‘कल्कि’- आर्‌. कृष्णमूर्ति : (९ सप्टेंबर १८९९ — ५ डिसेंबर १९५४). प्रसिद्ध तमिळ कादंबरीकार व पत्रकार. त्यांचे मूळ नाव आर्‌. कृष्णमूर्ती असले, तरी ते ‘कल्कि’ या टोपण नावानेच विशेष प्रसिद्ध आहेत.  

विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दोन दशकांतील बहुतांश तमिळ कादंबऱ्या केवळ करमणूकप्रधान होत्या आणि त्या पाश्चात्य हेरकथा व सामान्य दर्जाच्या कादंबऱ्‍यांवरून केलेल्या अनुवादांच्या स्वरूपाच्या होत्या. त्यांचा खप मात्र पचंड होता. यातील बहुतेक अनुवादित कादंबऱ्‍या आज इतिहासजमा झाल्या आहेत. ह्या काळातच कल्की वृत्तपत्रव्यवसायात पडले. ते प्रथम आनंद विकटन्‌ साप्ताहिकाचे संपादक (१९२९—४०) व नंतर कल्कि या साप्ताहिकाचे संपादक (१९४१—५४) होते. ह्या साप्ताहिकांतूनच ते आपल्या कादंबऱ्या क्रमश: प्रसिद्ध करू लागले. वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या आकर्षक निवेदनशैलीमुळे ते लवकरच कादंबरीकार म्हणून प्रसिद्धीस आले. कालवश होईपर्यंत त्यांचे कादंबरीलेखन अव्याहत चालू होते. त्यांच्याऐतिहासिक कादंबऱ्यांमुळे त्यांना विशेष लोकप्रियता लाभली. आपल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांत रंजक कथानकासोबतच पल्लव आणि चोलकालीन समाजाची जी सांस्कृतिक पार्श्वभूमी त्यांनी समर्थपणे चित्रित केली आहे, ती वाचकांना विशेष आवडली. शिवगामियिन्‌ शपथम्‌ (१९४६) ही त्यांची ऐतिहासिक कादंबरी अत्यंत लोकप्रिय असून ती ‘गद्य-महाकाव्य’ म्हणून गौरविली जाते. काही सामाजिक कादंबऱ्यांतून त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेणाऱ्या व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. अलै ओशै (१९४९) ह्या त्यांच्या कादंबरीस राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या काही गाजलेल्या कादंबऱ्यांची नाट्य-रूपांतरे झालेली आहेत आणि काहींवर चित्रपटही निघाले आहेत. कल्कींनी काही लघुकथाही लिहिल्या असून १९३१ मध्ये त्यांचा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. कादंबऱ्‍या, कथा, निबंध इ. मिळून त्यांचे सु. पस्तीस ग्रंथ प्रकाशित झाले आहेत.  

कळ्वनिन्‌ कादलि (१९३७) ह्या त्यांच्या कादंबरीचा नायक एक चोर असून त्याच्या जीवनातील चढ-उतार त्यांनी अत्यंत सहानुभूतीपूर्वक व सुजाणपणे चित्रित केले आहेत. त्यागभूमि (१९३८) ह्या कादंबरीत, बालपणी सावत्र आईचा जाच व पुढे सासरी अनेक यातना सोसणाऱ्या एका तेजस्वी नायिकेच्या जीवनाचे वास्तव चित्रण आहे.  

मार्मिक विनोद व उपरोध तसेच प्रासादिक शैली यांसाठी कल्की प्रख्यात असून तमिळ साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली आहे. मद्रास येथे त्यांचे निधन झाले. 

वरदराजन्‌, मु. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)