आनंदपूर: पंजाब राज्याच्या होशियारपूर जिल्ह्यातील शिखांचे पवित्र क्षेत्र, लोकसंख्या ५,००० (१९७१). हे चंडीगड-नानगल रस्त्यावर, रूपारपासून सु. ४३ किमी., सतलजच्या डाव्या तीरावर वसले असून त्याला आनंदपूरसाहेब असेही म्हणतात. शिखांचा नववा गुरू तेगबहादुर याने हे स्थापन केले. दहावा गुरू गोविंदसिंग याने हे आपले मुख्य ठाणे बनविले. येथेच त्याचा औरंगजेबाच्या फौजांनी पराभव केला. गावामागे शिवालिक श्रेणीपैकी नैनादेवी पर्वतराजी व गावात अनेक गुरुद्वारे आहेत. तेगबहादुराच्या शिराची उत्तरक्रिया त्याचा पुत्र गोविंदसिंग याने जेथे केली, तो गुरूका महल, गोविंदसिंगाने ‘पंचप्यारा’ म्हणून पाच शिखांना दीक्षा देऊन खालसा या शिखांच्या लढाऊ संघटनेची स्थापना केली ते गुरुद्वार, खालसा पंथाच्या चार तख्तांपैकी एक तख्त असलेले केशगढ गुरुद्वार, भोवताली एक हजार माणसे बसतील अशा खोल बावडीचे गुरुद्वार अनगडगढ ही विशेष महत्त्वाची आहेत. होळीच्या व त्याच्या दुसऱ्या दिवशी येथे यात्रा भरते.

ओक, शा. नि.