आधुनिकता वाद:ख्रिस्ती धर्मातील एक सुधारणावादी विचारसरणी. एकोणिसाव्या शतकात विज्ञानोदयाच्या व बुद्धिवादाच्या प्रभावाखाली ख्रिस्ती धर्माच्या परंपरागत व तात्त्विक विचारांमध्ये परिवर्तन होऊ लागले. तसेच विज्ञानाशी व बुद्धिवादाशी जुळेल, असा ‘पवित्र-पुस्तकाचा’ (होली बायबलचा) नवा अर्थ किंवा उपपत्ती मांडण्याचा प्रयत्न सुरू झाला. यासच आधुनिकतावाद (मॉडर्निझम) म्हणतात. जर्मनीत डी. एफ्. श्ट्राउस (१८०८-१८७४) आणि फ्रान्समध्ये जोसेफ अर्नेस्ट रना (१८२३-१८९२) यांनी अनुभववाद, विकासवाद आणि वैज्ञानिक शोध यांच्याशी सुसंगत ठरणारी ख्रिस्ती धर्माची ऐहिक उपपत्ती मांडली. इंग्लंड व इटली या देशांतही धर्माला आधुनिकतावादी साज चढविण्यात आला. आधुनिकतावादाचा प्रभाव कॅथलिक धर्मप्रचारकांच्या धर्मप्रचारावरही होऊ लागला. त्यामुळे प्रतिक्रिया निर्माण झाली. दहावा पोप पायस याच्या कारकिर्दीत (१९०३-१९१४) या आधुनिकतावादाची ६५ मुद्यांमध्ये मांडणी करण्यात येऊन तो मान्य करण्यात आला [→ धर्मसुधारणा आंदोलन, यूरोपीय].
विज्ञानप्रधान व बुद्धिवादी अशा पश्चिमी संकृतीच्या संपर्कामुळे भारतातही पंरपरागत हिंदू धर्माची आधुनिकतावादी उपपत्ती मांडण्याचा प्रयत्न आर्यसमाज, ब्राह्मोसमाज, प्रार्थनासमाज, सत्यशोधक समाज तसेच इतर अनेक हिंदू धर्मसुधारक यांनी केला. हिंदू धर्मावर नितांत श्रद्धा परंतु परंपरागत जातिभेद, उच्चनीचता, अस्पृश्यता, बालविवाह, विधवाधर्म, मूर्तिपूजा इत्यादींचा अव्हेर करणारा, कालोचित विचार हिंदुधर्मियांत मूळ धरू लागला [→धर्मसुधारणेच्या चळवळी].
जोशी, लक्ष्मणशास्त्री