आयडोक्रेज : (व्हीस्यूव्हिअनाइट). खनिज, स्फटिक चतुष्कोणीय सामान्यत: प्रचिनाकार, कधीकधी प्रसूच्याकार. पुष्कळदा प्रचिनाच्या फलकांवर उभ्या रेखा असतात. अनेक प्रचिनांचे व प्रसूच्यांचे संयोग असलेले स्फटिकही आढळतात. ते कित्येक इतर खनिजांचे विविध फलक एकत्र जुळून
झाल्यासारखे दिसतात [→ स्फटिकविज्ञान]. म्हणून आकार व मिश्रण या अर्थांच्या दोन ग्रीक शब्दांवरून आयडोक्रेज हे नाव दिले गेले. व्हीस्यूव्हिअस या ज्वालामुखीच्या प्राचीन उदगिरणांमध्ये (उद्रेकांमध्ये) हे प्रथम सापडले म्हणून त्याला व्हीस्यूव्हिअनाइट असेही म्हणतात. सामान्यत: हे स्तंभाकार पुंजांच्या व कधीकधी कणांच्या किंवा संपुंजित स्वरूपात आढळते. ठिसूळ. भंजन खडबडीत. कठिनता ६·५. वि. गु. ३·४. चमक काचेसारखी किंवा राळेसारखी. दुधी काचेप्रमाणे पारभासी. रंग तपकिरी, हिरवा, क्वचित पिवळा, निळा किंवा लाल. रा. स. Ca10 (Mg, Fe)2Al4 [Si2 O7]2 [SiO4]5 (OH,F)4.चुनखडकांत हे खनिज संस्पर्शी रूपांतरणाने [→ रूपांतरित खडक] तयार होते. त्याच्याबरोबर गार्नेट, फ्लोगोपाइट, डायोप्साइड, वोलॅस्टोनाइट इ. खनिजे आढळतात.
ठाकूर, अ. ना.
“