आर्मस्ट्राँग, एडविन हॉवर्ड :(१८ डिसेंबर १८९०–१ फेब्रुवारी १९५४).  अमेरिकन विद्युत् अभियंता आणि उच्च कंप्रतेच्या (दर सेंकदास होणाऱ्या कंपन संख्येच्या) रेडिओ तरंगांच्या विरूपण [एखाद्या तरंगाच्या काही विशिष्ट लक्षणामध्ये दुसऱ्या तरंगाच्या काही विशिष्ट लक्षणानुसार बदल करणे, → विरूपण] पद्धतीचे मूळ शोधक.  यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. रेडिओचा शोध जेव्हा लागला तेव्हा ते वयाने लहान होते.  तरीही त्या शोधाकडे त्यांचे विशेष लक्ष वेधले गेले. वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी त्यांनी स्वतःचे रेडिओप्रेषण केंद्र उभारले.

ते १९०९ मध्ये कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले.  मायकेल पूपीन यांच्या हाताखाली त्यांनी तेथे अध्ययन केले व १९१३ मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळविली. तेथे त्यांनी द फॉरेस्ट यांच्या श्राव्य कंप्रता विवर्धकाचा [→ इलेक्ट्रानीय विवर्धक] विशेष अभ्यास केला. १९३५ पर्यंत त्यांनी विद्यापीठाच्या मार्सेलस हार्टली संशोधन शाळेत काम केले.  त्यांच्या संशोधनाने रेडिओतंत्रात क्रांती घडून आली.  त्यांनी पहिल्या महायुद्धात (१९१७–१९) सैन्याच्या संदेशवहन विभागात काम केले.

आर्मस्ट्राँग यांनी प्रसिद्ध केलेल्या निर्वात नलिकेसंबंधीच्या शोधाबद्दल द फॉरेस्ट यांनी त्यांच्यावर हक्कभंगाची फिर्याद लावली व तिचा निकाल द फॉरेस्ट यांच्या बाजूने लागला. तेव्हा आर्मस्ट्राँग यांनी कोलंबिया विद्यापीठाला ५०,००० डॉलरांची देणगी देऊन अशा शोधांच्या हक्कांच्या वादांसंबंधी विचार करण्यासाठी एक समिती नेमून घेतली.

उच्च कंप्रता आंदोलनाकरिता लागणारे प्रतिसंभरक (प्रदानातील काही ऊर्जा आदानास देत रहाणारे) मंडल आणि परासंकरण (ग्राहीत येणाऱ्या  संदेशामध्ये तेथेच निर्माण केलेला संदेश मिसळून त्यांच्या दरम्यान असलेली कंप्रता तयार करणे)  पद्धती यांच्या शोधांचे त्यांना विशेष श्रेय दिले जाते. हे शोध पोलिस खात्याने व लष्कराने लगेच स्वीकारले. १९२५ मध्ये त्यांनी रेडिओ तरंगांच्या वहनात येणाऱ्या वातावरणीय अडथळ्यांच्या निराकरणासंबंधी संशोधन केले. एकाच वाहक कंप्रतेच्या साहाय्याने वेगवेगळ्या कंप्रतेचे अनेक संदेश एकाच वेळी पाठविण्याच्या पद्धतीचा शोध त्यांनी लावला. रेडिओ क्लब ऑफ अमेरिका या संस्थेने त्यांच्या सन्मानार्थ प्रतिवर्षी नव्या संशोधकांना आर्मस्ट्राँग पदक देण्याचा उपक्रम सुरू केला.  त्यांनी न्यूयॉर्क येथे आत्महत्या केली.

कानिटकर, बा. मो.