आर्वी – २ : (हिं. घुइयाँ, घोयाँ, काचालू इं. डॅशीन लॅ. कोलोकेशिया एस्क्यूलेंटम कुल-अरेसी). आर्वी हे एका ओषधीय [→ ओषधी ] वनस्पतीचे मूळ हिंदी नाव असून तिचे गड्डे बाजारात याच नावाने विकले जातात. तिच्या शास्त्रीय नावाबद्दल एकमत नसून काहींच्या मते तो ⇨ अळूचा (कोलोकेशिया अँटिकोरम) प्रकार (एस्क्यूलेंटा) असावा. ती मूळची उष्णकटिबंधातील असून हवाई, फिजी, वेस्ट इंडीज, श्रीलंका, भारत (मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिळनाडू) इ. देशांत तिची लागवड होते. पाने मोठी अळूसारखी पाती अखंड, छत्राकृती, चमकदार हिरवी देठ जाडजूड असून एकूण पाने बहुधा ९० सेंमी. किंवा त्यापेक्षा लांब व जवळजवळ तेवढीच रुंद असतात. स्थलूकणिशात पुं-पुष्पबंधाच्या निम्म्या लांबीचे उपांग असते, महाछद पिवळट तपकिरी असतो. [→ पुष्पबंध ] फुले सप्टेंबरात येतात. सर्वसामान्य लक्षणे अरेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे [→ ॲराइडी ].
गड्डे [मूलक्षोड, → खोड] तपकिरी रंगाचे असून ते मध्यम आकाराच्या बटाट्याएवढे असतात. त्यांवर तंतुयुक्त साल असते. मुख्य गड्डा मोठा असून बाजूचे गड्डे लहान असतात. त्याचा गर पिठूळ असून त्याला चांगला स्वाद असतो. त्याच्यात बटाट्यापेक्षा कार्बोहायड्रेटे व प्रथिने जास्त असतात.
गड्डे उकडून बटाट्यासारखे खातात. त्याचे काप चांगले होतात. काही कंदांत कॅल्शियम ऑक्झॅलेटाचे पुंजके असल्यामुळे ते अतिशय खाजरे असतात. लागवडीत असलेले बहुसंख्य प्रकार खाजत नाहीत. कच्चे कंद खाऊन खाजरेपणाची चव घेऊ नये. उकडल्यावर खाजरेपणा कमी होतो. काही भागांत कोवळी पाने व देठ यांची इतर पालेभाज्याप्रमाणे भाजी करतात.
आर्वीची गड्ड्यासाठी लागवड करतात. तिची उन्हाळी व पावसाळी अशी दोन पिके घेतात. उन्हाळी पिकाची लागवड फेब्रुवारी-मार्चमध्ये करतात व पावसाळी पिकाची लागवड जून-जुलैमध्ये करतात. लागवडीसाठी अंकुर आलेले गड्डे वापरतात. दोन ओळींत ४५ सेंमी. अंतर व दोन झाजांत ३० सेंमी. अंतर ठेवून लागवड करतात. उगवण पूर्ण न झाल्यास एक हलके पाणी दिल्यास ती जलद होते. एक-दोन वेळा हलकी भर देतात. पिकाला जादा फुटवे आल्यास मुख्य एकदोन फुटवे ठेवून बाकीचे काढून टाकतात. साधारणातः लागवडीपासून तीन महिन्यांनी पीक काढणीस तयार होते. तथापि १३०–१४० दिवसांत ते पक्व होते व त्यावेळी काढल्यास हेक्टरी १५,००० किग्रॅ. गड्डे मिळतात.
या पिकावर गंभीर स्वरूपाचे रोग किंवा किडी पडत नाहीत. काही भागांत एखाद्या वर्षी करपा रोग उग्र स्वरूप धारण करतो. सुरुवातीला त्याची लक्षणे पानांवर दिसू लागतात व नंतर देठांवर दिसतात. कधीकधी गड्डे कुजतात. प्रतिबंधक उपाय म्हणून रोगमुक्त बियाणे वापरतात. बोर्डो मिश्रणासारख्या ताम्रयुक्त कवकनाशकाची फवारणी केल्यास रोगास आळा बसतो. शेतात एकदा रोग आल्यास किमान दोन वर्षे तरी त्या शेतात आर्वीचे पीक न घेणे चांगले.
संदर्भ : Choudhary, B. Vegetables, New Delhi, 1967.
जमदाडे, ज. वि.