आदिलशाही (१४८९ — १६८६) : पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण हिंदुस्थानात स्थापन झालेली एक मुसलमानी राजसत्ता. ðबहमनी सत्ता निष्प्रभ झाल्याचा फायदा घेऊन त्याच राज्यातील विजापूरचा सुभेदार यूसुफ आदिलखान १४८९ मध्ये स्वतंत्र झाला. तोच आदिलशाही घराण्याचा संस्थापक होय. सुमारे दोनशे वर्षे या घराण्याची सत्ता दक्षिणेत होती. या काळात युसूफ आदिलखान (१४८९ — १५१०), इस्माइल आदिलशहा (१५१० — १५३५), इब्राहिम आदिलशहा (१५३५ — १५५७), पहिला अली आदिलशहा (१५५७ — १५८०), दुसरा इब्राहिम आदिलशहा (१५८० — १६२७), मुहंमद आदिलशहा (१६२७ — १६५६), दुसरा अली आदिलशहा (१६५६ — १६७२) आणि दुसरा शिकंदर आदिलशहा (१६७२ — १६८६) असे सुलतान होऊन गेले.

यूसुफ आदिलखान मुत्सद्दी, कर्तबगार व सहिष्णू होता. इस्माइल आदिलशहाच्या कारकीर्दीत अनेक लढाया व कटकारस्थाने झाली. या दोन्ही सुलतानांची कारकीर्द आदिलशाही सत्ता सुस्थिर करण्यात गेली. यासाठी त्यांना बहमनी राज्यातील अमीर बरिदशी झगडावे लागले. यूसूफने विजयानगरच्या राजाशी तह करून बरिदचा पराभव केला. यानंतर विजयानगरच्या राजाने केलेल्या स्वाऱ्या यूसुफने परतविल्या. 

यूसुफकडून १५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोवे काबीज करून कुडाळपासून चित्ताकूलपर्यंतचा प्रदेश जिंकला. इस्माइल आदिलशहाने १५२४ मध्ये पोर्तुगीजांकडून साष्टी, बारदेश आणि त्याभोवतालचा प्रदेश हस्तगत केला. इब्राहिम व पहिला अली आदिलशहा यांचा पोर्तुगीजांशी संघर्ष निर्माण झाला. इब्राहिमचा प्रतिस्पर्धी शहाजादा अब्दुल्ला हा १५४३ मध्ये पोर्तुगीजांच्या आश्रयास गेला. पोर्तुगीजांनी त्यास मदत करू नये, म्हणून इब्राहिमने साष्टी व बारदेश हे प्रांत पोर्तुगीजांना बहाल केले. १५७०-१५७१ मध्ये अली आदिलशहाने मुर्तजा निजामशहा व कालिकतचा सामुरी (झामोरीन) यांच्याशी हातमिळवणी करून गोवा व चौल घेण्याचा प्रयत्‍न केला. पण त्यात त्यांना यश मिळाले नाही. 

आदिलशाही सुलतानांना निजामशहा, कुतुबशहा, बरिदशहा व विजयानगरची सत्ता यांच्याशी सतत झगडावे लागले. विजयानगरच्या राजाने जिंकून घेतलेल रायचूर, मुद्‍गल हे प्रांत इस्माइलने अनेकदा प्रयत्‍न करून जिंकून घेतले. अमीर बरिदने निजामशहाच्या मदतीने विजापूर घेण्याचा प्रयत्‍न केला होता, परंतु इस्माइल व इब्राहिम आदिलशहांनी त्यांचा पराभव करून सोलापूर जिंकून घेतले. अमीर बरिद मरण पावल्यावर आदिलशाही सुलतानांच्या मागची कटकट कमी झाली.

आदिलशाही आणि ð निजामशाही सुलतानांमध्ये १५३१ ते १५९४ पर्यंत राज्यवृद्धीसाठी संघर्ष चालू होता. सोलापूरचा किल्ला व त्याखालील साडेपाच परगणे हे त्यांच्यातील युद्धाचे मुख्य कारण होते. निजामशहाने विजयानगरचा रामराजा आणि कुतुबीकुत सुलतान यांच्या मदतीने १५४३ मध्ये विजापूरच्या प्रदेशावर स्वारी केली. तेव्हा आदिलशाही प्रधान आसदखान याने विजयानगरच्या राजाशी तह केला. निजामशहाला सोलापूर महाल दिला व कुतुबशहाशी लढून त्याचा पराभव केला. बुऱ्हाण निजामशहाला सोलापूर परगणा मिळूनही तो तृप्त नव्हता. आसदखान मरण पावल्यावर, १५४९ मध्ये निजामशहाने विजयानगरच्या रामराजाशी तह करून विजापूरच्या प्रदेशावर स्वाऱ्या केल्या. त्याने रामराजासाठी रायचूर व मुद्‍गल आणि स्वतःसाठी कल्याणी व सोलापूर अशी ठाणी जिंकून घेतली.

अली आदिलशहाने विजयानगरच्या रामराजाची मदत घेऊन निजामशहाने केलेल्या स्वाऱ्या परतविल्या. याचा फायदा विजयानगरच्या राज्याला मिळाला. त्या राज्याची सत्ता वाढली. त्यामुळे त्या राज्यात व आदिलशाही सत्तेत वितुष्ट आले. थोड्याच दिवसांत निजामशहा व आदिलशहा हे एकमेकांतील वैर विसरले. स्‍नेहसंबंध दृढ करण्यासाठी १५६४ मध्ये हुसेन निजामशहाने आपली मुलगी ðचांदबिबी व सोलापूरचा किल्ला पहिला अली आदिलशहा याला दिला. यानंतर अली आदिलशहा, निजामशहा, इब्राहिम कुतुबशहा आणि अली बरिद यांनी एकत्र होऊन १५६५ मध्ये तालिकोटच्या लढाईत विजयानगरचे राज्य नष्ट केले.

निजामशहा व आदिलशहा यांच्यातील मैत्री फार काळ टिकू शकली नाही. त्यांच्यात पुन्हा स्पर्धा सुरू झाली. मुर्तजा निजामशहा अल्पवयी असल्याचा फायदा घेऊन अली आदिलशहाने निजामशहाला मिळालेला पूर्वीच्या विजयानगर राज्यातील प्रदेश जिंकून घेतला. यावेळी विजापूर राज्याची सीमा उत्तरेस नीरा, अक्कलकोट, नळदूर्ग, कल्याणपर्यंत, (काही अपवाद सोडून) पश्चिमेस बाणकोटच्या दक्षिणेकडील समुद्र किनाऱ्यापर्यंत, दक्षिणेस तुंगभद्रा नदीपर्यंत आणि पूर्वेस रायचूर, यादगीर, बिदरपर्यंत होती. 


अली आदिलशहाचा १५८० मध्ये एका खोजाने खून केल्यानंतर त्याचा पुतण्या दुसरा इब्राहिम आदिलशहा गादीवर आला. तो अल्पवयी असल्याने चांदबिबी व दिवाण कारभार पाहू लागले. राज्यकारभार बळकावण्याच्या महत्त्वाकांक्षेने चांदबिबीला कैद करण्यापर्यंत दिवाणाची मजल गेली होती. थोड्याच दिवसांत तिची सुटका करण्यात आली. विजापूर दरबारात उत्तरी व दक्षिणी लोकांत सत्तास्पर्धी सुरू झाली. याचा फायदा घेऊन मुर्तजा निजामशहाने कधी एकट्याने, तर कधी कुतुबशहाच्या मदतीने विजापूरवर स्वाऱ्या केल्या. इब्राहिम आदिलशहाची बहीण मुर्तजा निजामशहाच्या मुलाला देऊन सोयरिकीच्या संबंधांनी या दोन्ही राज्यांत पुन्हा मैत्रीचे संबंध जोडले गेले पण हे मैत्रीचे संबंध फार काळ टिकू शकले नाहीत. वयात येताच इब्राहिमने सर्व राज्यकारभार आपल्या हातात घेऊन मलनाड राजाकडून खंडणी वसूल केली. त्याने निजामशाहीविरुद्ध यशस्वीपणे प्रतिकार केला असला, तरी मलिकंबरबरोबर झालेल्या लढाईत त्याला पराजय पतकरावा लागला. १६१९ मध्ये इब्राहिमने बरिदशाहीवर स्वारी करून, तिचा सर्व मुलूख जिंकून आपल्या राज्यास जोडला. 

आदिलशाही सुलतानांनी १५९४ ते १६३६ पर्यंतच्या काळात निजामशाहीशी वैर विसरून त्या राज्यावर आलेल्या मोगलांच्या आक्रमणाविरुद्ध चांदबिबीला व निजामशाही तारण्यासाठी झटणाऱ्या ð शहाजीला सर्व तऱ्हेचे साहाय्य दिले, निजामशाही बुडाल्यानंतर (१६३७) शहाजी आदिलशहाकडे नोकरीला राहिला. आदिलशहाने त्याला कर्नाटकात काही परगणे व महाराष्ट्रात इंदापूर, पुणे, बारामती ही परगणे जहागीर म्हणून दिले.

इब्राहिमनंतर गादीवर आलेला अहंमदशहा व मोगल बादशहा शहाजहान यांच्यात वितुष्ट आले. १६३१, १६३२ व १६३५ या सालीं शहाजहानने निरनिराळ्या कारणांवरून विजापूरवर स्वाऱ्या केल्या. शेवटी १६३६ मध्ये तह होऊन कृष्णा नदीच्या पलीकडील प्रदेश मोगलांकडे आणि कृष्णा नदीच्या अलीकडील प्रदेश आदिलशहाकडे राहिला. आदिलशहाने मोगल बादशहास सालीना २० लाख होन खंडणी देण्याचे कबूल केले. 

अली आदिलशहाच्या कारकीर्दीत आदिलशाहीस उतरती कळा लागली. त्याला मोगलांच्या व मराठ्यांच्या वाढत्या सत्तेबरोबर सामना द्यावा लागला होता. औरंगजेबाने पूर्वीचा तह मोडून बिदर, कल्याणी आणि गुलबर्गा जिंकले. १६६६ मध्ये मोगल सरदार जयसिंग याने विजापूरवर हल्ला केला.

शिवाजीने आदिलशाही मुलखातील मावळ प्रदेशातील अनेक गड घेऊन स्वराज्यस्थापनेस सुरवात केल्यामुळे त्याचे व अली आदिलशहाचे संबंध बिघडले.    शिवाजीच्या उद्योगावर दडपण आणण्यासाठी अली आदिलशहाने शहाजीला कैद केले. युक्तीने शहाजीची सुटका केल्यानंतर शिवाजीने आदिलशाही मुलूख पादाक्रांत करण्याचा उपक्रम चालूच ठेवला. या उपक्रमाला आळा घालण्यासाठी अली आदिलशहाने अफजलखानास शिवाजीच्या पारिपत्यासाठी पाठविले. शिवाजीने अफजलखानाचा वध केला. यानंतर सिद्दी जोहाराला शिवाजीच्या विरुद्ध पाठविले. १६७५ पर्यंत शिवाजी व आदिलशहा यांच्यात संघर्ष चालू होता.

अल्पवयी शिकंदरशहाच्या कारकीर्दीत राज्यात अंतर्गत बंडाळी निर्माण झाली होती. त्याचा फायदा शिवाजी व औरंगजेब यांनी घेऊन आपापल्या राज्यांचा विस्तार केला. 

आदिलशाही राज्यात पठाणांचे वर्चस्व वाढत होते. त्याचा फायदा घेऊन मोगल तेथे सत्ता स्थापन करण्याच्या विचारात होते. दक्षिण हिंदुस्थान स्थानिक सत्ताधीशांच्या ताब्यात राहाण्यासाठी शिवाजीने आदिलशाही व कुतुबशाही सुलतानांशी १६७५-१६७६ मध्ये तह केले व पठाणांच्या वाढत्या सत्तेला आळा घालून, मोगलांच्या प्रतिकाराची सिद्धता केली. दक्षिण पादाक्रांत करण्याच्या ईर्षेने औरंगजेबाने १६८३ पासून आदिलशाही राज्यावर आक्रमण सुरू केले. त्यावेळी छत्रपती   संभाजी व कुतुबशहा यांनी शिकंदर आदिलशहाला सर्वप्रकारे साह्य दिले. १६८६ मध्ये औरंगजेबाने सुलतानांना वार्षिक तनखा देऊन आदिलशाही राज्य खालसा केले.


आदिलशाही राज्यपद्धती साधी होती. सुलतान सर्वश्रेष्ठ असे. त्यानंतर सर्वात मोठा अधिकारी वकील (वजीर) असून तोच मुख्य शासनाधिकारी असे. त्याच्या खालोखाल मीरजुमला आणि त्यानंतर मुसत फिऊल मुल्क असे. १५६५ नंतर पहिला अली आदिलशहा याच्या कारकीर्दीत त्याचा वकील अफजलखान शिराझीने खातेविभागणी करून प्रत्येक खात्यावर नामांकित अधिकाऱ्यांची नेमणूक केली. ही राज्यकारभाराची पद्धत शिराझीनंतर पुढे चालू राहिली. मुहंमद आदिलशहाने न्यायनिवाडा, राज्याचा व किल्ल्यांचा बंदोबस्त, रयतेशी वागणूक अशा अनेक बाबींसंबंधी सुमारे ९६ नियम करून ठेवले होते. आदिलशाहीच्या पाच सुलतानांनी स्वतःची नाणी पाडली होती. 

आदिलशाही सरदारांपैकी काहींनी शिया व काहींनी सुन्नी पंथाचा स्वीकार केला. तरीपण हिंदूंवर त्यांची कृपादृष्टी होती. कित्येक जबाबदारीच्या कामावर हिंदू अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली होती. दरबारचे सर्व कामकाज कित्येकदा मराठीतच चाले. आदिलशाही

सरदारांनी विजापूर शहराची स्थापना करून व्यापारी पेठा वसविल्या. परांडा, मिरज, सोलापूर, मुद्‍गल इ. ठिकाणी किल्ले बांधले.

आदिलशाही सुलतानांचा बहुतेक काळ सत्ता टिकविण्यात किंवा तिची वाढ करण्यात गेला असला, तरी त्यांनी संगीत, चित्रकला व वास्तुकला यांकडे दुर्लक्ष केले नाही. आदिलशाही चित्रशैली त्यांच्या उच्‍च अभिरूचीची साक्ष देते. गगनमहाल, जुम्मा मशीद, शहाबुरूज, सातमजली माडी, आनंदमहाल, आरसामहाल, गोलघुमट, इ. सुंदर वास्तू उभारून विजापूरच्या सुलतानांनी आपल्या वैभवात भरच घातली. 

संदर्भ : 1. The Islamic Culture Board, Islamic Culture, Vol XLIV No. 1. Hyderabad – Deccan, January, 1970.

          २. बेंद्रे, वा. सी. संपा. विजापूरची आदिलशाही, मुंबई, १९६८.

          ३. मोडक, बा. प्र. विजापूरच्या आदिलशाही घराण्याचा इतिहास, कोल्हापूर, १८८६.

खोडवे, अच्युत