आमांश : बृहदांत्राच्या श्लेष्मकलेच्या शोथामुळे (मोठ्या आतड्याच्या आतील नाजूक पृष्ठभागाच्या दाहयुक्त सुजेमुळे) होणाऱ्या व पोटात मुरडा होऊन वारंवार श्लेष्मा (शेंब, चिकट द्रव) व रक्तमिश्रित मलोत्सर्ग ही लक्षणे असलेल्या रोगाला आमांश, प्रवाहिका किंवा आमातिसार असे म्हणतात.
हा रोग संसर्गजन्य असून अनेक प्रकारच्या जंतुसंसर्गामुळे तो होऊ शकतो.त्यात बृहदांत्राच्या श्लेष्मकलेला शोथ येऊन तेथे व्रण होणे ही मुख्य विकृती दिसून येते.
लहान मुलांत कृमी किंवा जंतामुळे अशी लक्षणे काही वेळा दिसतात. बिल्हार्झिया (किंवा शिस्टोसोमा), बॅलँटिडियम वगैरे रोमक (केसाळ) व कशाभ (दोऱ्यासारख्या) एककोशिक (शरीराचा एकच सूक्ष्म घटक असलेल्या) प्रजीवांच्या (प्रोटोझोआंच्या) संसर्गामुळेही आमांश होऊ शकतो.
या रोगाचे मुख्य दोन प्रकार आहेत : (१) दंडाणुजन्य (बॅसिलसजन्य) व (२) अमीबाजन्य.
(१) दंडाणुजन्य : उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत या रोगाचे प्राबल्य फार असून त्याच्या मोठ्या प्रमाणात साथी येतात. युद्ध, दुष्काळ, यात्रा वगैरे कारणांनी पुष्कळ माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा अशा साथी येतात. गलिच्छ वस्ती व मलमूत्राची विल्हेवाट व्यवस्थित नसली, तर संसर्ग होण्याचा संभव अधिक असतो. रोगलक्षणे नसूनही ज्यांच्या शरीरांत आमांशजंतू असतात अशा वाहकांमार्फत किंवा माशा वगैरे कीटकांमार्फत ह्या रोगाचा प्रसार होतो.
या प्रकारचा आमांश उत्पन्न करणारे अनेक जंतू आहेत. त्यांपैकी शिगा, फ्लेक्सनर व सॉनी या शास्त्रज्ञांनी प्रथम शोधून वर्णिलेल्या दंडाणूंना त्या त्या शास्त्रज्ञांचेच नाव देण्यात आलेले असून सर्व आमांशजनक दंडाणूंना शिगेल्ला असे वांशिक नाव दिलेले आहे.
परिपाक काल : जंतुसंसर्ग झाल्यानंतर सुमारे १ ते ७ दिवसांच्या परिपाक कालानंतर लक्षणे दिसू लागतात. रोगाच्या तीव्रतेनुसार त्याचे तीव्र, मध्यम व चिरकारी (कायम स्वरूपाचा) असे प्रकार कल्पिले आहेत.
लक्षणे : तीव्र प्रकार बहुधा शिगा दंडाणूमुळे होत असून थंडी भरून ताप येणे, पोटात कळा येणे, ओकारी व अतिसार ही लक्षणे त्यात अकस्मात सुरू होतात. दिवसातून २० ते ६० वेळा शौचास होते. प्रथम प्रथम मलाचा रंग पिवळट पिंगट असून त्यात श्लेष्मा व रक्त असते. पुढे नुसता श्लेष्मा व रक्त एवढेच पडते. कित्येक वेळा आंत्राच्या श्लेष्मकलेची हिरवट रंगाची शकलेही दिसू लागतात. वारंवार शौचाला झाल्यामुळे रक्तातील द्रव कमी पडून शरीराचे निर्जलीभवन होते. त्यामुळे स्नायूंमध्ये पेटके येतात. अशा अतितीव्र आमांशाचे विषूचिकेपासून (कॉलऱ्यापासून) व्यवच्छेदक निदान करणे पुष्कळदा कठीण होते. श्लेष्मकलेचा शोथ आंत्राच्या सर्व थरांत पसरून क्वचित पर्युदरशोथही [→ पर्युदर] होतो. कधी उपद्रव म्हणून संधिशोथही (सांध्याची दाहयुक्त सूजही) होतो. मध्यम व चिरकारी प्रकारांत वरील सर्व लक्षणे सौम्य असतात.
निदान : फारसे कठीण नाही. ज्वर, मलामधील रक्त व श्लेष्मा यांमुळे निदान करता येते, पण कोणत्या विशिष्ट दंडाणूमुळे रोग झाला हे ठरविण्यासाठी मलातील जंतूंचे शरीराबाहेर विशिष्ट माध्यमावर संवर्धन करावे लागते.
प्रतिबंध : पाणी व दूध उकळून पिणे, पालेभाज्या कच्च्या न खाणे, अन्नाचा माश्यांशी संपर्क येणार नाही अशी काळजी घेणे वगैरे प्रतिबंधक उपाय केल्यास रोगप्रसाराला आळा घालता येतो.
चिकित्सा : पूर्वी हा रोग फार प्रमाणात मारक होत असे, पण अलीकडे सल्फा औषधे विशेषत: सल्फाग्वानिडीन हे औषध फार गुणकारी ठरलेले आहे, शिवाय नवीन प्रतिजैव [→ प्रतिजैव पदार्थ] औषधांचाही चांगला उपयोग होतो. निर्जलीभवन झाले असल्यास द्राक्षशर्करा (ग्लुकोज) व लवणद्रावाचा (सलाइनाचा) उपयोग करतात. या सर्व उपायांमुळे अलीकडे या रोगापासून होणारी मृत्युसंख्या बरीच कमी झालेली आहे.
(२) अमीबाजन्य : या प्रकाराचा आमांशही उष्ण व समशीतोष्ण कटिबंधात अधिक प्रमाणात आढळतो. रोगाचे मूळ कारण म्हणजे ऊतकविलेयी (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांनाम्हणजे ऊतकांना विरघळविणारा) अमीबा (लॅटिन नाव एंटामीबा हिस्टॉलिटिका) हा एककोशिक प्रजीव असून तो दूषित अन्नपाण्याबरोबर शरीरात प्रवेश करतो. त्यावेळी त्याचे स्वरूप पुटिमय असते. लघ्वांत्रात (लहान आतड्यात) अन्न गेल्यावर पुटीच्या बाह्यावरणावर अग्निपिंडस्रावाचा [→ अग्निपिंड] परिणाम होऊन ते विरघळून जाते व आतील अमीबा मोकळा होऊन त्याचे वर्धी स्वरूप प्रकट होते. हा अमीबा बृहदांत्राच्या श्लेष्मकलेच्या कोशिकांचा नाश करून अध:श्लेष्मात (श्लेष्मकलेखालील थरात) घुसतो. तेथे त्याच्यामुळे शोथ उत्पन्न होऊन लहानसा विद्रधी [पूयुक्त फोड, → विद्रधि] तयार होतो. हा विद्रधी मोठा झाल्यानंतर श्लेष्मकलेच्या पृष्ठभागावर येऊन फुटतो व त्या जागी व्रण तयार होतो. व्रणाच्या कडा जाड असून त्या अध:क्षरित (आतील बाजूने कुरतडलेल्या) असतात. दोन व्रणांच्या मधला श्लेष्मकलेचा भाग अविकृत असतो. व्रण मुख्यत: उंडुकात (अन्नमार्गापासून निघालेल्या व बाहेरील टोकाशी बंद असणाऱ्या पिशवीत), आरोही व अवग्रहाकारी (S असा आकार असलेल्या भागात) बृहदांत्रात दिसतात. गुदांत्रातही असेच व्रण होऊ शकतात. व्रणांच्या तळाशी शोथ आलेला असून त्यावर रक्त व श्लेष्मा चिकटलेला असतो. व्रण अधिकाधिक खोल होत गेल्यास पर्युदरशोथ होतो चिरकारी पर्युदरशोथामध्ये पर्युदराचे थर एकमेकांस चिकटतात. त्यामुळे आंत्रामध्ये रोध उत्पन्न होऊ शकतो. अमीबाचा आंत्रकेशिकांमध्ये (आतड्यातील केसासारख्या बारीक नलिकांमध्ये) प्रवेश झाल्यास तो रक्तवाहिनीमार्गे यकृतादी अंतस्त्यांत (अंतर्गत इंद्रियांत) जाऊन तेथे एक किंवा अधिक विद्रधी उत्पन्न करतो [→ यकृतशोथ].
लक्षणे : संसर्ग झाल्यानंतर २१ ते ४२ दिवसांच्या परिपाक कालानंतर लक्षणे दिसू लागतात. ह्या प्रकाराचा आमांश बहुधा हळूहळू सुरू होऊन पुढे लक्षणे वाढत जातात. सुरुवातीस दिवसातून तीनचार वेळा जुलाब होतात. मल दुर्गंधियुक्त असून त्यात चिकट श्लेष्मा व काळपट रक्त पडू लागते. भूक कमी होते त्यामुळे अन्न कमी जाते व फार अशक्तपणा येतो. पोटात दुखु लागून शौचाच्या वेळी मुरडा होऊ लागतो. क्वचित सुरुवात तीव्र स्वरूपात होते. त्यावेळी ज्वरादी लक्षणे दंडाणुजन्य आमांशासारखीच असू शकतात. उंडुक, श्रोणिबृहदांत्र (गुदांत्राच्या आधीचा मोठ्या आतड्याचा भाग) व आरोही व अवरोही बृहदांत्र भागावर दाबले असता दुखते. दिवसातून १०-१२ वेळा शौचास जावे लागते.
निदान : तीव्र स्वरूपाचे निदान करणे काही वेळा कठीण होते. मलपरीक्षा केली असता सूक्ष्मदर्शकाने अमीबाचे वर्धी किंवा पुटिमय स्वरूप दिसते, त्यामुळे निदान करणे शक्य होते.
चिकित्सा : या रोगाकरिता पूर्वी कुड्याचे पाळ वापरीत. या औषधाचा चिरकारी प्रकारात चांगला उपयोग होतो. एमेटीन हे औषध फार गुणकारी आहे, पण त्याचा उपयोग फार जपून करावा लागतो कारण त्याचा हृद्स्नायूंवर विपरीत परिणाम होतो. या औषधाची अंतःक्षेपणे (इंजेक्शने) रोज एक याप्रमाणे ७-८ दिवसांपेक्षा जास्त देत नाहीत. एमेटिनापासून तयार केलेले एमेटीन-बिस्मथ-आयोडाइड किंवा कुड्याच्या पाळापासून केलेले कुर्ची-बिस्मथ-आयोडाइड यांचाही चिरकारी आमांशात चांगला उपयोग होतो.
अलीकडे व्हायोफॉर्म व डाय-आयोडोक्विन ही आयोडीन असलेली औषधे निघाली असून ती फार गुणकारी ठरलेली आहेत. सल्फाजातीच्या व प्रतिजैव औषधांचा उपयोग फक्त उपद्रवी संसर्गासाठी होतो.
अमीबाजन्य आमांश होऊन गेल्यावर कित्येक लोकांच्या मलात अमीबाची पुटिमय अवस्था आढळते. अशा लोकांचा अन्नपाण्याशी संबंध आल्यास ते दूषित होण्याचा संभव असतो. उष्ण प्रदेशांत अशा रोगवाहकांचे प्रमाण शेकडा ३ पर्यंत असल्याचे आढळून आले आहे.
आयुर्वेदीय चिकित्सा : पहा : आतुरचिकित्सा.
मराठे, प्र. शं.
आमांश, पशूंतील : माणसाप्रमाणेच सर्व पाळीव प्राण्यांना हा रोग होतो. रोग्यास मुरडा होऊन कळा येतात, ताप चढतो व अतिशय थकवा येतो. आमांश गाईम्हशीत व कुत्र्यामांजरांत पुष्कळ वेळा होतो पण घोड्यात क्वचितच आढळतो. माणसात होणारा अमीबाजन्य आमांश डुकरातील अमीबांच्या संक्रामणामुळेही होतो. गाईम्हशींच्या वासरातील एक प्रकारचा आमांश संसर्गजन्य स्वरूपाचा असून त्यात पुष्कळ अतिसार व शीघ्र थकवा ही मुख्य लक्षणे असतात.
या रोगाचे तीन प्रकार कल्पिलेले आहेत : (१) सांसर्गिक जंतुजन्य, (२) परजीवीजन्य व (३) परिस्थितिजन्य.
(१) सांसर्गिक जंतुजन्य : हा प्रकार विशिष्ट जंतूमुळे होतो व संसर्गजन्य असतो. गाईम्हशींत काळपुळी (संसर्गजन्य), बुळकांडी रोग व गळसुजी, डुकरांचा ताप व मेंढ्यांत कोकराचा आजार ह्या रोगांत विशिष्ट रोगजंतूमुळेच आमांश हे एक लक्षण असते. शिवाय मांसातील साल्मोनेला ऐट्रिक या सूक्ष्मजंतूमुळे क्वचित होणारा एक प्रकारचा आमांश कोकरामध्ये संभवतो.
(२) परजीवीजन्य : कॉक्सिडियामुळे तसेच स्ट्राँगायलस कृमीमुळे होणारा प्रकार.
(३) परिस्थितिजन्य : सडके गवत वा बुरसटलेला चारा खाण्यामुळे पोटात जाणाऱ्या विषारी पदार्थांमुळेही आमांश होऊ शकतो. भुकेलेल्या जनावराने जमिनीवर पाथरलेला दूषित चारा खाल्यामुळे किंवा दूषित पाणी पिण्यामुळेही आमांश होतो. कुत्र्यामांजरांत दूषित मांस खाण्याने हा रोग होतो.
या रोगात होणारा आतड्यातील तीव्र दाह, घोड्यात व इतर प्राण्यांत, विशेषकरून बृहदांत्रात होतो व त्यामुळे ती सोलवटली जातात. क्वचित रक्तस्रावही होतो व व्रण आढळतात.
लक्षणे : रोगी जनावर चंदीचारा खात नाही पण पाणी जास्त पिते. अतिशय थकवा आल्यामुळे गळून जाते. पोटात वेदना सुरू होतात, ताप चढतो व तो रोगाच्या निरनिराळ्या अवस्थांत कमीजास्त असतो.
चिकित्सा : पोटात दाह करणाऱ्या दूषित आहारामुळे आमांश झाल्यास तेलयुक्त सौम्य रेचक देऊन दूषित पदार्थ बाहेर पाडण्यासाठी उपाययोजना करतात त्यानंतर आंत्रातील अंतस्त्वचेवर स्तर निर्माण होण्यासाठी स्तंभक (प्रतिबंधक) औषधे व पोटात कळा येत असल्यास वेदनाशामक औषधे देतात. जनावर थकून अशक्त झालेले असते तेव्हा उत्तेजक औषधे देतात किंवा कॅफीन वा कापराचे तेल टोचतात. रक्तवाहिनीतून, नीलेत किंवा त्वचेखाली लवणद्राव देतात. चंदीचारा देत नाहीत पण पिण्यासाठी कोमट पाणी देतात. रोगी जास्तच अशक्त झाला असेल, तर भाताची पेज, पिठाची पातळ लापशी, त्यांत अंड्याचा बलक व शक्य झाल्यास थोडे मद्य मिसळून पाजतात. कुत्र्यास चहा, कॉफी, अंड्याचा बलक व दूध देतात. संसर्गजन्य रोगामुळे आमांश झाल्यास विशिष्ट प्रतिजैव व सल्फा औषधे देतात.
कोकरांचा आमांश : दहा दिवसांपेक्षा लहान कोकरांत होणारा आतड्याचा संसर्गजन्य व्रणयुक्त शोथ. हा रोग वर्षावर्षाने जास्त कोकरांत तीव्रतेने पसरणारा असून मृत्यूचे प्रमाणही वाढते. इंग्लंडच्या उत्तरेस व स्कॉटलंडच्या दक्षिणेस राहणाऱ्या मेंढपाळांना हा रोग एक भयंकर भेडसावणारी समस्या आहे. सध्या तो वेल्स परगण्यापर्यंत पसरला असून पुढेपुढे पसरतच आहे.
मेषक्षेत्रावरील (मेंढवाड्यातील) नवीन जन्मलेल्या कोकरांपैकी पहिल्या वर्षी १० ते १२, दुसऱ्या वर्षी २५ ते ४०, तिसऱ्या वर्षी ५० ते ६० तर चौथ्या वर्षी ५५ ते ६० टक्के कोकरे मृत्युमुखी पडतात.
कारणे : क्लॉस्ट्रिडियम वेल्चाय (बी) जंतूमुळे हा रोग होतो. कोकराच्या जन्मानंतर मातेच्या कासेमार्फत, मागील पायावरील मळकट लोकरीतून किंवा प्रत्यक्ष जमिनीतून रोगसंसर्ग होण्याची धास्ती असते. इतर वेळी रोगामुळे मेलेल्या किंवा मरणोन्मुख कोकरास हुंगण्याने किंवा कुरतडण्यामुळेही रोगसंसर्ग होतो. कोकराच्या आयुष्याचे पहिले २४ तास महत्त्वाचे असतात. ह्या काळात रोगक्षमता जास्त असते म्हणून ह्या वेळीच त्याला रक्तरस टोचून रोगप्रतिबंध शक्य होतो.
लक्षणे : रोगाच्या तीव्र स्वरूपात, रात्रीच्या वेळी कोकरे प्राकृतावस्थेत (सुस्थितीत) आढळली तरी सकाळी २-३ मरून पडलेली आढळतात. दिवसा लक्षणे आढळलीच तर पुढील असतात. कोकरू मलूल, निरुत्साही झालेले दिसते. मातेला न पिता अर्धवट झोपलेल्या स्थितीत पडून रहाते. मातेच्या आवाजाकडेही त्याचे लक्ष नसते. पडल्या जागेवरून हलविण्याचा प्रयत्न केल्यास ते ताठरलेले व वेदना होत असल्याप्रमाणे करते. प्रथम मलात काहीही फरक झालेला नसला तरी मलोत्सर्ग कष्टमय व वेदनायुक्त होतो. नंतर मात्र मल रंगाने तपकिरी लाल (क्वचित पिवळसर), अर्धवट प्रवाही व लाल रक्तमिश्रित होतो. अशा अवस्थेमध्ये थोड्या वेळातच कोकरू बेशुद्ध होते व मरते.
कमी तीव्र स्वरूपात कोकरू २-३ दिवस जगते. वरीलप्रमाणेच लक्षणे पण गंभीर नसतात. मेषक्षेत्रात वर्षानुवर्षे रोगसंसर्ग होतो किंवा मोठ्या कोकरातही रोग होतो तेव्हा रोगाचे शंका येण्यासारखे पहिले लक्षण म्हणजे कोकरू आईपासून मागे पडते, आई कोकराची वाट पहात मागे रहाते, मेंढीची कास दुधाने भरलेली असते, कोकरू अर्धवट पिते किंवा मुळीच पीत नाही. कोकराच्या पाठीस बाक येतो. पोट रिकामे दिसते. तपकिरी किंवा पिवळसर लाल रंगाचा, दुर्गंधियुक्त मल शेपटीभोवताली लोकरीला चिकटलेला दिसतो. कोकरू दिवसेंदिवस अशक्त होते. थंडीवाऱ्याची काळजी न करता कोठल्याही अवस्थेत व कोणत्याही शरीराच्या अंगस्थितीत पडून रहाते. नंतर बेशुद्ध होऊन १ ते ४ तासांत मृत्यू पावते.
मरणोत्तर तपासणी : मेलेले कोकरू फाडल्यास त्याचे आंत्र सुजलेले आढळते, पर्युदरगुहा (आतडी, यकृत इ. अवयव असलेली पोकळी) द्रवाने भरलेली किंवा आंत्र आजूबाजूच्या अंतस्त्यास चिकटण्यास कारणीभूत होणारा, जाड गोंदासारखा पदार्थ थोडासा असतो. आंत्राचा शोथ झालेला लहानसा भाग तपासल्यास यावर लहान लहान व्रण झालेले आढळतात. आंत्रातील पदार्थ रक्तमिश्रित व प्रवाही असून त्याला असह्य वास येतो. यकृत आकाराने मोठे व नेहमीपेक्षा निस्तेज दिसते.
रोगप्रतिबंध : ह्याच्या दोन पद्धती आहेत. पहिलीत मेंढी फळण्यापूर्वी एकदा व नंतर विण्यापूर्वीच्या आठवड्यात अशी दोन वेळा जंतू व जंतुविष असलेली लस टोचतात. त्यामुळे रोगप्रतिरक्षा होते व आईच्या पहिल्या दुधाबरोबर रोगप्रतिबंधक प्रतिपिंड (जंतू व जंतूविष यांना प्रतिरोध करणारे रक्तद्रवात निर्माण होणारे पदार्थ) कोकराच्या शरीरात दाखल होतात. दुसरीत कोकराच्या जन्मानंतर ताबडतोब १२ तासांपूर्वीच आमांशाविरुद्ध प्रतिरक्तरसाची (तयार प्रतिपिंड असलेल्या रक्तरसाची) टोचणी देतात. ह्यामुळे परकृत रोगप्रतिरक्षा तीन आठवड्यांपर्यंत टिकते. कोकराचा आमांश व वृक्कमृदुता (मूत्रपिंड मऊ होणे) ह्या दोन्ही रोगांविरुद्ध प्रतिबंधक म्हणून एक दुहेरी उपयोगाची लस उपलब्ध आहे.
गद्रे, य. त्र्यं.
संदर्भ : Hunter, D. Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, London, 1959.
“