आफ्रिकन भाषा: आफ्रिका खंडात अनेक वंशांचे लोक राहतात. गौरवर्णीय लोक सहाराच्या उत्तरेला आहेत. त्यातील काही सेमिटिक व काही हामिटिक कुळातील भाषा बोलतात. प्रस्तुत लेखात आफ्रिकेच्या मूळ कृष्णवर्णीय लोकांच्या भाषांचाच विचार केला आहे. इस्लामी वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशातील अरबी किंवा युरोपियन राष्ट्रांच्या वसाहतींत बोलल्या जाणाऱ्या त्या त्या राष्ट्रांच्या इंग्रजी, आफ्रिकान्स, फ्रेंच इ. भाषांचा यात समावेश केलेला नाही.

या भाषांची जवळजवळ सर्वच माहिती आधुनिक काळातील असल्यामुळे त्यांचा इतिहास देणे अशक्य आहे. अगदी जुन्यात जुना पुरावा कॉप्टिक लिपीत लिहिलेल्या न्युबियन भाषेतील असून तो धार्मिक स्वरूपाचा आहे. त्याचा काळ इ. स. चौथे ते सातवे शतक असावा. पण भाषिक दृष्टीने तो अगदी निरुपयोगी आहे, कारण लिपीचा भाषेशी मेळ नाही एवढेच नव्हे, तर हे लेखन त्या संस्कृतीशी अपरिचित अशा परकीयांनी केलेले आहे. अधूनमधून कोणीतरी दिलेले एखाद्या भाषेतील दोनचार शब्द सोडल्यास सतराव्या शतकापर्यंत कोणतीही माहिती मिळत नाही. पुढे एकोणिसाव्या शतकापर्यंत प्रवाशांनी गोळा केलेले शब्द व वाक्ये आढळतात. या शतकाच्या मध्यापासून संशोधन विशेष जोरात होऊ लागले आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून त्याला अभ्यासपूर्ण व निष्कर्षात्मक वळण लागले. पण अजूनही हे साहित्य खात्रीलायक व भरपूर आहे असे म्हणता येणार नाही कारण बऱ्याच भाषांतील शब्द मातृभाषिकांकडून मिळवलेले नसून तिर्‍हाइतांनी दिलेले आहेत.

काही थोड्या भाषांची व्याकरणे शास्त्रीय पद्धतीने लिहिण्यात आलेली आहेत पण व्याकरण समजण्यासाठी लागणारे त्या त्या भाषेतील साहित्य, कथा, निबंध, निवेदने इ. साहित्य उपलब्ध नसल्यामुळे भाषेचे यथार्थ दर्शन होऊ शकत नाही. हाउसा किंवा फुला यांसारख्या आता लिहिल्या जाणाऱ्या भाषांत ही उणीव जरा दूर व्हायला लागली आहे. पण शेकडो भाषांपैकी केवळ हाताच्या बोटांवर मोजता येण्याइतक्याच भाषांच्या वाट्याला हे भाग्य आलेले असल्यामुळे ही प्रगती उत्तेजनकारक आहे, असे म्हणता येत नाही.

काही सामान्य वैशिष्ट्ये : (१) नामवर्ग – वस्तू व प्राणी यांच्या विशिष्ट प्रकारच्या विभागणीवर नामपद्धती आधारलेली आहे. ही विभागणी नेहमीच आपल्या लक्षात येईल असे नाही. सामान्यतः मानव व इतर प्राणी हा एक वर्ग आहे. पाणी व इतर द्रव पदार्थ तसेच सहज वितळणारे पदार्थ हा दुसरा वर्ग आहे. एखाद्या वर्गात लाकूड, झाडे व तत्सम पदार्थ येतील, तर आणखी एखाद्या वर्गात गवतासारखे पदार्थ असतील. प्रत्येक वर्गातील प्राणी व पदार्थ इतरांपासून व्याकरणदृष्ट्या वेगळे ठेवले जातात. त्यांचा निर्देशही विशिष्ट अवयवांनी केला जातो. हे अवयव त्या त्या वर्गातील कोणत्याही घटकाच्या जागी सर्वनामाप्रमाणे येऊ शकतात आणि उपसर्ग किंवा प्रत्यय म्हणूनही त्यांचा उपयोग होऊ शकतो.

मुळात ही व्यवस्था सर्व आफ्रिकन भाषांत असावी. कालांतराने काही  भाषांत ती बऱ्याच अंशी टिकून राहिली, काहींत कमीअधिक प्रमाणात बदलली, काहींत ती पूर्णपणे नष्ट झाली, तर काहींत असे उपसर्ग व प्रत्यय मूळ शब्दांशी एकजीव झाले.

(२) नाम व क्रियापद यांची अभिन्नता : हे प्रत्यय व उपसर्ग अस्तित्वात होते, तोपर्यंत नाम व क्रियापद यांचे परस्परभिन्नत्व स्पष्ट होते. पण ते नाहीसे होताच अमुक शब्द नाम की क्रियापद, हे ठरवणे अशक्य झाले. फक्त वाक्यातील स्थानावरून आणि हे प्रत्यय ज्या ठिकाणी टिकून राहिले आहेत, तिथेच ही अडचण जाणवत नाही. 

(३) क्रियापदे : अनुभवाची अभिव्यक्ती करण्याचा या भाषांचा प्रकार आपल्यासारखा नाही. क्रियापदांना काल व अर्थ असे आपण लागू केलेले वर्गीकरण त्यांच्या भाषांनाही लागू पडेल, अशा अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. मात्र महत्त्वाची गोष्ट ही, की मामुली फरक सोडल्यास या सर्व भाषांत क्रियापदाची रूपे बनवण्याचे प्रकार सारखेच आहेत. 

धातू नामवर्गातील असून धातुसाधिते नाम किंवा विशेषण या वर्गांतील आहेत. क्रियापदांचे मूलभूत प्रकार तीन असून त्यांच्या आधारे किंवा त्यांच्याबरोबर सहायके वापरून इतर प्रकार बनतात. मूलभूत क्रियापदे नकारदर्शक, समाप्तिदर्शक व परावलंबी चालू क्रियादर्शक असतात. एकंदर क्रियापदपद्धती अतिशय गुंतागुंतीची आहे. 

(४) क्रमावलंबी वाक्यरचना : विभक्तिप्रत्ययांच्या अभावामुळे शब्दांचा वाक्यातील क्रम अर्थनिर्णायक आहे. कित्येकदा उपसर्ग किंवा प्रत्यय लावूनही अर्थनिश्चिती करता येते. पण हे काही थोड्या बाबतींतच. वाक्यातील शब्दक्रम सर्व भाषांत सारखा नसतो. 

(५) शब्दसंग्रह : परकी उसने शब्द वगळल्यास शब्दसिद्धी करण्याच्या तत्त्वांबाबत आफ्रिकन भाषांत विलक्षण एकवाक्यता आढळते. हे साम्य बाह्य रूपांपुरतेच मर्यादित नसून अर्थाच्या बाबतीतही आढळते.

(६) सूर : काही भाषांत अर्थनिर्णायक किंवा व्याकरणदृष्ट्या कार्यक्षम असे सूर आहेत. त्यातला खालचा सूर होकार, आधिक्य व अनेकत्व दर्शवणारा किंवा त्वंवाचक असून वरचा सूर नकार, न्यूनत्व, तुच्छता, एकत्व दर्शवणारा किंवा अहंवाचक असतो. 

भाषांचे वर्गीकरण : (१) सूदान व गिनीमधील सोळा गट (एकंदर भाषा ३४४) : (१) निलो-चादियन, (२) निलो-ॲबिसिनियन, (३) निलो-इक्वेटरियन, (४) कार्दोफानियन, (५) निलो-काँगोलीज, (६) उबांगियन, (७) शारि-वादाइयन, (८) शारियन, (९) नायजेरोचादियन, (१०) नायजेरो-कॅमेरूनियन, (११) लो नायजेरियन, (१२) होल्टाइक, (१३) एर्बुनिओ-दाहोमियन, (१४) नायजेरो-सेनेगलीज, (१५) एर्बुनिओ-लायबीरियन व (१६) सेनेगलो-गिनीयन. 

(२) बांटु भाषा : या समूहात पुढील गटांचा अंतर्भाव होतो (एकंदर भाषा ६०५) :

आग्नेय – ङ्गनी, सोथो, वेंदा, चोंगा, इन्हांबान. 

मध्य दक्षिण – शोना. 

मध्य पूर्व – न्यासा, माकुबा, जालामो. 

मध्य उत्तर – बेंबा, बुयू, लुंबा. 

मध्य पश्चिम – लंदा, चो-क्वे. 

पूर्व किनारा – स्वाहिली. 

पूर्व – शांबाला, चागा, गोगो, इरांगी, म्वेझी, हेहे. 

ईशान्य – काविसेंदो, लाक्युस्त्र, कांबा, गांदा, न्योरो, च्वेझी, विदा, रेगा. 

नैर्ऋत्य – आंबा-हेहेरो, नेका-हुंबे, येये-न्येंगो, सुबिया- लुयी, चितोंगा-इला, माम्बुदा, ओविम्बुंदू.

पश्चिम किनारा – कुंदू, प्रोटो-बांटू, प्राचीन बांटू, कोता-माका, काले, नदीतीरीय. 

वायव्य – शेनाल.

निम्न भाग – कुतू, एर्कोदा.  

उत्तर – ङ ङ, ब्वा.

(३) खोइन भाषा : यात हॉटेंटॉट, बोशिमान, दामा, सांदावे, किंदिगा यांचा समावेश होतो. 

संदर्भ : 1. Cohen, M. &amp Meillet, A. Less Langues du Monde, Paris, 1954.

             2. Homburger, L. The Negro-African Languages, London, 1947.

कालेलकर, ना. गो.