यापैकी बरेच उत्पादन दक्षिण आफ्रिका संघराज्यात होते. पोलाद भक्कम करण्यासाठी लागणाऱ्या खनिजांचा बराच मोठा भाग आफ्रिकेतून येतो. कोबाल्टाच्या जागतिक उत्पादनाचा ७० % भाग झाईरेच्या कटांगा प्रांतातून व झँबियातून येतो. क्रोमधातुकाचा ४० % दक्षिण आफ्रिका संघराज्य व र्‍होडेशिया येथून, मँगेनीजचा ३० % घाना व झाईरेमधून व व्हॅनेडियमचा २० % नैर्ऋत्य आफ्रिका व झँबिया येथून येतो. अलोह खनिजांपैकी प्‍लॅटिनम २४ % द. आफ्रिका संघराज्य, तांबे २४ % झँबिया व कटांगा आणि कथील १५ % नायजेरिया येथे मिळते. जगातील २० % ॲसबेस्टॉस द. आफ्रिका, र्‍होडेशिया व स्वाझीलँडमधून येते, तर फॉस्फेट खडकाचा ३३ % हून अधिक पुरवठा अल्जीरिया, मोरोक्को व ट्युनिशिया येथून होतो. दुसऱ्या महायुद्धानंतर सहारामध्ये खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे साठे सापडले व खाणींपासून भूमध्य समुद्रापर्यंत नळ टाकले गेले. दक्षिण आफ्रिकेतील ऑरेंज फ्री स्टेटमधील विट्वॉटर्झरँडचा सोन्याच्या खाणींचा प्रदेश, युगांडातील कीलेंबे येथील तांबे सापडणारा प्रदेश, टांझानियातील म्पाँडा येथील शिशाची खाण व लायबीरियातील बोमिहिल्स लोहक्षेत्र येथील नवीन खाणींपर्यंत रेल्वे झाली. व्होल्टा प्रकल्पामुळे घानातील बॉक्साइटचे उत्पादन वाढले.

वनस्पती : आफ्रिकेतील नैसर्गिक वनस्पती म्हणजे अरण्ये, गवत व मरुप्रदेशीय वनस्पती ही होय. दाट अरण्ये व निबिड जाळ्या यांनी या खंडाचा एक दशांशाहूनही कमी भाग व्यापलेला आहे. त्याला लागून सॅव्हानाचा विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. उष्णकटिबंधाबाहेर अगदी उत्तरेला व अगदी दक्षिणेला भूमध्यसागरी वनस्पती आहेत. परंतु त्या एकमेकांपासून बऱ्याच वेगळ्या आहेत. उत्तरेकडील किनारी प्रदेशात यूरोपीय वनस्पतींचे प्राबल्य दिसते. ॲटलास पर्वतावर तद्देशीय वनस्पतीही आहेत. मोरोक्को, अल्जीरिया व ट्युनिशिया येथे ऑलिव्ह, द्राक्षे वगैरेंच्या लागवडीशिवाय बुचाचा ओक व ॲटलास सीडार यांची अरण्येही आहेत. या देशात व लिबियातही माकीची सदाहरित झुडुपे आढळतात. ॲटलासच्या उंच भागात व पश्चिमेकडील वाळवंटी भागात बऱ्याच ठिकाणी स्टेपगवत आहे. ईजिप्तच्या नाईलखोऱ्यातील समृद्ध शेती सर्वस्वी नाईलच्या पाण्यावर अवलंबून आहे. या देशाचा बाकीचा भाग निर्जल मरुप्रदेश आहे. सहाराच्या डोंगराळ भागात काही ठिकाणी

यूरोपीय सदृश वनस्पती आहे, तशीच ती मरूद्यानातही आढळते. मरूद्यानातील वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती म्हणजे खजुराची झाडे ताडाच्या व निवडुंगाच्या अनेक जातीही वाळवंटी प्रदेशात मधूनमधून दिसतात. युफोर्बिया हे झुंबरासारखे निवडुंगाच्या जातीचे झाड इथिओपियात अधिक दिसते. नाईलच्या वरच्या भागात पॅपीरसची झाडे आहेत. त्यापासून प्राचीन काळी लिहिण्यासाठी गुंडाळी तक्ते बनवीत असत. तथापि सहारातील मोठमोठे विस्तीर्ण प्रदेश अगदी वनस्पतिरहित आहेत.

सखल वर्षावनातील सर्वांत उंच झाडे ६०-६५ मीटरपर्यंत वाढतात. त्यांपैकी पुष्कळांच्या बुंध्यापाशी त्यांना आधार देणारे खोडाचे फाटे लांबपर्यंत गेलेले असतात. येथील बऱ्याच वृक्षांपासून मौल्यवान लाकूड मिळते. आफ्रिकन महॉगनी, इरोको, म्व्हूल, ओबेची, आफ्रिकन रोजवुड, आफ्रिकन ट्यूलिपवृक्ष, आफ्रिकन एबनी, रेड आयर्नवुड, अफ्रारा, यलो सॅटिनवुड, ॲलिग्ना, आफ्रिका ओक इ. वृक्ष यांपैकी होत. यांचा उपयोग रेल्वेचे स्लीपर, फर्निचर, आधाराचे खांब इ. अनेक प्रकारे होतो. काँगो झेब्रावुड नावाने निर्यात होणारे लाकूडही या भागात मिळते. काही वृक्षांच्या सालीपासून टॅनिन मिळते तर काहींच्या साली वल्कले म्हणून वस्त्रांऐवजी वापरता येतात. काही सालींपासून दोरही करता येतात. वर्षावनांत महालता व अपिवनस्पतीही पुष्कळ आहेत. स्थापरत्वे व ऋतुमानपरत्वे आंबा, चिंच, वड, निंब, हिरडा, बेहडा, रुद्राक्ष, अर्जुन, ऐन, किंजळ, मंजिष्ठ, बांबू, वेत यांच्या जातींची उपयुक्त झाडेही आहेत. ती बहुधा वर्षावने व गवताळ प्रदेश यांदरम्यानच्या संक्रमणप्रदेशात आढळतात. शियाच्या फळांपासून लोण्यासारखा पदार्थ तयार करतात तर मुसुंगा या झाडापासून एक तद्देशीय पेय बनवितात. वृक्षनेचे, ऑर्किड, बेगोनिया हे अनेक ठिकाणी आहेत. मोठ्या झाडांखाली लहानमोठी झुडुपे दाटीवाटीने उगवलेली दिसतात. रबर, कोको, कोला, रोबस्टाकॉफी यांच्या लागवडी या अरण्यप्रदेशात होतात. तेल्याताड व रेशमासारखा मऊ कापूस देणारे कापोकवृक्ष हे अरण्यप्रदेशात होतात. औषधी व सुवासिक वनस्पतीही आहेत. काँगोच्या खोऱ्यातील विषुववृत्तीय अरण्ये पूर्वेस मोठ्या सरोवरांपलीकडे गेलेली नाहीत. केन्यामधील काकामेगा अरण्यासारखे त्यांचे काही तुटक अरण्यविभाग मात्र आढळतात.

विषुववृत्तीय अरण्यांभोवती सर्व बाजूंनी सॅव्हानाचा विस्तीर्ण गवताळ प्रदेश पसरलेला आहे. एलफंटगवत हे त्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण गवत आहे. येथे अनेक प्रकारची गवते आहेत. त्यातच मधूनमधून रुंदपर्णी वनप्रदेश आहेत. पूर्व आफ्रिकेत त्यांना मायोंबो म्हणतात. या प्रदेशात एक ते अडीच मीटर उंच, झुपकेदार गवताचा सलग विभाग आढळतो त्यात ६ ते २० मी. उंचीची गाठाळ खोडांची झाडे दूरदूर अंतरावर उभी असलेली दिसतात. शेतीयोग्य भागात मधूनमधून शीनट, लोकस्टबीन, चिंच, गोरखचिंच वगैरे झाडे आढळतात. आर्द्र गवतप्रदेशात प्रवाहांच्या काठाकाठाने सदाहरित अरण्ये दिसतात. कोरड्या भागात लहान पानांची काटेरी झाडे आहेत. त्यात बाभळीच्या जातीचा झाडे येतात. दूरदूर अंतरावर छत्रीच्या आकाराची झाडे दिसतात. येथील गवतही कमी उंचीचे असते. झँबियात व जवळपासच्या भागात पानझडी वृक्ष आहेत, त्यांत र्‍होडेशियन साग हा महत्त्वाचा आहे. तेरड्यासारख्या पानझडी झुडुपांचे रान मोठ्या झाडांखाली वाढलेले दिसते. मनुष्यवस्ती व आग यांमुळे वृक्ष कमी होऊन सॅव्हाना प्रकारचे राठ गवत वाढते. काही गवते गुरांना चारा म्हणून उपयोगी पडतात तर काही घरांवरील छपरांसाठी वापरतात. व्हेल्डमधील काही गवते पहिल्या वाढीच्या काळातच गुरांना खाण्यास उपयोगी पडतात. उंच भागातील स्वीटव्हेल्डचे गवत वाळल्यावरही गुरांना खाण्यायोग्य व पोषक असते. झँबीझी व लिंपोपो यांच्या उष्ण, रूक्ष खोऱ्यात मोपेनचा वनप्रदेश आढळतो. त्यात काँगोकोपल नावाचे रोगण, राळ, हिराबोळ, गुग्गुळ या जातीचे पदार्थ देणारी झाडे आहेत. कालाहारीचा निमओसाड प्रदेश व सेनेगलपासून पूर्व आफ्रिकेपर्यंत गेलेला पट्टा हे भाग कोटेरी झुडुपांनी भरलेले आहेत. त्यांत बाभळीसारखी डिंक देणारी, मिर्‍हासारखी धूपाप्रमाणे सुवासिक पदार्थ देणारी झाडे आहेत. अनेक औषधी वनस्पतींही आहेत. येथील गवत लहान व सॅव्हानापेक्षा वाळवंटाजवळच्या स्टेपप्रकारचे आहे. पूर्वेच्या भागात देवनळ व ग्राउंडसेल ही उंच वाढणारी काटेरी झाडे आहेत. नदीमुख खाड्यांजवळ कच्छवनश्री आढळते. पूर्व आफ्रिकेत तिचे आशियायी कच्छवनश्रीशी साम्य दिसते. ती तांबड्या समुद्रापासून दरबानच्या दक्षिणेपर्यंत दिसून येते. पश्चिम किनाऱ्यावर सेनेगल नदीपासून अंगोलातील लोंगा नदीपर्यंत किनाऱ्यावर मधूनमधून कच्छवनश्री आहे. वाल्व्हिस बे पासून मोसॅमीडीसपर्यंतच्या भागात वेल चिटसचिया नावाचे फक्त आफ्रिकेतच आढळणारे एकमेव वैशिष्ट्यपूर्ण झुडूप उगवते. याचा मुळ्यासारखा सु. ३० सेंमी. जाडीचा भाग जमिनीखाली असतो व वरच्या बाजूस फक्त दोनच पाने येतात. ती देठापासून पुढे वाढत जातात व टोकाशी फाटून किंवा अन्य तऱ्हेने नाश पावत असतात.

पर्वतीय वनस्पतींत सदाहरित अरण्य, रुंदपर्णी व पानझडी वने, गवत व बांबू ही असतात. कमी उंचीवरील अरण्यांत वृक्षांवर भरपूर शेवाळे, नेचे व अपिवनस्पती असतात. या प्रकारच्या अरण्यांत ज्यूनिपर, पोडोकार्पस यांसारखे वृक्ष आहेत. यापेक्षा उंच भागात हॅगेनिया, निडिया (रोमठा), एरिका यांसारखी औषधी व रंग वगैरेंसाठी उपयोगी येणारी झाडे आहेत. त्यांवर भरपूर लिचेन्स(दगडफुलाच्या जातीची वनस्पती) असतात. १,५०० ते २,१०० मी. उंचीवर गवत असते. त्यापेक्षा अधिक उंचीवर गवत खुजे होत जाते. पर्वतीय वनस्पतींत व्हायोलेट, डॉक, क्रेनसबिल. वुडसॅनिकल, बटरकप, स्केबियस इ. युरोपीय जातींही आढळतात.

अगदी दक्षिणेस एका अरुंद पट्ट्यात केपमाकी आढळते. केपच्या वनस्पती समृद्ध असून ऑस्ट्रेलियन वनस्पतींशी त्याचे साम्य दिसते. तपकिरी किंवा राखी रंगाच्या माकीमध्ये तेल व राळ असते. सायप्रस पाइन, सिल्व्हर ट्री, क्लॅनविल्यमसीडार हे वृक्षही मधूनमधून आढळतात. ग्राऊंट ऑर्किड, ऑक्झॅलिस, जिरॅनियम व लिली या जातींची अनेक सुंदर झुडुपे आहेत. माकीच्या मागे कारुचा विशाल निमओसाड पठारी प्रदेश आहे. तेथे वनस्पतींच्या अनेक जाती आहेत.त्यांत पेंटिझा, क्रायसोकोमा, यूरिऑप्स, सॅलसोला, आर्टिप्लेक्स (चंदनबटवा) यांचा समावेश होतो.  ऑरेंज नदीच्या उत्तरेस काही विशिष्ट प्रकारची झुडुपे आहेत. त्यांबरोबर निवडुंगासारख्या जाड पानांची लहानमोठी झुडुपेही आहेत. त्यांतील काहींची पाने दगडासारखी दिसतात. कोरफड व युफोर्बिया ही तेथील अतिउंच झुडुपे होत. नदीनाल्यांकाठी बाभूळ व सदापर्णी सुमाक असतात. पूर्वेच्या बाजूस कारू वनस्पतींनी काही ठिकाणी गवताळ प्रदेशांवर आक्रमण केलेले दिसते. या गवताळ प्रदेशांना हायव्हेल्ड म्हणतात. त्यांनी १,००० मी. उंचीवरील मोठमोठे प्रदेश व्यापलेले आहेत. केप प्रांतातील सदाहरित अरण्य प्रदेश थोडाच आहे. त्यात क्नीस्ना हे मोठे अरण्य येते. तेथील वनस्पती उष्णकटिबंधीय पर्वतीय वनस्पतींसारख्या आहेत. त्यांत पोडोकार्पस, विड्रिंगटोनिया, रानटी ऑलिव्ह, ओकोटी (स्टिंकवुड) इ. वृक्ष आहेत.

मादागास्करच्या पूर्व भागात वर्षावने व पश्चिमेस पानझडी वृक्षांचे अरण्य आहे, मध्य भागी जवळजवळ वृक्षहीन गवताळ प्रदेश आहे. नैर्ऋत्य भागात जाड पानांच्या निवडुंगाच्या जातीच्या वनस्पती आहेत. मादागास्करमधील वनस्पती आफ्रिकेच्या मुख्य भूमीवरील वनस्पतीपेक्षा अगदी वेगळ्या व समृद्ध आहेत.

प्राणी : आफ्रिकेतील प्राणी संख्येने अफाट व विविध प्रकारचे आहेत. आफ्रिकेचा विस्तीर्ण भूप्रदेश, उष्णकटिबंधात समाविष्ट होणारा त्याचा मोठा भाग, यूरेशियाशी आलेला दीर्घकालीन संबंध व तेथून आफ्रिकेत आलेले अनेक प्रकारचे प्राणी, यांमुळे आफ्रिकेतील प्राण्यांची संख्या व विविधता यांस अनुकूल परिस्थिती मिळालेली आहे. येथील पूर्वीच्या शिकारी आदिवासींचा निर्वाह समृद्ध प्राणिजीवनाच्या शिलकी भागावर होई. त्यानंतर मानवाच्या वसत्या वाढू लागल्या तसतसे प्राण्यांचे जीवन संकुचित होऊ लागले. युरोपीयांच्या वसाहतींचा विकास या दृष्टीने फारच परिणामकारक झाला. वेगाने होणाऱ्या आर्थिक व राजकीय बदलांमुळे आफ्रिकेतील वैशिष्ट्यपूर्ण प्राणिजीवनावर अनिष्ट परिणाम होत आहे व ते टिकवून धरण्यासाठी खास प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे.

सहाराच्या दक्षिणेचा विशाल प्रदेश तृणजीवी प्राण्यांच्या मोठमोठ्या कळपांना व त्यांच्या मांसावर जगणाऱ्या हिंस्र प्राण्यांना भरपूर अन्न पुरवीत असे. याच्या उलट विषुववृत्तीय वर्षावनांच्या विस्तृत प्रदेशात तृणजीवींचे कळप राहूच शकत नाहीत. तेथे भूचर प्राणी विरळ व एकटेदुकटे आढळतात. उंच झाडांच्या शेंड्याजवळच्या भागात मात्र माकडे, पक्षी, साप मोठ्या संख्येने आढळतात. एकमेकांशी सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करीत उंचच उंच वाढणाऱ्या वृक्षांच्या तळांशी झुडुपांच्या गर्दीत कीटक फारच मोठ्या संख्येने वसती करतात. कीटक, पक्षी व माकडे यांच्या विविध आवाजांमुळे अरण्यमय प्रदेश सदैव गजबजलेला असतो. आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील प्रदेशातील प्राण्यांत दक्षिण यूरोपीय, भूमध्यसागरी व नैर्ऋत्य आशियाई प्राण्यांचे मिश्रण आढळते, तर ईशान्य आफ्रिकेत व इथिओपियाच्या पठारावरील प्राण्यांवर तांबड्या समुद्रापलीकडील अरबस्तानाच्या प्राण्यांचा प्रभाव दिसतो. मादागास्कर बेट फार पूर्वी मुख्य भूमीपासून अलग झाल्यामुळे तेथील प्राणिजीवन खंडाच्या मुख्य भूमीवरील प्राणिजीवनापेक्षा अगदीच निराळे आहे.

सस्तन प्राण्यांच्या एकूण १७ प्रमुख जातींपैकी १३ आफ्रिकेत आढळल्या आहेत. कीटकभक्षकांच्या सहा कुलांपैकी चार आफ्रिकेत मूळचीच आहेत. यांत मादागास्करचे टेनेरेक्स, उत्तर आफ्रिका ते केपपर्यंत आढळणाऱ्या एलेफंट चिचुंद्र्या, विषुववृत्तीय जलप्रवाहांतील ऑटर, इतर अनेक प्रकारच्या चिचुंद्र्या व हेजहॉग यांचा समावेश होतो. वटवाघुळे पुष्कळ आहेत. परंतु त्यांच्या १० प्रकारांपैकी खास आफ्रिकेचा असा एकही प्रकार नाही. फ्रूट बॅटची सर्वांत मोठी जात आफ्रिकेत आहे. पश्चिम आफ्रिकेत भयानक हॅमरहेड आहे. आफ्रिकेत व्हॅम्पायर बॅट मात्र मुळीच दिसत नाही.

आफ्रिकेत माकडांच्या अनेक जाती असून त्यांची संख्याही भरपूर आहे. वायव्य भागात बार्बरीकपी, गवताळ प्रदेशांत बुश बेबी, अरण्यात पॉटो, बॅबून इ. अनेक प्रकारची माकडे आहेत. गोरिला व चिंपांझी हे फक्त आफ्रिकेतच सापडतात. अँटईटर, मॅनॅटी, डुगाँग इ. अनेक प्राणी अरण्यात आहेत. ससे, घुशी, झाडावरच्या व जमिनीवरच्या तसेच उडत्या खारी, केळीतले उंदीर, साळिंदर, मुंगूस हे लहानमोठे प्राणी निरनिराळ्या भागांत आहेत. जेर्बोआ फक्त उत्तरेकडे सापडतो. इथिओपियात वाळवी खाणारा आर्डव्हार्क आहे. गवताळ प्रदेशांत व त्यांच्या अरण्यांना लागून असलेल्या भागात हत्ती, हायरॅक्स, झेब्रा, गाढव, गेंडा, अनेक प्रकारचे हरिण व कुरंग, फेनेक, एलंड, नू, इंपाला, ओकापी, मोठमोठे अजगर इ. प्राणी आहेत. निर्जल प्रदेशाकडील भागात जिराफ दिसतो. रानमेंढ्या, रानशेळ्या, हरणांच्या काही जाती. आयवेक्स हे फक्त उत्तर भागातच थोडेसे आहेत. वाळवंटी भागात उंट आढळतो. पाणथळ भागात हिपोपोटॅमस, बेडूक, नद्यासरोवरांतून सुसरी, कासव व अनेक प्रकारचे मासे आहेत. केप भागात मोठा काळा रेडा आढळतो. अजगराप्रमाणेच कोब्रा, मांबा, व्हायपर, पफगॅडर, हॉर्नड अँडट इ. अनेक जातीचे सर्प व पाली, सरडे, नाईल मॉनिटर हे आहेत.

तृणभक्षक प्राण्यांच्या मागावर सिंह, चित्ता, बिबळ्या, तरस, कोल्हा, सिव्हेट हे हिंस्त्र प्राणी असतात. आफ्रिकेत लांडगे व अस्वले मात्र नाहीत.

डास, माशा , कोळी, त्से त्से माशी, मुंग्या, मुंगळे, वाळवी, अळ्या, रंगीबेरंगी फुलपाखरे, मधमाशा इ. कीटक व तत्सम प्राणी, विशेषतः गवताळ भागांत व अरण्यातील झुडुपांत, असंख्य आहेत. पक्षीही पुष्कळ प्रकारचे आहेत. त्यांतील पुष्कळसे स्थलांतर करणारे आहेत. येथे आढळणाऱ्या पश्यांच्या सुमारे ७० प्रकारांपैकी शहामृग, सेक्रेटरीपक्षी, देवमाशासारख्या डोक्याचा करकोचा, टूरॅको किंवा केळीखाऊ उंदऱ्यापक्षी किंवा कोली, हेल्मेट, श्राइक्स, शुगरबर्ड हे खास आफ्रिकेतील आहेत. गिनीफाउल, ऑनपेकर्स, हनी गाइड्‍स हे खास इथिओपियन पक्षी आहेत. अरण्यभागाता मोर, पोपट वगैरेही दिसतात. सुंदर पिसाऱ्याचे अनेक पक्षी आहेत. गाणारे पक्षी क्वचितच दिसतात. घारी, गिधाडे, आयबिस, फ्‍लेमिंगो इ. पक्षीही आहेत.

केप भागात जॅकॲस, पेंग्विन व केपसील हे खास प्रकार आहेत. आफ्रिकेतील प्राणिजीवन इतके विविध व समृद्ध असूनही मानवाच्या आक्रमणामुळे त्यांतील काही दुर्मिळ जातीचे प्राणी नामशेष होतील की काय अशी भीती उत्पन्न झालेली आहे. अशा प्राण्यांचे रक्षण करण्याच्या योजना आखल्या जात आहेत.

कुमठेकर, ज. ब.

इतिहास व राजकीय स्थिती : भौगोलिक दृष्ट्या आफ्रिका हे खंड असले, तरी ऐतिहासिक, धार्मिक अगर वांशिक दृष्ट्या त्याचे दोन भिन्न भाग दृष्टोत्पत्तीस येतात. सहाराच्या प्रचंड वाळवंटाने ह्या खंडाचा सुमारे दोन पंचमांश भाग व्यापलेला असून त्यामुळे आफ्रिकेचे उत्तर व दक्षिण असे नैसर्गिक भाग पडलेले आहेत. सहाराचे वाळवंट दुर्गम असल्यामुळे त्याच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील भागांचा फारसा संपर्क राहू शकला नाही, त्यामुळे ह्या दोन भागांच्या सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय इतिहासात फार फरक आहे.

मानवी संस्कृतीचे अतिप्राचीन पुरावे आफ्रिकेत उपलब्ध झाले आहेत. त्यांवरून आफ्रिका खंडात मानवाची वस्ती १० लक्ष वर्षांपूर्वीपासून असली पाहिजे एवढेच नव्हे, तर जगातील पहिला मानव ह्याच भागात असावा, असे काही मानवशास्त्रज्ञांचे मत आहे. ज्ञात असलेल्या ऐतिहासिक पुराव्यांवरून असे दिसते, की ख्रि. पू. सु. साडेतीन हजार वर्षे उत्तर आफ्रिकेत ⇨ ईजिप्त संस्कृती अस्तित्वात होती. ईजिप्तच्या लोकांनी लेखी पुरावे बरेच ठेवले असल्यामुळे उत्तर आफ्रिकेच्या इतिहासावर प्रकाश पडतो. परंतु  सहाराच्या दक्षिणेकडील प्रदेशांच्या बाबतीत असा कोणताच पुरावा मिळत नसल्याने, त्या भागाच्या प्राचीन इतिहासासंबंधी अधिकृत माहिती मिळणे अशक्य झाले आहे.

ईजिप्त ही जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक संस्कृती समजण्यात येते. नाईल नदीच्या सुपीक खोऱ्यातील वस्तीमुळे प्राचीन काळी ईजिप्शियन लोक अत्यंत श्रीमंत बनले. ख्रि. पू. काळात बांधलेले अनेक प्रचंड पिरॅमिड ह्याची साक्ष देतात. ह्या लोकांनी आपल्या आजूबाजूच्या देशांशी व्यापारी संबंध ठेवले होते. भूमध्य समुद्रावरील आशियाई देशांच्या किनाऱ्यावरील प्रदेशांशी ईजिप्तच्या व्यापार्‍यांचा घनिष्ठ संबंध असावा असे दिसते. ख्रि. पू. २०००च्या सुमारास ईजिप्त व ⇨ फिनिशिया (हल्लीचा लेबानन) आणि शेजारील पश्चिम आशियातील देशांशी घनिष्ठ व्यापारी संबंध होता. ख्रि. पू. ११व्या शतकात फिनिशियाच्या साम्राज्याचा बराच विस्तार झाला व त्यांनी आफ्रिकेच्या उत्तरेस भूमध्य समूद्राच्या किनाऱ्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या. ख्रि. पू. ८१४ मध्ये फिनिशियाच्या लोकांनी ⇨ कार्थेज शहर वसविले. सध्याच्या ट्यूनिस शहराच्या आसमंतात हे शहर होते. ही फिनिशियाची संस्कृती अनेक शतके आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावर अस्तित्वात होती. परंतु पुढे तिला उतरती कळा लागली व शेवटी ख्रि. पू. १४६ मध्ये रोमन लोकांनी कार्थेजचा नाश केला व फिनिशियाच्या साम्राज्याचा अंत झाला.

ख्रि. पू. ५व्या व ६व्या शतकांत ग्रीक लोकांनीही आफ्रिकेच्या किनाऱ्यावर अनेक वसाहती स्थापन केल्या व आपला व्यापार वाढविला. परंतु अंतर्गत यादवी व इराणशी संघर्ष ह्यांमुळे ग्रीकांचे वर्चस्व कमी झाले. प्रथम रोमन लोकांनी कार्थेजच्या लोकांशी व्यापाराच्या वर्चस्वासाठी अनेक लढाया केल्या परंतु आपल्या वसाहती स्थापन केल्या नाहीत. रोमन लोकांनी इ. स. च्या सुरुवातीस ईजिप्त व्यापला व उत्तर आफ्रिकेचा प्रदेश रोमन साम्राज्याचा घटक बनला. रोमन साम्राज्यापूर्वी प्राचीन, ग्रीक साम्राज्ये ह्या प्रदेशात असली, तरी आफ्रिका हे नाव रोमन लोकांनी आपल्या कार्थेजच्या आजूबाजूच्या प्रांतास दिले व पुढे संपूर्ण खंडास तेच नाव मिळाले.

रोमन साम्राज्य आफ्रिकेत काही शतके टिकल्यावर ४२९ मध्ये व्हँडाल लोकांनी आफ्रिकेवर स्वारी केली व रोमन लोकांचे आफ्रिकेतील साम्राज्य नष्ट झाले. पुढे हा भाग ६व्या शतकात बायझंटिन साम्राज्याचा भाग बनला. हे साम्राज्य आफ्रिकेत सु. शंभर वर्षे टिकले. परंतु ६४२ मध्ये आशिया खंडातील अरब लोकांनी ईजिप्तवर स्वारी  करून उत्तर आफ्रिका जिंकण्यास सुरुवात केली व हळूहळू उत्तर आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याकडील मोरोक्कोपर्यंतचा सर्व प्रदेश अरबांनी पादाक्रांत केला. हे साम्राज्यसंपादन आठव्या शतकातही चालू होते व ह्या शतकाच्या अंतापूर्वी उत्तर आफ्रिकेवर अरबांचा संपूर्ण ताबा प्रस्थापित झाला होता.

ऐतिहासिक दृष्ट्या अरब लोकांनी अरबी भाषेचा व इस्लाम धर्माचा प्रसार ह्या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी केल्या. यो दोन गोष्टींमुळेच उत्तर आफ्रिकेतील अरब राष्ट्रांचा आशिया खंडातील अरब राष्ट्रांशी फार निकटचा संबंध आहे. आज अरब जगतातील नेत्यांचे अरब ऐक्याचे स्वप्‍न जर कधी साकार होणार असेल, तर त्याचा पाया ह्याच दोन गोष्टींवर आधारित असणार ह्यात शंका नाही.

अकराव्या शतकाच्या पूर्वीच पश्चिम आफ्रिकेतील बऱ्याच निग्रो राज्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला असे दिसते. आठव्या शतकापासून अकराव्या शतकापर्यंत घाना नावाचे एक निग्रो राज्य नायजर नदीच्या वरच्या भागात भरभराटीस आले होते. ह्या भरभराटीचे कारण म्हणजे सहारा वाळवंटातून होणाऱ्या व्यापारावरील त्यांचा ताबा. अकराव्या शतकात मालीक जातीच्या लोकांनी घानाचे राज्य पादाक्रांत केले व माली नावाचे साम्राज्य स्थापिले. मालीचे राज्यही सहारामधील व्यापारावरच भरभराटीस आले. परंतु सोळाव्या शतकात त्यासही उतरती कळा लगाली व शेवटी १५९१ मध्ये सोंघाई लोकांनी माली राज्य नष्ट केले व अशा रीतीने पश्चिम आफ्रिकेतील शेवटचे निग्रो राज्य नष्ट झाले.

आफ्रिका खंडाच्या आधुनिक इतिहासास धाडसी यूरोपीय प्रवासी व संशोधक यांच्या आगमनापासून सुरुवात होते. सहाराच्या उत्तरेकडील किनाऱ्याची यूरोपीय लोकांना अनेक शतकांपासून माहिती होती, परंतु आफ्रिकेच्या अंतर्भागाकडे त्यांचे लक्ष जाण्यास अनेक पिढ्यांचा कालावधी लागला. १४ व्या शतकात चीनमधील मिंग राजवंशाने मंगोलियन तार्तर लोकांचा पराजय केला व त्याच सुमारास मध्ये आशियात बरेचसे अंदाधुंदीचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे यूरोपमधून चीनकडे जाण्याचा खुष्कीचा मार्ग बंद पडला. आपला पूर्वेकडे असलेला व्यापार चालू ठेवण्यासाठी यूरोपीय लोकांना दुसरा मार्ग शोधून काढणे आवश्यक झाले. सहाराच्या दक्षिणेकडील प्रदेशांशी संपर्क साधून पोर्तुगीज नाविकांनी बरीच प्रगती केली. त्यास पोर्तुगालचा राजपुत्र हेन्‍री (१३९४-१४६०) ह्याचे प्रयत्न कारणीभूत झाले. प्रथम पोर्तुगीजांनी आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर संशोधन करून आपली व्यापारी ठाणी वसविली. पोर्तुगीजांनंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे १६ व्या शतकात व त्यानंतरही ब्रिटिश, फ्रेंच, डच इ. यूरोपीयनांनी या प्रदेशात आपापल्या लहान लहान वसाहती स्थापन केल्या. ह्या वसाहतींचा उपयोग मुख्यतः पूर्वेकडे जाणाऱ्या जहाजांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी होत असे. त्याखेरीज स्थानिक व्यापार्‍यांशी संपर्क साधून मालाची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाणही होत असे. ह्या सर्व व्यापारात मुख्य बाबी हस्तिदंत, सोने व गुलाम ह्या असत. ह्यातही गुलामांचा व्यापार हाच अत्यंत प्रमुख उद्योग असे. १४४१ साली पोर्तुगीज व्यापार्‍यांनी प्रथमच काही आफ्रिकी गुलाम पोर्तुगालला आणले होते परंतु गुलामांच्या व्यापाराला तेजी आली ती १६ व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच. शतकानुशतके अरब व्यापारी येथून गुलाम पळवून नेत व त्यांची मोठ्या प्रमाणावर पश्चिम आशियातील देशांत विक्री होई. आफ्रिकेतील मागासलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन यूरोपीय लोकांनी निग्रो जमातींत आपआपसात भांडणे लावली व त्यांच्यात गुलाम पकडण्यासाठी लढाया सुरू झाल्या. लढायांत पकडण्यात आलेले कैदी, गुलाम म्हणून या यूरोपीय व्यापार्‍यांना विकण्यात येत व असे गुलाम अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने अमेरिकेकडे पाठविण्यात येत असत. पश्चिम आफ्रिकेतील दाहोमीचा राजा दरवर्षी आपले सैन्य गुलाम पकडण्यासाठी शेजारच्या मुलखात पाठवीत असे. यूरोपीय व्यापार्‍यांनी आणलेल्या आकर्षक वस्तूंच्या अभिलाषेने अनेक आफ्रिकी टोळ्यांचे नेते आपल्या बांधवांनाच गुलाम म्हणून विकीत. कित्येक ठिकाणी तर गुलाम गोळा करणाऱ्या व्यापार्‍यांचे हस्तक रात्रीच्या वेळी निग्रो लोकांच्या वस्त्यांवर अचानक हल्ला करीत व आगी लावून देत व त्यातून जीव वाचविण्यासाठी पळणाऱ्या निरपराध निग्रोंची धरपकड करून त्यांना परदेशी पाठविण्यात येई. हा अत्यंत लाजिरवाणा व्यापार १६ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत अव्याहत चालू होता. ह्या तीनशे वर्षांच्या कालावधीत सुमारे दीड ते दोन कोटी निग्रो गुलाम अमेरिकेत पाठविण्यात आले. त्याखेरीज गुलामांना नेणाऱ्या जहाजांवरील परिस्थिती इतकी भयंकर असे, की तज्ञांच्या मताने सु. ४० ते ५० लक्ष निग्रो वाटेतच समुद्रप्रवासात मृत्युमुखी पडले असले पाहिजेत. गुलामांच्या या पारामागील निर्दयपणाची व अमानुष भूमिकेची माहिती ज्यावेळी यूरोपातील सामान्य जनतेस होऊ लागली, त्यावेळी ह्या पद्धतीविरुद्ध लोकमत प्रक्षुब्ध होऊ लागले. गुलामगिरी प्रतिबंधक चळवळीने व त्यामुळे झालेल्या कायद्यामुळे अमेरिका खंडातील गुलामांची मुक्तता झाली एवढेच नव्हे, तर ह्याच कारणाने कालांतराने आफ्रिकेतील चार निरनिराळ्या प्रदेशांवर त्याचा परिणाम झाला. १७८७ मध्ये ब्रिटिशांनी आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सिएरा लेओन प्रदेशात मुक्त झालेल्या गुलामांकरिता वसाहत स्थापन केली. त्यानंतर १८२१ मध्ये त्याच किनाऱ्यावर अमेरिकेन मुक्त केलेल्या गुलामांची वसाहत निर्माण केली. त्यासा लायबीरिया असे नाव देण्यात आले. ही वसाहत पुढे १८४७ मध्ये संपूर्ण स्वतंत्र झाली. यूरोपातील राष्ट्रांनी जरी गुलामगिरीस प्रतिबंध केला असला, तरी अरब देशांत तशी बंदी नसल्याने आफ्रिकेतील गुलामांचा व्यापार तेथे चालूच होता. त्यास आळा घालावा म्हणून १९ व्या शतकाच्या शेवटी ब्रिटिशांनी न्यासालँड व युगांडा हे प्रदेश आपल्या संरक्षणाखाली घेतले व तेथून गुलाम मिळवण्याचा अरबांचा मार्ग बंद केला.

औद्योगिक क्रांतीनंतर कच्च्या मालाच्या शोधासाठी यूरोपातील बहुतेक राष्ट्रांचे लक्ष आफ्रिकेवर केंद्रीभूत झाले. तेथून ताडाचे तेल, रबर व इमारती लाकडाचा भरपूर पुरवठा मिळू लागला. एवढेच नव्हे, तर तेथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करता कापूस, कॉफी, कोको, साखर वगैरे वस्तू फार मोठ्या प्रमाणावर मिळविण्याची शक्यता यूरोपीय लोकांना दिसू लागली. अर्थात ह्या वस्तूंसाठी यूरोपमध्ये फार मोठी बाजारपेठ मिळण्यासारखी होती. त्याउलट औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनात जी प्रचंड वाढ झाली, त्यामुळे तयार होणाऱ्या स्वस्त मालासाठी आफ्रिका ही नवी बाजारपेठही त्यांना मिळण्यासारखी होती. आफ्रिकेत कायमची वसाहत स्थापन करणारे पहिले यूरोपीय राज्य म्हणजे पोर्तुगाल. १४८२ मध्ये हल्ली ज्या प्रदेशास घाना म्हणतात, त्या प्रदेशाच्या किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी वस्ती केली. पुढल्याच शतकात त्यांनी अंगोला ह्या मोठ्या प्रदेशातही वसाहत स्थापिली. दक्षिण आफ्रिकेमध्ये केपटाऊन येथे डच लोकांनी १६५२ मध्ये आपल्या पूर्वेकडे जाणाऱ्या जहाजांसाठी पुरवठा केंद्र स्थापन केले. ह्याच केंद्राचे पुढे मोठ्या वसाहतीत रूपांतर झाले. त्यानंतर १६५८ मध्ये फ्रेंचांनी सेनेगलची वसाहत स्थापली. तत्पूर्वीच १५६२ मध्ये ब्रिटिशांनी गुलामांच्या व्यापारासाठी सिएरा लेओनमध्ये ठाणी स्थापन केली होती व पुढे १७८७ मध्ये मुक्त केलेल्या निग्रो गुलामांसाठी तेथेच वसाहत स्थापन करण्यात आली. १८०६ साली ब्रिटीशांनी केप ऑफ गुड होपवर आपली सत्ता प्रस्थापित केली. १८२२ मध्ये अमेरिकेत मुक्त झालेल्या गुलामांसाठी लायबीरिया नावाची वसाहत अमेरिकेतील संयुक्त संस्थानांनी स्थापन केली व पुढे ह्याच वसाहतीचे १८४७ मध्ये पहिले निग्रो प्रजासत्ताक म्हणून स्वतंत्र राज्यात रूपांतर झाले. एकंदरीत १९ व्या शतकाच्या मध्यापूर्वीच यूरोपीय राष्ट्रांनी आफ्रिकेतील आपल्या साम्राज्याचा पाया घातला होता. आफ्रिकेतील अंतर्गत प्रदेशाच्या पद्धतशीर संशोधनाचा प्रयत्न १७८८ मध्ये स्थापन झालेल्या ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या आफ्रिका-संघ ह्या संस्थेने केला.

आफ्रिका खंडाच्या अंतर्गत प्रदेशाचा जसजसा शोध लागू लागला, तसतशी त्यावर ताबा मिळविण्याची स्पर्धाच सुरू झाली. अशा रीतीने यूरोपातील विविध राष्ट्रांमध्ये वसाहतींसाठी चुरस चालू असता अमेरिकेसह चौदा राष्ट्रांनी १८८४ साली आफ्रिकाविषयक एक परिषद बर्लिनमध्ये भरविली. ह्या परिषदेत एक तह करण्यात आला. त्याप्रमाणे काँगो नदीवरील वाहतुकीवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण असावे व आफ्रिकेतील कोणत्याही प्रदेशावरची कोणत्याही राष्ट्राची कायदेशीर मालकी त्या प्रदेशाच्या प्रत्यक्ष ताब्यावरून ठरविण्यात यावी, असे ठरले. आपल्या राज्यव्यवस्थेस पोषक म्हणून ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या कार्याला उत्तेजन देण्यात यावे, असेही त्या तहान्वये ठरविण्यात आले. बर्लिन परिषदेनंतर आफ्रिकेत उरलेल्या भागावर ताबा मिळविण्यासाठी जास्तच धडपड सुरू झाली. १९०४ मध्ये फ्रान्सने ब्रिटनला ईजिप्तच्या बाबतीत संपूर्ण मुभा दिली व ब्रिटनकडून आपल्या मोरोक्कोवरच्या सत्तेला मान्यता मिळविली. त्यावेळी स्पेनच्या ताब्यात असलेल्या भागांवर स्पेनचा संपूर्ण अधिकार मानण्यात आला व अशा रीतीने आपल्या जिब्राल्टरवरील अधिकारास फ्रान्सकडून धोका निर्माण होऊ नये, अशी ब्रिटनने दक्षता घेतली. १९१४ साली पहिले महायुद्ध सुरू झाले त्यावेळी लायबीरिया व इथिओपिया यांचे अपवाद वगळता संपूर्ण आफ्रिका खंड यूरोपीय राष्ट्रांच्या गुलामगिरीत सापडला होता.

पहिला महायुद्धात एका बाजूला जर्मनी, ऑस्ट्रिया व तुर्कस्तान हे प्रमुख देश, तर दुसऱ्या बाजूस ब्रिटन, फ्रान्स, इटली, रशिया वगैरे देश होते. ह्यांपैकी जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स व इटली ह्यांच्या वसाहती आफ्रिकेत असल्यामुळे तेवढ्यापुरता आफ्रिकेचा पहिल्या महायुद्धाशी संबंध पोचतो. पहिले महायुद्ध सुरू होताक्षणीच जर्मनीच्या आफ्रिकेतील व इतर भागांतील सर्व वसाहती जिंकून घ्यावयाच्या असे इंग्‍लड, फ्रान्स आदी दोस्त राष्ट्रांनी ठरविले व त्याप्रमाणे आफ्रिका खंडातील जर्मन वसाहतींवर सर्व बाजूंनी हल्ला करण्यास सुरुवात झाली. या महायुद्धात जर्मनीचा पराजय झाला व त्यानंतर व्हर्सायच्या तहान्वये जर्मनीच्या युद्धापूर्वीच्या सर्व वसाहती काढून आपल्या ताब्यात घेण्याचे दोस्त राष्ट्रांनी ठरविले. परंतु त्या कोणत्या स्वरूपात घ्याव्या, ह्माबद्दल दोस्त राष्ट्रांत बराच वादविवाद झाला. ज्या राष्ट्रांना युद्धात विजयी झाल्यामुळे अशा वसाहतींचा प्रत्यक्ष कबजा मिळाला होता, त्यांना आपला अधिकार सोडण्याची अगर मर्यादित करण्याची इच्छा नव्हती. त्यांच्या मते अशा वसाहती ज्या राष्ट्रांच्या ताब्यात आल्या, त्या राष्ट्रांनी त्या आपल्या वसाहतींत सामील करून घ्याव्या व त्यांची आपल्या पद्धतीने वहिवाट करावी. परंतु त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष विल्सन ह्यांनी असा आग्रह धरला, की ह्या वसाहती जेत्या राष्ट्रांनी एक प्रकारचे विश्वस्त ह्या नात्यानेच आपल्या ताब्यात घेतल्या पाहिजेत. त्यांची राज्यव्यवस्था अशा प्रकारे असावयाय पाहिजे, की त्या वसाहतींना स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाप्रमाणे स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा अधिकार शक्य तितक्या लवकर प्राप्त झाला पाहिजे. अशा सर्व प्रदेशांना महादिष्ट प्रदेश असे म्हणण्यात येऊ लागले. राष्ट्रसंघाच्या महादेशाप्रमाणे १९१९ मध्ये आफ्रिकेतील पूर्वीच्या जर्मन वसाहती ब्रिटन, फ्रान्स व बेल्जिमय ह्या तीन राष्ट्रांमध्ये विभागण्यात आल्या. अशा राज्यकारभारावर देखरेख ठेवण्यासाठी राष्ट्रसंघातर्फे अकरा सभासदांचे एक स्थायी मंडळ नेमण्यात आले. राज्यकर्त्या सरकारच्या प्रतिनिधीस आपल्या समक्ष बोलावून महादिष्ट प्रदेशातील सर्वांगीण प्रगती कशी होत आहे, ह्यासंबंधी विचारणा होई. वसाहतींच्या सामान्य राज्यपद्धतीत व महादिष्ट प्रदेशांच्या राज्यपद्धतीत फारसा फरक नसला, तरी राज्यकर्त्या राष्ट्रांवर राष्ट्रसंघाची व पुढे संयुक्त राष्ट्रांची देखरेख राहिली व ह्याचा ह्या भागांच्या स्वातंत्र्याच्या वाटचालीवर परिणाम झाला.

पहिल्या महायुद्धापासून ते दुसऱ्या महायुद्धापर्यंतच्या काळात बहुतेक सर्व आफ्रिका खंड वसाहतवादी यूरोपीय राष्ट्रांच्या ताब्यात होता. पुढे १९२० मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप, नाताळ, ऑरेंज फ्री स्टेट व ट्रान्सव्हाल ह्या चार ब्रिटिश वसाहतींचे एकत्रीकरण होऊन त्यांचे एक संघराज्य निर्माण झाले. हे राज्य जरी ब्रिटिश राजकारणापासून स्वतंत्र झाले असले, तरी तेथे थोड्या गोऱ्या लोकांचेच राज्य असल्यामुळे खऱ्या अर्थाने त्यास आफ्रिकेतील स्वतंत्र राष्ट्र म्हणता येत नाही. त्यानंतरच्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत संपूर्ण स्वतंत्र झालेले राष्ट्र म्हणजे ईजिप्त. १९२२ मध्ये ईजिप्तला संपूर्ण स्वातंत्र्य देणे ब्रिटनला भाग पडले. ईजिप्त हा आफ्रिकेतील चौथा स्वतंत्र देश झाला. परंतु थोड्याच वर्षांत इथिओपिया हा देश इटलीच्या साम्राज्यशाहीस बळी पडला. १९११ पासून इटलीचा प्रयत्न उत्तरेकडील लिबियाचा प्रदेश जिंकण्याचा होता. त्यात १९३२ साली इटलीस यश आले. पुढे १९३५ मध्ये फ्रान्स व इंग्‍लंडच्या मूकसंमतीवरून इटलीने इथिओपियावर आक्रमण केले व १९३६ मध्ये हे सबंध राज्य इटलीच्या आफ्रिकन साम्राज्यात समाविष्ट झाले. हे दोन्ही देश राष्ट्रसंघाचे सभासद असूनही राष्ट्रसंघ इटलीच्या साम्राज्यतृष्णेला पायबंद घालू शकला नाही.

प्रत्येक वसाहतवादी राष्ट्राने आपल्या वसाहतींवर आपली राज्यपद्धती, आपली संस्कृती, आपली भाषा व आपला धर्म लादण्याचा प्रयत्‍न केला. वसाहतवाद्यांनी शिक्षणसंस्था काढल्या, पण त्या सर्व आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी दुय्यम दर्जाचे कर्मचारी मिळावेत म्हणून. अनेक वर्षांची वसाहतवादी राजवट असूनही बेल्जियम काँगो (सध्याचे झाईरे) स्वतंत्र झाला. आधुनिक पद्धतीचे शिक्षण सुरू केले, पण ते स्थानिक भाषेतून न देता वसाहतवादी राष्ट्रांच्या भाषांतूनच देण्यात आले व त्यामुळेच आज बऱ्याच स्वतंत्र आफ्रिकी राष्ट्रांना आपली राष्ट्रभाषा म्हणून इंग्रजीचा अगर फ्रेंचचा अवलंब करावा लागला आहे. कोणत्याही राष्ट्राने स्वतंत्रपणे राज्यकारभार करू शकतील असे कार्यकुशल कर्मचारी तयार केले नाहीत अगर त्यासाठी आवश्यक असे ज्ञानही दिले नाही. थोडक्यात बहुतेक सर्व वसाहतवादी राष्ट्रे स्वतःच्या देशांत लोकशाही असूनही आफ्रिकेत मात्र त्याविरुद्ध वागली व आफ्रिकेत आपली जुलमी राजसत्ता आपल्या स्वार्थासाठी चिरकाळ टिकावी, असे त्यांनी धोरण ठेवले. तेथे निर्माण झालेल्या राष्ट्रवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव दुसऱ्या महायुद्धाच्या अंतापर्यंत ह्या साम्राज्यवादी राष्ट्रांच्या ध्यानी आला नाही.

दुसरे महायुद्ध जगातील सर्व भागांत लढले गेले एवढेच नव्हे, तर ते युद्ध संपल्यानंतरही त्याचा जगातील राजकारणावर विलक्षण परिणाम झालेला आहे. पहिल्या महायुद्धाप्रमाणे हेही युद्ध यूरोपातच सुरू झाले. युद्ध करणारी महत्त्वाची राष्ट्रेही तीच होती. फरक एवढाच होता, की पहिल्या महायुद्धामध्ये यूरोपातील इटली व आशियातील जपान जर्मनीविरुद्ध होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांची जर्मनीशी युती झाली होती. पहिल्या महायुद्धाचा आफ्रिकेशा संबंध आला तो प्रामुख्याने आफ्रिकेतील जर्मन वसाहतींमुळे, दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेचा संबंध आला तो इटलीच्या आफ्रिकेतील साम्राज्यामुळे. १९३५ मध्ये इटलीचा हुकूमशहा मुसोलिनीने ह्याने इथिओपिया जिंकून इटलीच्या साम्राज्यात समाविष्ट केला. ह्या विजयामुळे मुसोलिनीने दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेतही आक्रमक धोरण अंमलात आणण्याचे ठरविले. विशेषतः यूरोपात फ्रान्सचा पराभव झाल्यामुळे इटलीच्या महत्त्वाकांक्षेस उत्तेजनच मिळाले. आफ्रिकेतील ब्रिटिश व फ्रेंच वर्चस्व नष्ट करावयाचे असा त्याने डाव रचलाच, पण त्याबरोबर पश्चिम आशियातील ह्या राष्ट्रांचे महत्त्व कमी करावयाचे व इंग्रजांचा हिंदुस्थानाकडचा  मार्गही बंद करावयाचा असा इटलीचा हेतू होता. ह्या दृष्टीने इटलीने आपल्या लिबिया व इथिओपिया ह्या प्रदेशांतून ईजिप्त व ब्रिटिश वसाहतींवर चाल केली व सुएझच्या कालव्यास धोका निर्माण झाला.

दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेतील रणांगणाचा विस्तार उत्तरेस मोरोक्को व लिबियापासून पूर्वेस इथिओपिया व इटालियन सोमालीलँडपर्यंत होता. जनरल रोमेल ह्याच्या जर्मन सैन्याच्या मदतीने सुरुवातीस इटलीला या मोहिमेत यश येण्याची चिन्हे दिसत होती. हा डाव यशस्वी झाल्यास ब्रिटिशांच्या आफ्रिकेतील साम्राज्यास मोठा धोका निर्माण झाला असता एवढेच नाही, तर भूमध्य समुद्रावर शत्रूचा संपूर्ण ताबा झाल्यामुळे ब्रिटन आदी दोस्त राष्ट्रांच्या आशिया खंडातील साम्राज्यासही भय निर्माण झाले असते. म्हणून ब्रिटिशांनी प्रयत्‍नांची शिकस्त करून इटली व जर्मनी ह्यांचा हल्ला थोपविला. जनरल माँगमरी ह्यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश फौजेने शत्रूचा पार नायनाट करून आफ्रिकेतून त्याचे उच्चाटन केले. ह्यात भारतीय सैन्याचा वाटा मोठा होता. ह्या विजयामुळेच पुढे यूरोपात जर्मनी विरुद्ध दुसरी आघाडी दोस्त राष्ट्रांना उघडता आली. मे १९४३ पर्यंत आफ्रिकेत सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली. १९४५ साली दुसरे महायुद्ध समाप्त झाले. ह्या युद्धातही जर्मनी व त्याच्या साथीदार राष्ट्रांचा पराजय झाला.  आफ्रिका खंडाच्या दृष्टीने विचार करता पहिल्या महायुद्धानंतर ज्याप्रमाणे आपल्या वसाहती जर्मनीस गमवाव्या लागल्या, त्याप्रमाणे ह्या युद्धाच्या अखेरीस इटलीस आपले आफ्रिकेतील साम्राज्य गमवावे लागले. १९४१ साली इटलीपासून इथिओपियाची मुक्ती करण्यात येऊन तेथे पूर्वीची राजवट स्थापन करण्यात आली. पण इटलीच्या लिबिया वगैरे भागांचे पुढे काय करावयाचे, हा प्रश्न विजेत्या राष्ट्रांपुढे आला.

पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली व त्या संस्थेच्या तत्त्वप्रणालीस अनुसरून जर्मन वसाहती जेत्या राष्ट्रांच्या ताब्यात महादिष्ट प्रदेश म्हणून सोपवण्यात आल्या. ह्याच तत्त्वप्रणालीमुळे आफ्रिकेतील वसाहतशाहीत खितपत पडलेल्या जनतेमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला. १९३० नंतर आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांमध्ये राजकीय पक्ष निर्माण झाले व त्यांनी आपल्या राजकीय हक्कांची जाणीव आफ्रिकेतील जनतेस करून देण्याच्या प्रयत्‍न केला. दुसरे महायुद्ध सुरू होताच आफ्रिकेमध्ये अस्थिरतेचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले. १९४१ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट व ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल ह्यांनी घोषित केलेल्या अटलांटिक सनदेद्वारे, इंग्‍लंड-अमेरिकादी दोस्त राष्ट्रांना कोणाचेही राज्य लुबाडायचे नाही, युद्धोत्तर काळात होणारे राजकीय व भौगोलिक फरक स्थानिक लोकांच्या इच्छेनुसारच करण्यात येतील व जगातील सर्व लोकांना स्वयंनिर्णयाचा हक्क राहील हे सर्व जगास जाहीर केले.

दुसरे महायुद्ध सुरू होताच राष्ट्रसंघ मृतप्राय झाला व त्याचे कार्य स्थगित झाले. परंतु १९४५ मध्ये महायुद्धाची समाप्ती झाल्याबरोबर संयुक्त राष्ट्रे ह्या संघटनेची स्थापना झाली व तिने पूर्वीच्या राष्ट्रसंघाचे कार्य विस्तृत प्रमाणात आपल्या शिरावर घेतले. राष्ट्रसंघाच्या देखरेखीखालील महादिष्ट प्रदेश संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली आले व त्यासाठी संयुक्त राष्ट्र विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्यात आली. फक्त नैर्ऋत्य आफ्रिकेचा प्रदेश दक्षिण आफ्रिका संघराज्याच्या ताब्यात राहिला कारण दक्षिण आफ्रिकेने संयुक्त राष्ट्रांच्या हक्क अमान्य केला. सर्व विश्वस्त प्रदेश आज स्वतंत्र झाले असूनही हा प्रदेश मात्र दक्षिण आफ्रिकेच्या कचाट्यात अजून आहे.

दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतरच्या राजकीय घटना महत्त्वाच्या आहेत. पराभूत राष्ट्रांना आपल्या ताब्यातील वसाहती गमवाव्या लागल्या, ही घटना समजण्यासारखी आहे. परंतु ज्या राष्ट्रांचा महायुद्धात विजय झाला, त्यांचीही साम्राज्ये नष्ट झाली ही अर्थपूर्ण घटना आहे. ह्यास अनुसरूनच युद्धोत्तर काळात आफ्रिका खंडातील ब्रिटन, फ्रान्स आदी वसाहतवादी राष्ट्रांना आपल्या वसाहतींतील जनतेला स्वातंत्र्य देणे भाग पडले. आज एखादा अपवाद सोडल्यास, आफ्रिका खंडातून वसाहतवादाचा अंत झाला आहे, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही.

आफ्रिका खंडात राजकीय जागृती इतकी जलद व क्रांतिकारक झाली, की महायुद्ध संपताच स्वातंत्र्यप्राप्तीच्या आकांक्षेची लाट सबंध आफ्रिका खंडावरून गेली. अरब, निग्रो अगर अन्य नेत्यांना आपल्या राजकीय शक्तीची जाणीव झाली व त्यांनी आपल्या राज्यकर्त्यांकडे स्वातंत्र्याची मागणी केली. १९४५ पर्यंत आफ्रिका खंड संपूर्णपणे वसाहतवाद्यांच्या ताब्यात होते व ह्या वसाहतवादाची मुळे इतकी खोलवर रूजली होती, की इतक्या शीघ्र गतीने आफ्रिकी राष्ट्रे स्वातंत्र्याची वाटचाल करतील, अशी कल्पनादेखील ह्या साम्राज्यवादी राष्ट्रांना आली नाही. १९५० ते १९६० ह्या दहा वर्षांत एकामागून एक आफ्रिकी देश स्वतंत्र झाले. यास संयुक्त राष्ट्र संघटनेची पुष्कळच मदत झाली. अशा रीतीने स्वतंत्र होण्यात लिबियाचा पहिला क्रमांक लागला (१९५१). त्यानंतर १९५६ मध्ये ट्युनिशियाने फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळविले. मोरोक्को १९५६ मध्ये संपूर्णपणे स्वतंत्र राष्ट्र बनले. ह्याच साली सूदानचे प्रजासत्ताक राज्यही उदयास आले व तेथील इंग्‍लंडची व ईजिप्तची सत्ता संपुष्टात आली. ईजिप्त पूर्वीपासूनच स्वतंत्र होता. अशी रीतीने १९५६ पर्यंत उत्तर आफ्रिकेतील अरब राष्ट्रे स्वतंत्र झाली. फक्त अल्जीरिया फ्रेंच सत्तेखाली राहिला व स्वातंत्र्यासाठी त्याला १९६२ पर्यंत झगडावे लागले.

सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकी राष्ट्रांची स्वातंत्र्याची वाटचाल काहीशी मंद होती. १८४७ साली लायबीरिया स्वतंत्र झाला. त्यानंतर ११० वर्षांनी म्हणजे १९५७ मध्ये घाना हा स्वतंत्र होणारा पहिला निग्रो देश होय. ब्रिटिश वसाहतवादाच्या काळात ह्या भागास गोल्ड कोस्ट म्हणत असत. घानाचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाल्याबरोबर सहाराच्या दक्षिणेकडील निग्रो राष्ट्रांतील स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व घानाकडे ओघानेच आले. १९५८ मध्ये गिनी ह्या पश्चिम किनाऱ्यावरील फ्रेंच वसाहतीने स्वातंत्र्य जाहीर केले.

आफ्रिकेच्या, विशेषतः निग्रो आफ्रिकेच्या, इतिहासात १९६० हे वर्ष सुवर्णाक्षरांनी लिहावयास पाहिजे. ह्याच वर्षी पूर्वीच्या १७ वसाहतींची साम्राज्यवादी राष्ट्रांच्या हातून सुटका झाली. त्यांपैकी १२ फ्रेंच वसाहती होत्या. मध्य आफ्रिका प्रजासत्ताक, चॅड, काँगो, दाहोमी, गाबाँ, आयव्हरी कोस्ट, मादागास्कर, माली, मॉरिटॅनिया, नायजर, सेनेगल व अपर व्होल्टा ह्या त्या वसाहती होत. त्यांखेरीज काँगो ही बेल्जियमची वसाहत, नायजेरिया ही ब्रिटिश वसाहत व कॅमेरून, सोमालिया व टोगो हे संयुक्त राष्ट्रांच्या विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखालील प्रदेशही ह्याच वर्षी स्वतंत्र झाले. १९६० नंतरही निरनिराळे देश स्वतंत्र झाले. सिएरा लेओन व टांगानिका ह्या दोन ब्रिटिश वसाहतींची १९६१ मध्ये मुक्तता झाली. पुढच्याच वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या विश्वस्त मंडळाच्या प्रदेशांपैकी रूआंडा-ऊरूंडी हा बेल्जियमच्या देखरेखीखालील प्रदेश स्वतंत्र होऊन त्यांची रूआंडा व बुरूंडी ह्या नावांची दोन स्वतंत्र राष्ट्रे झाली. ब्रिटिश वसाहतींपैकी पूर्व आफ्रिकेतील युगांडा ही वसाहत स्वतंत्र झाली. परंतु ह्या सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उत्तर आफ्रिकेतील फ्रान्सच्या ताब्यातील अल्जीरिया हा देशही मुक्त झाला. आफ्रिकेतील इतर राष्ट्रांच्या मानाने अल्जीरियाला फार खडतर तपश्चर्या करावी लागली. अल्जीरियातील गोऱ्या वसाहतवाल्यांनीच फ्रान्सविरुद्ध १९५८ मध्ये बंड उभारले व त्याचाच परिणाम म्हणून प्रत्यक्ष फ्रान्समध्येच राज्यक्रांती होण्याचा प्रसंग आला व जनरल द गॉल ह्यांच्या हाती सूत्रे देण्यात आली. त्यांनी वसाहतीस स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करून दिला. परंतु गोऱ्या लोकांच्या हटवादीपणामुळे अल्जीरियाला त्याचा तात्काळ लाभ मिळू शकला नाही. शेवटी लक्षावधी फ्रेंच व अल्जीरियन नागरिकांचे बळी पडल्यावर १९६२ मध्ये सार्वमतानंतर अल्जीरियाला स्वातंत्र्य मिळाले.

आफ्रिकी राष्ट्रांची स्वातंत्र्याकडील वाटचाल अजूनही संपली नाही. १९६३ मध्ये झांझिबार हा ब्रिटिश वसाहतीचा प्रदेश स्वतंत्र झाला, परंतु जानेवारी १९६४ मध्येच तेथे राज्यक्रांती झाली व नव्या सरकारने टांगानिकाशी संलग्न होण्याचे ठरविले. त्यानुसार टांगानिका व झांझिबार ह्यांचे टांझानियाचे संयुक्त प्रजासत्ताक ह्या नावाने एप्रिल १९६४ मध्ये एकत्रीकरण झाले. त्याच सुमारास पूर्व आफ्रिकेतील केन्याच्या वसाहतीसही डिसेंबर १९६३ मध्ये राष्ट्रकुलांतर्गत स्वातंत्र्य मिळाले. पुढल्याच वर्षी म्हणजे डिसेंबर १९६४ मध्ये केन्या प्रजासत्ताक राज्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. तथापि अद्यापही तो देश राष्ट्रकुलात आहे. त्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील ब्रिटिशांच्या ताब्यातील सेनेगलनजीकचा गँबियाचा प्रदेश फेब्रुवारी १९६५ मध्ये स्वतंत्र झाला. अशा रीतीने १९५० ते १९६५ ह्या कालावधीत आफ्रिकेतील बहुतेक सर्व राष्ट्रे स्वतंत्र झाली.

आफ्रिकेतील स्वातंत्र्याचा इतिहास हा जगातील इतर खंडांतील स्वातंत्र्याच्या इतिहासाहून भिन्न आहे. ज्या शीघ्रगतीने आफ्रिकेत स्वातंत्र्य आले, ती तर राजकारणाच्या अभ्यासकांना आश्चर्याचा धक्का देणारी आहे. १९५० पासून १९६५ पर्यंत अवघ्या पंधरा वर्षांच्या कालावधीत एवढा प्रचंड खंड परकीय राजसत्तांचे जू झुगारू शकला, ह्या घटनेला तशीच महत्त्वाची कारणपरंपरा असली पाहिजे. परकीय राजसत्तांनी आपल्या स्वार्थासाठी जरी वसाहतींचा राज्यकारभार केला असला, तरी त्यासाठीच त्यांना स्थानिक प्रजेला, कमीत कमी का होईना, शिक्षण देणे आवश्यक झाले. ह्या शिक्षणामुळे आफ्रिकेमध्ये एक प्रकारचा मध्यमवर्ग निर्माण झाला. ह्यात वकील, शिक्षक, सामान्य व्यापारी इत्यादींचा समावेश होतो. यूरोपीय वसाहतवाद्यांचे अस्तित्व व त्यांच्याच हितासाठी चाललेला राज्यकारभार पाहून ह्या मध्यमवर्गीय जनतेतून स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी पुढारी लाभले. राष्ट्रीयत्वाची भावना राजकीय सरहद्दी न जुमानता सबंध आफ्रिकेत पसरली. कारण आफ्रिकेतील प्रत्येक लहान प्रदेशसुद्धा कोणत्यातरी यूरोपीय सत्तेच्या गुलामगिरीत होताच. दुसऱ्या महायुद्धामुळे ह्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेस जोराची चालना मिळाली. लक्षावधी आफ्रिकन सैनिक आफ्रिकेत अगर युरोपात राज्यकर्त्या राष्ट्रांच्या सैनिकांबरोबर खांद्यास खांदा लावून लढले. ह्या प्रसंगामुळे त्यांनी जे पाहिले व अनुभवले, त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला व परकीय सत्ता झुगारून दिलीच पाहिजे ही भावना दृढमूल झाली. युद्धकाळातील अटलांटिक सनद व इतर घोषणांमुळे दलित राष्ट्रांतील जनतेला आशाचे किरण दिसू लागले. संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीला अंशतः पायबंद घालण्याच्या दृष्टीने इंग्रज अगर फ्रेंच राजसत्तेने स्थानिक प्रजेस अधिकाधिक अधिकार देण्यास सुरुवात केली. त्यामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनेस अधिकच जोर चढू लागला व संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय तरणोपाय नाही, ही भावना आफ्रिकी जनतेत दृढतर झाली. १९५० नंतर अत्यंत शीघ्र गतीने आलेल्या स्वातंत्र्याला जी अनेक कारणे होती, त्यांत तेथील सामान्य जनतेत निर्माण झालेली राष्ट्रीयत्वाची प्रखर भावना हे प्रमुख कारण आहे. तथापि एवढे एकच कारण आफ्रिकी राष्ट्रांना स्वातंत्र्याप्रत नेण्यास पुरेसे नव्हते. दुसऱ्या महायुद्धानंतर वसाहतवादी राष्ट्रांची जागतिक राजकारणातील प्रतिष्ठा कमी झाली. १९ व्या शतकात यूरोपीय राष्ट्रांनी आपल्या मर्जीप्रमाणे आफ्रिका खंडाची वाटणी आपापसात करून घेतली. पहिल्या महायुद्धानंतर यूरोपातील राष्ट्रे, विशेषतः पश्चिम यूरोपातील वसाहतवादी राष्ट्रे, काहीशी कमकुवत झाली आणि दुसऱ्या महायुद्धानंतर या राष्ट्रांना दुय्यम स्थान प्राप्त झाले व राजकीय वर्चस्वाचा मध्यबिंदू पश्चिम यूरोपातून अमेरिका व रशियाकडे सरकला. जागतिक राजकारणात दोन परस्परविरुद्ध तट निर्माण झाले व त्यांतूनच शीतयुद्ध जन्मास आले. त्याचा फायदा आफ्रिकी राष्ट्रांना मिळाला. राष्ट्रीयत्वाच्या भावनेने आफ्रिकी राष्ट्रांतील प्रजेची स्वातंत्र्याची मागणी वसाहतवादी राष्ट्रांना अवमानणे शक्य झाले नाही. शीतयुद्धातील दोनही बाजूंनी आफ्रिकी जनतेला आपल्या बाजूला वळविण्याचा अटोकाट प्रयत्‍न सुरू केला. एका बाजूला साम्यवाद्यांचे भय व दुसऱ्या बाजूस अमेरिकेसारख्या प्रबळ राजसत्तेचे दडपण, ह्या कारणांमुळे ब्रिटिश, फ्रेंच व इतर वसाहतवादी राष्ट्रांना आपली सत्ता सोडणे भाग पडले. अमेरिका अगर रशिया ह्यांपैकी कोणाच्याही वसाहती आफ्रिकेत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या सहानुभूतीचा फायदा आफ्रिकी राष्ट्रांना मिळाला ह्यात शंका नाही.

गेल्या शंभर वर्षांतील, विशेषतः विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील, आशिया खंडातील क्रांतिकारक चळवळींचा आफ्रिकेतील जनमतावर परिणाम झाला. भारतातील स्वातंत्र्याच्या लढ्याकडे आफ्रिकन जनतेचे लक्ष आकर्षित झाले. महात्मा गांधीच्या नेतृत्वाने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत झालेली अहिंसात्मक असहकाराची चळवळ व त्यानंतर त्यांच्याच पुढारीपणाखाली अखिल भारतात झालेली स्वातंत्र्याची चळवळ, ह्यांनी आफ्रिकन राष्ट्रवादी प्रभावित झाले. बलाढ्य राष्ट्राविरुद्धही निःशस्त्र प्रतिकाराची चळवळ यशस्वी होऊ शकते, हे आफ्रिकी  राष्ट्रांना शिकावयास मिळाले.

आशिया खंडातील भारत व इतर राष्ट्रे स्वतंत्र झाल्याबरोबर वसाहतींत खितपत पडलेल्या आफ्रिकेतील जनतेकडे ह्या राष्ट्रांचे लक्ष गेले व १९५५ साली इंडोनेशियात बांडुंग येथे पहिली आफ्रो-आशियाई परिषद भरली. त्यांत भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा प्रमुख भाग होता. एकोणतीस आशियाई व आफ्रिकी देशांच्या प्रतिनिधींनी ह्या परिषदेत भाग घेऊन वसाहतवाद, वर्णविद्वेष व आर्थिक उन्नती अशा प्रश्नांवर विचारविनिमय केला. त्याचा आफ्रिकेतील राजकारणावर निःसशय परिणाम झाला. संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थामधेही भारत व इतर आशियाई देशांनी वसाहतवादाविरुद्ध जोराचा प्रचार करून प्रश्न, प्रस्ताव वगैरे मार्गांनी वसाहतवादी राष्ट्रांना जर्जर केले व आफ्रिकेतील राष्ट्रांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न धसास लावला. विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखाली नसलेल्या वसाहतींच्या राजकीय जीवनावर संयुक्त राष्ट्रे व त्यातील आशियाई आफ्रिकी राष्ट्रांचा प्रभाव पडला आहे. प्रत्येक सभासदाने संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे ७३ वे कलम मान्य केले. त्यानुसार आपल्या वसाहतीतील प्रजेचे हित सांभाळणे हे प्रत्येक राष्ट्राचे कर्तव्य आहे, त्या वसाहतीतील जनतेची स्वातंत्र्यप्राप्तीच्या दृष्टीने प्रगती करविणे हा त्यांचा धर्म आहे, वगैरे तत्त्वे आता मान्य केलेली आहेत. ह्याच कलमान्वये वसाहतवादी राष्ट्रांना आपल्या ताब्यातील प्रदेशाची प्रगती कशी होत आहे, ह्यासंबंधी संयुक्त राष्ट्रांकडे निवेदनही करणे भाग आहे. अशा निवेदनांवरील चर्चेच्या निमित्ताने भारत व त्याच्या सहकारी देशांनी वसाहतवादी राष्ट्रांवर प्रश्नांचा भडिमार करून त्यांच्या ताब्यातील वसाहतींना मुक्ती मिळवून देण्याचे कामी पुष्कळच साहाय्य केले.

आफ्रिकेतील राजकीय प्रगतीस साम्यवादी राष्ट्रांचेही पर्यायाने साहाय्य झाले. आफ्रिकेतील प्रत्येक प्रश्नावर सामान्य जनतेची बाजू घेऊन वसाहतवादी राष्ट्रांना शह देण्याचा प्रयत्‍न सोव्हिएट रशियाने अव्याहत चालू ठेवला. ह्याउलट अमेरिकेनेही वसाहतवादी राष्ट्रांवर दडपण आणाले. शीतयुद्धाचा फायदा आफ्रिकेतील राष्ट्रांनी घेतला. वसाहतवादी राष्ट्रांनी, विशेषतः ब्रिटन व फ्रान्स यांनी, काळाचा ओघ ओळखून आपल्या धोरणात फरक केला. एकोणिसाव्या शतकात कायदा व सुव्यवस्था सांभाळणे एवढेच वसाहतवादी शासनाचे ध्येय असे. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांच्या दृष्टिकोनातच आमूलाग्र बदल झाला. आपल्या ताब्यातील प्रेदशांना स्वराज्याच्या मार्गावर नेणे हे ध्येय जागतिक परिस्थितीमुळे ठेवणे त्यांना भाग पडले. महायुद्धानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ज्याप्रमाणे ब्रिटिशांनी भारत, ब्रह्मदेश, श्रीलंका वगैरे देशांस स्वातंत्र्य दिले, त्याचप्रमाणे आफ्रिकेतही त्यांनी काळाची पावले ओळखली व आपल्या ताब्यातील वसाहतींस स्वराज्य देण्यास सुरुवात केली. फ्रान्सने जरी काही काळ हा ओघ अडविण्याचा प्रयत्‍न केला असला, तरी अध्यक्ष द गॉल ह्यांच्या आगमनानंतर त्यांनी वसाहतींना सरसहा स्वातंत्र्य देण्याच्या धोरणाचा अंगीकार केला. त्यामुळे फ्रेंच वसाहतींची स्वातंत्र्याची वाटचाल जलद होऊ शकली. पोर्तुगाल व स्पेनच्या वसाहतवादी शासकांना अजूनही ही बुद्धी होत नाही. सहानुभूतीच्या धोरणामुळेच ब्रिटिशांच्या वसाहतवादातून मुक्त झालेले बहुतेक सर्व देश राष्ट्रकुलाचे सभासद आहेत. त्याचप्रमाणे मुक्त झालेल्या फ्रेंच वसाहतींनी फ्रेंच राष्ट्रकुलात राहण्याचे ठरविले आहे.

स्वातंत्र्य मिळविण्यापेक्षा स्वातंत्र्य टिकविणे जास्त कठीण आहे, ह्याची जाणीव नवोदित आफ्रिकी राष्ट्रांना होऊ लागली आहे. सर्व नवी राष्ट्रे आपल्या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांशी सहकार्याने वागत आहेत. आफ्रिकेत नैसर्गिक संपत्ती विपुल आहे, परंतु त्या संपत्तीचा योग्य तऱ्हेने विनियोग होण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक ज्ञानाचा व पैशाचा अभाव ह्यांमुळे आपल्या विकासासाठी बाहेरील राष्ट्रांची आर्थिक व वैज्ञानिक मदत घेण्याखेरीज त्यांना गत्यंतर नाही. पूर्वीची वसाहतवादी राष्ट्रे आपल्या राष्ट्रकुलात समाविष्ट झालेल्या नव्या राष्ट्रांना सढळ हाताने साहाय्य करीत आहेत. परंतु ज्यांचा वसाहतवादाशी काहीही संबंध नाही, अशी राष्ट्रेही ह्या नवीन राष्ट्रांना मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. सोव्हिएट रशियानेही आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांना आर्थिक व लष्करी मदत केली आहे. अमेरिकाही वाढत्या प्रमाणात आफ्रिकी राष्ट्रांना मदत देत आहे.

अलिप्ततेचे धोरण जरी काही अंशी यशस्वी झाले असे भासले, तरी ह्या राष्ट्रांच्या संरक्षणाचा प्रश्न शिल्लक राहतोच. अमेरिका अगर रशिया, इंग्लंड अगर फ्रान्स ह्यांच्या तोडीचा लष्करी दृष्टया बलवान असा एकही देश आजच्या आफ्रिका खंडात नाही. युद्धसामग्रीसाठी ह्या सर्व देशांना यूरोप-अमेरिकेकडे याचना करावी लागते. वसाहतवादाच्या राज्यकारभारामुळे कोणत्याही देशात, विशेषतः सहाराच्या दक्षिणेकडील प्रदेशात, आत्मसंरक्षणापुरती लष्करी क्षमता नाही. ब्रिटिश अगर फ्रेंच वसाहतवादातून मुक्त झालेली बरीचशी आफ्रिकी राष्ट्रे अजूनही ब्रिटिश अगर फ्रेंच राष्ट्रकुलात आहेत, ह्याचे इंगित ह्यातच आहे. मूळच्या वसाहतवादी राष्ट्रांकडून जशी आर्थिक मदत ह्या राष्ट्रांना मिळू शकते, त्याचप्रमाणे  अवश्य वाटल्यास लष्करी मदतही मिळू शकेल, ही कल्पना ह्या राष्ट्रांना आहे. ह्या सर्व राष्ट्रांचे आशास्थान जर कोणते असेल, तर संयुक्त राष्ट्रे ही संघटना होय. ह्या संघटनेत कितीही दोष असले व अजूनही जागतिक शांतता प्रस्थापित करण्यात ह्या संघटनेस यश आले नसले, तरी लहान राष्ट्रांना ह्या संघटनेमुळे आधार वाटतो हे निश्चित. संयुक्त राष्ट्रांमुळे आफ्रिकेचा अनेक तऱ्हेने फायदा झाला आहे, ह्यात मुळीच शंका नाही. भारतासारख्या स्वतंत्र आशियाई देशांनी ह्या संघटनेत प्रवेश केल्यापासून आफ्रिकेतील वसाहतवादाविरुद्ध काहूर माजविले व गेल्या दहा वर्षांत आफ्रिकेतील स्वातंत्र्याची वाटचाल इतक्या झपाट्याने झाली, ह्याला बऱ्याच अंशी संयुक्त राष्ट्रे ही संघटनाच कारणीभूत आहे. जसजसा एकामागून एक देश स्वतंत्र होऊन संयुक्त राष्ट्राचा सभासद होऊ लागला, तसतसा प्रगतीचा वेग वाढू लागला व आज ह्याच आफ्रिकेतील स्वतंत्र राज्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. ह्या लहान आफ्रिकी राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रांत आपला एक स्वतंत्र गट तयार केला आहे. आशियाई गटाच्या सहकार्याने त्याचे महत्त्व खूपच वाढले असून संयुक्त राष्ट्रांचा कोणताही प्रस्ताव ह्या ⇨ आफ्रो-आशियाई गटाच्या सहकार्याशिवाय संमत होणे कठीण होत आहे. संयुक्त राष्ट्रे व तत्संबंधित इतर आंतरराष्ट्रीय संस्था आफ्रिकेच्या आर्थिक व तांत्रिक विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, हेही ह्या संघटनांतून आफ्रिकी राष्ट्रांना मिळालेल्या महत्त्वाचे द्योतक आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बाहेरही आफ्रिकी ऐक्याची आवश्यकता अनेक वर्ष आफ्रिकी पुढाऱ्यांना वाटत आली आहे. आफ्रिकी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आफ्रिकी ऐक्याच्या कल्पनेस अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी समस्त आफ्रिकन जनतेने एकत्रित होऊन वसाहतवादाविरुद्ध लढा दिला पाहिजे, ही कल्पना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच आफ्रिकी जनतेपुढे ठेवण्यात आली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या कल्पनेचा उगम आफ्रिका खंडात न होता अमेरिकेत व वेस्ट इंडीजमध्ये झाला. एच्. एस्. विल्यम्स नावाच्या एका वेस्ट इंडियन वकीलाने लंडनमध्ये १९०० साली पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरविली. ह्या परिषदेत हजर असलेल्या द्यूब्वा नावाच्या एका अमेरिकन निग्रो पुढाऱ्याने ह्या कल्पनेस पहिल्या महायुद्धानंतर जोराची चालना दिली. १९१९ मध्ये पॅरिस येथे त्याने पहिली अखिल आफ्रिकन काँग्रेस बोलावली. द्यूब्वाच्याच नेतृत्वाने पुढे दोन तीन परिषदा झाल्या व आफ्रिकी ऐक्याची कल्पना आफ्रिकी जनतेच्या मनात रुजू लागली. शेवटची मोठी परिषद दुसऱ्या महायुद्धानंतर १९४५ साली मँचेस्टर येथे भरली व त्यातील वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष आफ्रिकेतील पुढाऱ्यांनी त्यात सक्रिय भाग घेतला. ह्या परिषदेत वसाहतवादाखाली दडपलेल्या जनतेस स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एक होण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु त्यानंतर आफ्रिकेतील निरनिराळ्या वसाहतींतून स्वातंत्र्याच्या चळवळी फोफावू लागल्या व त्यामुळे अखिल आफ्रिका ऐक्याची कल्पना काहीशी मागे पडली असली, तरी ह्या सर्व चळवळींना त्या कल्पनेने प्रेरणा दिली ह्यात संशय नाही.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही अखिल आफ्रिकी ऐक्याची कल्पना आफ्रिकी पुढाऱ्यांच्या मनात आहे. घानाचे राष्ट्र स्वतंत्र झाल्याबरोबर घानाचा पुढारी ⇨ एनक्रूमाह ह्याने पहिली आफ्रिकी जनता परिषद १९५८ मध्ये ॲक्रा येथे भरविली व त्यानंतरही त्या दिशेने प्रयत्न चालू आहेत. आफ्रिकी जनतेचे राजकीय ऐक्य असण्याची जास्त आवश्यकता आहे, असे आफ्रिकी पुढाऱ्यांना आता वाटू लागले आहे. परंतु अलीकडील विचारप्रवाहात आफ्रिकी जनतेच्या ऐक्यापेक्षा आफ्रिकेतील राष्ट्रांच्या ऐक्यावर विशेष भर देण्यात येत आहे. आफ्रिकी राष्ट्रांची आर्थिक उन्नती परस्पर सहकार्याशिवाय होणे कठीण आहे, ह्याची जाणीव सर्व आफ्रिकी राष्ट्रांस झाली आहे व यूरोपीय सामायिक बाजारपेठेच्या धर्तीवर अनेक योजना आफ्रिकी राष्ट्रांमध्ये करण्यात आल्या आहेत. परंतु अखिल आफ्रिकी ऐक्याची कल्पना म्हणजे अमेरिकेतील संयुक्त संस्थानांप्रमाणेच आफ्रिकी संयुक्त संस्थाने निर्माण व्हावीत ही कल्पना अद्यापही स्वप्तवत आहे, कारण अशा ऐक्याच्या मार्गात अनेक अडचणी आहेत.

पहिली अडचण म्हणजे आफ्रिका खंड यूरोप व अमेरिकेपेक्षा विस्ताराने फार मोठे आहे. त्यात शेकडो निरनिराळ्या भाषा बोलल्या जातात, एवढेच नव्हे तर त्यात अनेक भिन्न संस्कृती आहेत. विशेषतः सहाराच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील भागांत राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या फार फरक आहे. उत्तरेकडील राष्ट्रे इस्लामधर्मीय असून अरबी भाषा व अरबी संस्कृती तेथे दृढमूल झाली आहे. सहाराच्या दक्षिणेकडे मात्र निग्रो वस्ती असल्याने त्यांचा अरब राष्ट्रांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित होणे कठीण आहे. ह्याखेरीज आफ्रिकेत अनेक यूरोपीय राष्ट्रांनी वसाहती राज्यकारभार केल्यामुळे स्थानिक संस्कृतींत परिवर्तन घडून आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही अनेक आफ्रिकी राष्ट्रांनी आपली राष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी अगर फ्रेंच भाषेचा अवलंब केला आहे. स्वातंत्र्यप्राप्ती होईपर्यंत प्रत्येक राष्ट्रापुढे एकच ध्येय होते व त्यामुळे ऐक्याची कल्पना जागृत राहिली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपली स्वतःची सर्वांगीण उन्नती हेच ध्येय प्रामुख्याने आफ्रिकी पुढाऱ्यांपुढे असल्याने आफ्रिकी ऐक्याच्या कल्पनेस धक्का बसल्याशिवाय रहात नाही. पुढाऱ्यांमधील व्यक्तिगत मोठेपणासाठी चाललेली  स्पर्धा व मत्सरही ह्या कल्पनेस बाधक ठरणे शक्य आहे.

उत्तर आफ्रिकेतील अरब राष्ट्रांचा ह्या दृष्टीने स्वतंत्र विचार करणे आवश्यक आहे. सहाराच्या उत्तरेकडील प्रदेश जरी भौगोलिक दृष्ट्या आफ्रिका खंडात असला, तरी अलीकडे शेकडो वर्षे त्या भागाचा संबंध भाषा, धर्म व संस्कृतीमुळे आशिया खंडातील अरबी राष्ट्रांशी निकटचा आहे. ऐतिहासिक दृष्टीनेसुद्धा जवळजवळ पहिल्या महायुद्धापर्यंत हा बहुतेक प्रदेश तुर्कस्तानच्या साम्राज्यात होता व त्यामुळे आफ्रिकेतील व आशियातील अरब राष्ट्रांत एकात्मतेची भावना वाढीस लागली. दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मास आलेल्या इझ्राएल राष्ट्रामुळे अरब ऐक्याच्या चळवळीस महत्त्व प्राप्त झाले आहे. आशियातील अगर आफ्रिकेतील सर्व अरब राष्ट्रे इझ्राएलला आपला कट्टर शत्रू समजतात व त्याच्या नाशाकरता ऐक्य करण्याच्या खटपटीत ती राष्ट्रे आहेत. ⇨ अरब लीगची स्थापना करण्यामागे आशियातील व आफ्रिकेतील अरब राष्ट्रांची एकी करणे व इझ्राएलचा नाश करणे, हे प्रमुख हेतू आहेत. ह्या चळवळीचे पुढारीपण ईजिप्तकडे असल्यामुळे उत्तर आफ्रिकेतील राष्ट्रांचे लक्ष अखिल आफ्रिकी ऐक्यापेक्षा अरब ऐक्याकडेच जास्त राहणार असे वाटते.

सहाराच्या उत्तरेकडील प्रदेशात जरी फ्रेंच, इंग्रज इ. यूरोपीय राजसत्तांचा अंमल होता, तरी तेथील अरबी भाषा व संस्कृती नष्ट होऊ शकली नाही. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर ती राष्ट्रे इझ्राएलविरोधापुरती तरी एकत्र येऊ शकली. सहाराच्या दक्षिणेकडील परिस्थिती फार वेगळी आहे. ह्या प्रदेशांत बहुतेक सर्व निग्रो वंशाचे लोक आहेत. वसाहतवादामुळे त्या देशांतील मूळच्या संस्कृती जवळजवळ नष्ट झाल्या आहेत. परकीय राजसत्तांनी आपापल्या प्रदेशांत आपल्या स्वदेशातील शिक्षणाचा व संस्कृतीचा प्रसार केल्यामुळे एकाच वंशाचे लोक असूनही निरनिराळ्या प्रदेशातील लोक एकमेकांपासून दुरावले. राजकीय दृष्टीनेही त्यांचा विकास वेगळ्या तऱ्हेने झालेला आहे. उदा., ब्रिटिश वसाहतींमध्ये संसदीय लोकशाही निर्माण करण्याचे ध्येय ब्रिटिश राज्यकर्त्यांनी ठेवल्यामुळे त्यास अनुसरून लोकशाही संस्था व परंपरा निर्माण केल्या. ह्याउलट फ्रान्सने असे न केल्यामुळे फ्रेंच वसाहतींत लोकशाही निर्माण होऊ शकली नाही. बेल्जियमने काँगोमध्ये स्थानिक जनतेस कोणत्याही प्रकारचे हक्क मिळू दिले नाहीत. अखिल आफ्रिकी ऐक्याच्या बाबतीत मुख्य अडचण आहे, ती अंगोला व मोझँबीक ह्या पोर्तुगीज वसाहतींची व ऱ्होडेशिया व दक्षिण आफ्रिकेसारख्या गोऱ्या लोकांच्या राज्यांची [→ सकल अरबवाद सकल आफ्रिकावाद].

आफ्रिकी देशांशी भारताचे संबंध जुने असून महत्त्वाचे आहेत. आफ्रिका खंडात व्यापाराच्या निमित्ताने हजारो भारतीय गेले. भारतीय मजुरांची साखरेच्या मळ्यात काम करण्यासाठी आयात करण्यात आली व पुढे वर्षानुवर्षे ही पद्धत चालू होती. परंतु १९११ मध्ये ही पद्धत बंद करण्यात आली. तोवर जवळजवळ दीड लक्ष हिंदी कामगार दक्षिण आफ्रिकेत गेले असावेत. ह्याच कालात काही हिंदी व्यापाऱ्यांनीही तेथे प्रवेश मिळवला व दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांची संख्या वाढत वाढत साडेचार लक्षांवर गेली. पूर्व आफ्रिकेत मात्र प्रथम १८९६ चे सुमारास हिंदी मजूर केन्या-युगांडा लोहमार्ग बांधण्याच्या कामासाठी नेण्यात आले. ही संख्या वाढत ३२,००० पर्यंत गेली व त्यांचे काम संपल्यावरही त्यांतील बहुतेक सर्व तेथेच राहिले. त्याच सुमारास बरेच हिंदी व्यापारीही पूर्व आफ्रिकेत गेले व तेथाल व्यापारी जीवनात त्यांनी महत्त्वाचे स्थान मिळविले.

आफ्रिका खंडातील व्यापार व उद्योगधंद्यांच्या विकासात भारतीयांचा मोठा वाटा होता. उदा., दक्षिण आफ्रिकेत त्यांनी कोळशाच्या खाणी, लोहमार्ग, ऊसाचे मळे, फळे व भाजीपाल्याच्या बागा इ. क्षेत्रांत कामगिरी केली एवढेच नव्हे, तर देशातील दूरदूरच्या खेड्यापाड्यांत माल पोचवून तेथील जनतेची सेवा केली. अशा रीतीने दक्षिण व पूर्व आफ्रिकेच्या आर्थिक विकासात यूरोपीय लोकांप्रमाणेच भारतीय लोकांचाही हिस्सा महत्त्वाचा होता. भारतीयांच्या कामगिरीसंबंधी चर्चिल ह्यांनी प्रशंसोद् गारआहेत. जेथे गोरा मनुष्य जगणे शक्य नाही, अगर त्याला पोटापुरेते मिळविणे अशक्य झाले असते, तेथे हिंदी माणसाने व्यापाराची वाढ केली असे त्यांचे म्हणणे आहे. त्याखेरीज विशेषतः पूर्व आफ्रिकेत, राज्ययंत्रणेस आवश्यक असे कुशल कर्मचारीही भारतातून मिळू शकले. यूरोपीय लोकांच्या बरोबरीने व हुशारीने काम करून हिंदी लोकांनी डॉक्टर, वकील, तंत्रज्ञ व सरकारी कर्मचारी ह्या नात्याने आफ्रिकेची बहुमोल सेवा केली आहे.

आफ्रिकन लोकांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट हिंदी लोकांच्या कर्तृत्वामुळे झाली. फक्त गोरे लोकच उच्च दर्जाची कामे करू शकतात असे नसून इतरही लोक तशीच कामे करण्यास समर्थ असतात, ह्याची जाणीव आफ्रिकी जनतेला भारतीयांच्या कामगिरीमुळे झाली व त्यामुळे आपल्या भवितव्याबद्दल आफ्रिकी लोकांच्या मनात उत्साह निर्माण झाला.

आफ्रिकेसंबंधी भारताचे धोरण जवाहरलाल नेहरू ह्यांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे. भारत व आफ्रिका ह्यांचे घनिष्ट सहकार्य रहावे, अशीच भारताची इच्छा आहे. भारतीय नागरिकांसाठी कोणतेही विशेष अधिकार भारत मागणार नाही. एवढेच नव्हे, तर आफ्रिकेतील भारतीय नागरिकांनी तेथाल स्थानिक लोकांच्या हितालाच अग्रहक्क दिला पाहिजे, असा आदेश सरकारने त्यांना दिला आहे. भारतीय नागरिक हे आफ्रिकेत पाहुणे आहेत व आफ्रिकी जनतेला हवे असतील तोपर्यंतच त्यांनी तेथे रहावे, असा स्पष्ट इशारा भारताने त्यांना दिलेला आहे.

वरील संदर्भात भारताने संयुक्त राष्ट्रांत आफ्रिकेसंबंधी कसे धोरण ठेवले आहे, हे जाणणे उद्‍बोधक होईल. भारताने स्वतंत्र झाल्यापासून वसाहतींतील जनतेला मुक्त करण्यासाठी अविरत प्रयत्न केले व त्यांची बाजू जोरदारपणे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत व इतर आनुषंगिक संस्थांत मांडली. आफ्रिकेतील राष्ट्रांना, विशेषतः विश्वस्त राष्ट्रांच्या ताब्यातील प्रदेशांना, स्वातंत्र्य लवकर मिळावे म्हणून भारताने पुरस्कार केला. ह्या सर्व प्रयत्नांमागे परकीय सत्ता ह्या प्रदेशांतून शक्य तितक्या लवकर निघून जाव्या, हा हेतू स्पष्ट दिसतो. संयुक्त राष्ट्रांशी निगडित अशा सर्व जागतिक संस्थानी आपले कार्यक्षेत्र आफ्रिकेत वाढवून आपल्या कार्याचा फायदा आफ्रिकी जनतेस द्यावा, अशी जोराची खटपट भारताने आजपर्यंत चालू ठेवली आहे. ह्या सामान्य गोष्टींखेरीज दोन विशिष्ट बाबींकडे भारताने जगाचे लक्ष वेधले आहे. दक्षिण आफ्रिकेने मूळच्या राष्ट्रसंघाच्या आदेशानुसार नैर्ऋत्य आफ्रिकेचा भाग आपल्या ताब्यात घेतला व तो आता आपल्याच राज्यात सामील करण्याचा कुटिल डाव त्याने रचला, त्याविरुद्ध संयुक्त राष्ट्रांत जे काहूर उठले त्यात भारताचा अग्रभाग होता. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतील गोरेतर लोकांना जी लांच्छनास्पद वागणूक देण्यात येते, त्या बाबतीतही भारताने जोरदारपणे संयुक्त राष्ट्रांपुढे प्रश्न मांडला. १९४६ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेतून आपला प्रतिनिधी काढून घेतला व त्याच सालापासून प्रत्येक वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या सभांमधून हे प्रश्न उपस्थित करून आफ्रिकी जनतेवरील अन्यायाकडे जगाचे लक्ष सतत वेधले आहे. ही गोष्ट भारताला नवोदित आफ्रिकी राष्ट्रांबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेची साक्ष देण्यास पुरेशी आहे.

भारताने आफ्रिकी जनतेच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात भरीव व सक्रिय कार्य केले आहे, ह्याची जाणीव आफ्रिकी पुढाऱ्यांना आहे, हे त्यांच्या वक्तृत्वावरून लक्षात येते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जागतिक राज्यकारणात स्वतंत्र बाण्याचे व अलिप्ततेचे धोरण भारताप्रमाणे आफ्रिकी राष्ट्रेही अनुसरत आहेत. आजही अनेक आफ्रिकी विद्यार्थी भारतीय शिष्यवृत्त्या घेऊन भारतात उच्च शिक्षणासाठी येत आहेत व अशा रीतीने भारताचा आफ्रिकेतील राष्ट्रांशी असलेला पूर्वापार संबंध दृढतर होत आहे. जोपर्यंत ही राष्ट्रे वसाहतवादाच्या गुलामगिरीत होती, तोपर्यंत वसाहतवादी राष्ट्रांबद्दल वाटणाऱ्या द्वेषाचा काही भाग हिंदी लोकांच्या वाट्याला आला असल्यास नवल नाही. सर्व सत्ता हाती आल्यानंतर आपल्या नागरिकांचे हक्क व हितसंबंध सांभाळणे व त्यांना योग्य ती संधी देणे, हे कोणत्याही राष्ट्रीय सरकारचे कर्तव्य आहे व तसे होऊ लागले म्हणजे परक्या देशांतून येणाऱ्यांचे प्रमाण कमी होत जाणे अपरिहार्य आहे. (चित्रपत्रे १३, १४, १५, १६).

नरवणे, द. ना.

संदर्भ : 1. Hance, W. A. The Geography of Modern Africa, New York, 1964.

2. July, R. W. A History of the African People, London, 1970.

3. Legum, Colin, Ed. Africa-A Handbook to the Continent, Bombay, 1962.

4. Marquard, Leo, The peoples and Policies of South Africa, London, 1962.

5. Mazrui, A. A. Towards A Pax Africana, London, 1967.

6. Mountjoy, Alan B. & Embleton, Clifford, Africa : A Geographical Study, London, 1965.

7. Stamp, L. D. Africa : A study in Tropical Development, London, 1957.

 

                                                                  आफ्रिका स्वाभाविक

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आफ्रिका : लोक व समाजजीवन

शिकारीची एक पद्धती

 

किलिमांजारो पर्वत
नाईल नदी
आफ्रिकन पिग्मी व उंच माणूस
व्हिक्टोरिया धबधबा
नायजरमधील एक घर
पिरॅमिड व स्फिंक्स
हिऱ्याच्या खाणीतील कामगार
एक आदिवासी नृत्य
‘देवाची करांगुली’- नैर्ऋत्य आफ्रिकेतील विदारणक्रिया
कांडणकाम

  

                                                                       आफ्रिका राजकीय

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आफ्रिकेतील जमाती

बदाऊन स्त्री : उत्तर आफ्रिका
आम्हारा : इथिओपिया
मसाई : पूर्व आफ्रिका
किकूयू : केन्या
बर्बर : उत्तर आफ्रिका
झुलू : मध्य आफ्रिका
लूबा : झाईरे
अशांटी : घाना
बुशमन : दक्षिण आफ्रिका
पिग्मी : मध्य आफ्रिका
हौसा : पश्चिम आफ्रिका