आर्यभट(ट्ट) : भारतीय ज्योतिषशास्त्रात दोन आर्यभटांनी महत्वाची कामगिरी केलेली आहे.
आर्यभट, पहिले : (इ.स. ४७६– ?). विख्यात भारतीय ज्योतिषशास्त्रवेत्ता व महान गणिती. उपलब्ध पौरुष ग्रंथांत यांच्या आर्यभटीय किंवा आर्यसिद्धांत या ग्रंथाहून प्राचीनतर ग्रंथ ज्ञात नाही. त्यांनी करणग्रंथही (ग्रहगणिताचा ग्रंथ) रचला असावा, तसे संदर्भ आहेत पण ग्रंथ उपलब्ध नाही. त्यांचे कुसुमपुर हे मूळचे गाव बिहारमधील पाटणा अगर तत्सन्निध असावे असे मानतात. पण उत्तरेत त्यांच्या ग्रंथाचा प्रसार झाला नाही. दक्षिण भारतात मात्र विस्तृत भाष्यग्रंथ उपलब्ध आहेत, त्यामुळे ते कदाचित केरळ राज्यातील असावेत.
आर्यसिद्धांत या ग्रंथात गणितशास्त्र व ज्योतिषशास्त्र यांसंबंधी संक्षिप्त सूत्रबद्ध व श्लोकबद्ध विवेचन सिद्धांतरूपाने मांडले आहे. याची श्लोकसंख्या फक्त १२१ आहे. याचे गीतिकापाद, गणितपाद, कालक्रियापाद व गोलपाद असे चार विभाग (पाद) आहेत.
गीतिकापादामध्ये अवघ्या १३ श्लोकांत मोठमोठ्या संख्या थोडक्यात लिहिण्याची अभिनव परिभाषा वर्णन करून तिचा उपयोग केलेला आहे. व्यंजनांचा उपयोग आकडे दर्शविण्यासाठी व स्वरांचा शून्यासाठी केला आहे. उदा., ख् = २,य् = ३०, उ = १०,०००; घ् = ४ आणि ऋ = १०,००,०००; यावरून घृ = ४०,००,००० आणि ख्युघृ = ४३,२०,००० अशी संख्या होते. अशी थोडक्यात संख्या मांडण्याची ही पद्धती दुसऱ्या कोणत्याही ग्रंथात सापडत नाही, म्हणून ही मूळ कल्पना आर्यभटांची असली पाहिजे. याशिवाय राशी, अंश व कला यांचे परस्परसंबंध, युग पद्धती, आकाशाचा विस्तार, पृथ्वी, सूर्य, चंद्र व ग्रह यांच्या गती, अंतर मोजण्याची लहान-मोठी मापे वगैरे माहिती या १३ श्लोकांत आहे.
गणितपादात ३३ श्लोक असून त्यात अंकगणित, बीजगणित व रेखागणित यांचा विचार आहे. तसेच क्षेत्रफळ, घनफळ, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ इत्यादींचे नियम सूत्ररूपाने दिले आहेत. p म्हणजे परिघ ÷ व्यास या स्थिरांकाची किंमत त्यांनी ३ १७७/१२५० किंवा ३·१४१६ इतकी दिलेली आहे. यांखेरीज श्रेढी, त्रैराशिके, अपूर्णांक, कुट्टके (कूटप्रश्न) वगैरेंसंबंधी यात माहिती आहे.
कालक्रियापदात २५ श्लोक आहेत, मास, वर्ष व युग यांच्याबद्दल यात माहिती आहे. यातील युग पद्धती इतरांहून थोडी भिन्न आहे. ४३,२०,००० वर्षांच्या एका महायुगात इतर शास्त्रज्ञ ७१ युगे मानतात, तर यामध्ये ७२ मानली असून शिवाय सर्व युगपाद समान मानले आहेत. कल्पारंभी, महायुगारंभी व युगापादारंभी सर्व ग्रह एकत्र येतात असे यात सांगितले आहे. मूळ सूर्यसिद्धांतात कलियुगारंभ गुरुवारी मध्यरात्री झाला असा उल्लेख आहे, तर आर्यभटांनी तो शुक्रवारी सूर्योदयी म्हणजे १५ घटिका मागाहून झाला असे सांगितले आहे. परंतु त्यांनी वर्षमान ३६५ दि. १५ घ. ३१ प. १५ वि. म्हणजे मुळापेक्षा १५ विपळे कमी धरून ३,६०० वर्षात बरोबर १५ घटिका कमी होतात आणि त्यामुळे गतकाली ३,६०० यावर्षी मूळ सूर्यसिद्धांत आणि आर्यसिद्धांत याप्रमाणे सूर्याचे मध्यमेषसंक्रमण म्हणजे वर्षारंभ एक कालीच झाला आणि यावरून युगारंभ सूर्योदयी मानल्यामुळे जे अंतर पडेल ते न पडावे म्हणून त्यांनी वर्षमान १५ विपळे कमी मानले.
आर्यभट वेध घेण्यात प्रवीण होते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे निश्चितपणे सागणारे आर्यभट हे पहिलेच असावेत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे त्यांचे मत होते, असे मात्र दिसत नाही. आज रूढ असलेले अनेक सिद्धांत त्यांनी पाचव्या शतकात सर्वप्रथम प्रतिपादिले.
गोलपादात ५० श्लोक असून त्यात सूर्य, चंद्र, पृथ्वी इ. खस्थ गोलांची माहिती व सूर्यापासून अंतरे दिली आहेत. पृथ्वी, ग्रह व नक्षत्रे यांचा अर्धा भाग काळोखात व दुसरा सूर्याभिमुख म्हणून प्रकाशित आहे असे यात म्हटले आहे. पृथ्वीची घडण, स्थिती व आकार, क्रांतिवृत्त, संपात बिंदू, खगोलवर्णन, ग्रहणे वर्तविण्याची रीत वगैरे माहिती यात आली आहे.
या ग्रंथाला मुख्य आधार स्वतः घेतलेले सूक्ष्म वेध, दृकप्रत्यय व वेधसिद्ध आकड्यांची संगती यांचा असल्याने व ग्रंथ रचना सुष्लिष्ट असल्याने हा ग्रंथ फार महत्त्वाचा समजतात. ब्रह्मगुप्तांनी या ग्रंथासंबंधी आर्यभटांना पुष्कळ दूषणे दिली आहेत. आर्यभटीयावर सूर्ययज्वन् यांनी टीका लिहिली आहे. १८७५ मध्ये केर्न यांनी सटीक आर्यसिद्धांत हॉलंडमध्ये लेडन येथे छापून प्रसिद्ध केला. कलकत्त्यात प्रबोधनचंद्र सेनगुप्त यांनी १९२७ मध्ये व क्लार्क यांनी शिकागो येथे १९३० मध्ये इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध केले आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी लल्ल हे आर्यभटांचे शिष्य होते असे काही म्हणतात. अल् बीरुनी यांच्यापाशी आर्यभटीय ग्रंथाचा काही भाग अरबी भांषातराच्या स्वरूपात असावा.
आर्यभट, दुसरे : (नववे किंवा दहावे शतक). हेही मोठे ज्योतिषशास्त्रज्ञ होते. आर्यसिद्धांत या नावाचा यांचाही ग्रंथ आहे. कोणी याला महासिद्धांत असेही म्हटले आहे. हा १८ अधिकारांत असून याच्या ६२५ आर्या आहेत. यात ज्योतिषशास्त्र, अंकगणित, भूगोल व ग्रहांची गती या गोष्टींचा विचार आहे. ब्रह्मगुप्तांनी पहिल्या आर्यसिद्धांतात काढलेले दोष यात नाहीत. याच्या युग पद्धतीत कल्पारंभ रविवारी आहे. वर्षमान ३६५ दि. १५ घ. ३१ प. १७ विपळे व ६ प्रविपळे असे आहे. या ग्रंथाप्रमाणे सृष्ट्यारंभीच स्पष्टग्रह एकत्र येतात, युगारंभी नाही. सृष्ट्युत्पत्तीस ३०,२४,००० वर्षे झाली असे अनुमान काढले आहे. सप्तर्षींना सुद्धा गती आहे असे मानून इतर ग्रहांप्रमाणे त्यांचेही भगण (नक्षत्रांतील हालचाल) दिले आहेत. दृककोण = राशीचा तिसरा भाग म्हणजे १० अंश. दुसऱ्या आर्यभटांनी दृककोणोदय (लग्नमाने) सांगितले आहेत.
या ग्रंथात पहिल्या १३ अध्यायांत करणग्रंथातील सर्व गोष्टी आहेत. चौदाव्यात गोलांसंबंधी विचार व प्रश्न आहेत. पंधराव्यात १२० आर्यांमध्ये पाटीगणित म्हणजे अंकगणित व क्षेत्रफळ, घनफळ यांसंबंधीचा विचार आहे. सोळाव्यात भुवनकोशासंबंधी विवेचन, सतराव्यात ग्रहमध्यगतीची उपपत्ती व अठराव्यात बीजगणित व कुट्टकगणित आहे. यांनीही आकडे दर्शविण्यासाठी भिन्न अक्षरसंज्ञा योजिल्या आहेत. या पद्धतीला ‘कटपयादि’ संज्ञा म्हणतात. यात स्वरांना अर्थ नाहीत. ‘अंकाना वामतो गतिः’ म्हणजे या वचनाच्या उलट ही लेखनपद्धती आहे म्हणजे यात डाव्या बाजूस एकम् स्थानाचा अंक असतो. यांनी ⇨ अयनांश काढण्याची रीतीही दिली आहे. यांच्या सिद्धांतानुसार येणारे आयनांश व स्पष्ट मेषसंक्रमणकाली त्या अयनांशइतका सायन रवी समान येण्याचा काल सुमारे शके ९०० येतो.
मोडक, वि. वि.