आनंदतनय : ( ? – १७२३). दक्षिण भारतातील एक मराठी कवी. पूर्ण नाव गोपाळपंत आनंदराव अरणीकर. तो सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरजवळच्या अरणी या गावाचा रहिवासी होता. ‘मुरारपंत’, ‘मुरारब्रह्म’ अशी त्याच्या गुरूची नावे सांगितली जातात. तथापि त्याच्या वडिलांनीच त्यास गुरूप्रदेश दिला, असेही एक मत आहे. नलदमयंती-स्वयंवराख्यानाकर्त्या रघुनाथपंडिताचा तो व्याही होता, अशी एक आख्यायिका आहे. रामचरित्र, कृष्णचरित्र यांसारख्या विषयांवरील ३१ आख्याने, १७० हून अधिक पदे (त्यांत एक हिंदी पद आणि काही संस्कृत पदेही आहेत), काही आरत्या आणि गर्भगीता नामक वेदान्तपर प्रकरण एवढी त्याची रचना उपलब्ध असून ती प्रसिद्ध झाली आहे. छंदशास्त्राचा त्याचा चांगला अभ्यास होता, असे दिसते. त्याची शैली प्रौढ आणि यमकानुप्रासप्रचुर आहे. अक्षरगणवृंतात मराठी काव्यरचना सुरू करण्याचे श्रेय त्यास काही अभ्यासक देतात. सीतास्वयंवरपूतनावध, राधाकृष्णविलास  ही त्याची विशेष प्रसिद्ध अशी आख्यानकाव्ये होत.

संदर्भ : काकडे, स. या. संपा. महाराष्ट्रकवि आनंदतनयकृत कविता-संग्रह, मुंबई, १९०८.

जोग, रा. श्री.