आनफिन्सेन, क्रिस्तीआन बोहेमर : (२६ मार्च १९१६ – ). अमेरिकन जीवरसायनज्ञ. १९७२ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक आनफिन्सेन यांना अर्धे आणि स्टॅनफर्ड मुर व विल्यम एच्. स्टाइन यांना अर्धे असे विभागून देण्यात आले.
त्यांचा जन्म अमेरिकेत मोनेसेन येथे झाला. १९३७ मध्ये स्वॉर्थमोर कॉलेजातून ते बी. ए. झाले. १९३९-४० मध्ये कार्ल्सबर्ग प्रयोगशाळेमध्ये त्यांनी फेलो म्हणून एक वर्ष काम केले. नंतर हार्व्हर्ड मेडिकल स्कूलमधून त्यांनी जीवरसायनशास्त्राची डॉक्टरेट पदवी १९४३ मध्ये मिळविली. १९५० मध्ये ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेच्या लॅबोरेटरी ऑफ सेल्यूलर फिजिऑलॉजी विभागाचे प्रमुख झाले. त्यानंतर १९६३ मध्ये ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्थ्रायटिस अँड मेटॅबोलिक डिसीझेस या संस्थेत रासायनिक जीवविज्ञान विभागाचे प्रमुख झाले.
एंझाइमांची संरचना आणि कार्य विशद होण्याच्या दृष्टीने त्यांचे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. एंझाइमे ही प्रथिने असून त्यांचे रेणू, विविध ॲमिनो अम्लांचे रेणू एकमेकांस जोडले जाऊन बनलेल्या, साखळ्यांसारख्या संरचनांचे असतात. या साखळ्या काही विशिष्ट तऱ्हेने गुंडाळल्या जाऊन विशिष्ट त्रिमितीय संरचना बनल्याखेरीज एंझाइमे क्रियाशील होत नाहीत. एंझाइमाची अशी गुंडाळणी होणे कशामुळे नियंत्रित होते हे ठरविण्यासाठी आनफिन्सेन यांनी बैलाच्या रिबोन्यूक्लिएज या एंझाइमासंबंधी मौलिक संशोधन केले. या एंझाइमात चार डायसल्फाइडी बंध, आडवे व साखळीच्या दोन भागांना जोडून झालेले असतात. ते प्रथम तोडून मोकळे केले व पुन्हा त्यांची जोडणी होऊ दिली तर वरील प्रकारच्या १०५ निरनिराळ्या जोडण्या होणे सैद्धांतिकदृष्ट्या शक्य आहे. परंतु त्यांपैकी एकच प्रकारची जोडणी अधिकांशाने होते व म्हणून ती ऊष्मागतिकीनुसार स्थिर असली पाहिजे असे आनफिन्सेन यांनी दाखविले. याच तऱ्हेची जोडणी मूळच्या रेणूत असते. गुंडाळणी याच विशिष्ट तऱ्हेने व्हावी यासाठी चालना मिळावी म्हणून लागणारे ज्ञान एझाइमाच्या प्राथमिक संरचनेत अनुस्यूत (ॲमिनो अम्लांच्या अनुक्रमात) असते व ते जननिक संकेताने [→ आनुवंशिकी] ठरविलेले असते हेही त्यांनी निदर्शनास आणले.
स्टॅफिलोकॉकस ऑरियस या सूक्ष्मजीवापासून मिळणाऱ्या एंझाइमासंबंधी संशोधन करून त्यांनी असे सिद्ध केले की, त्याचे निष्क्रिय असलेले रेणुखंड एकत्र आणले तर जोडले जातात आणि सक्रिय एंझाइम बनते. ओव्हाल्ब्युमीन या प्रथिनाचे संश्लेषण (घटक अणूंची जोडणी) करण्यासंबंधीही त्यांनी काही संशोधन केले. त्यामुळे वर्णलेखन तंत्राच्या प्रगतीस पुष्कळ सहाय्य झाले आहे.
ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेच्या रिसर्च असोशिएट प्रोग्रॅमचे संचालक आणि रेहोव्होट (इझ्राएल) येथील व्हाइट्समान इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या नियामक मंडळाचे सभासद होते. अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्टस अँड सायन्सेस (१९५८), नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९६३) व रॉयल डॅनिश ॲकॅडेमी (१९६४) या संस्थांचेही ते सभासद आहेत. द सेल्यूलर बेसिस ऑफ इव्होल्यूशन (१९५९) हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे.
सूर्यवंशी, वि. ल.