सुश्रुत : प्राचीन भारतीय आयुर्वेदाचार्य आणि शल्यतंत्रपारंगत. ते भारतीय शल्यतंत्राचे आद्य प्रणेते मानले जातात. त्यांचा काल व चरित्रात्मक तपशील निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि, भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली येथील एन्. एल्. केसवानी ह्यांच्या मते, सुश्रुतांच्या काळाची पूर्वमर्यादा इ. स. पू. ६०० ही होय. सुश्रुत हे दिवोदास काशीराज या धन्वंतरीचे शिष्य होते, असा उल्लेख हेमाद्रिकृत लक्षणप्रकाशा तील अश्वप्रकरणामधील एका श्लोकात आला आहे. यूरोप, अरबस्तान, ग्रीस, कंबोडिया आणि इंडोचायना येथे नवव्या व दहाव्या शतकांत सुश्रुतांचे नाव माहीत झाले होते. अरबस्तानातील वैद्य राझी (इ. स. पू. पहिले शतक) यांनी सुश्रुतांच्या ग्रंथातून शल्यक्रियेचे तंत्र माहीत झाल्याचा उल्लेख त्यांच्या ग्रंथात केला आहे.
सुश्रुतसंहिता : हा सुश्रुतांचा वैद्यकविषयक (शल्यप्रधान) ग्रंथ होय. या ग्रंथामध्ये सूत्रस्थान, निदानस्थान, शारीरस्थान, चिकित्सास्थान व कल्पस्थान असे पाच भाग आहेत. या ग्रंथाचे संपादन नागार्जुन या रसायनज्ञांनी केले असून त्यामध्ये ‘उत्तरस्थान’ नावाचा भाग त्यांनी नंतर जोडलेला असावा असे मानतात. हा भाग धरुन या ग्रंथाला वृद्घसुश्रुत असे म्हणतात.
सुश्रुतसंहिते मधील शारीरस्थान महत्त्वाचे आहे. त्यात वैद्यशिक्षा, औषधमूल विभाग, औषधी चिकित्सा, पथ्यापथ्य विचार इ. विषयांचे विवेचन आहे. चरकसंहिते त अंतर्भूत नसलेली शस्त्रक्रिया सुश्रुतसंहिते त आहे. शस्त्रोपचार व व्रणोपचार हे वैद्यकातील महत्त्वाचे भाग असल्याचे सुश्रुत यांनी सांगितले आहे. त्यांच्या काळात शिर व उदरावरील शस्त्रकर्मे तसेच कृत्रिम नासानिर्मितीसारखी (पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया) शस्त्रकर्मे होत असत. शस्त्रकर्मे व रोग परीक्षणासाठी निरनिराळ्या धातूंची यंत्रे तयार होत असत. सुश्रुतांनी विविध धातूंची शंभराहून अधिक शल्यशस्त्रे तयार करुन त्यांचा उपयोग शल्यतंत्रात केला.
आयुर्वेदानुसार शरीरात तीन दोष आहेत. त्यांना वात, पित्त व कफ अशा संज्ञा आहेत. सुश्रुताचार्यांनी ‘रक्त’ हा चौथा दोष मानला आहे. त्यांनी दोषांच्या संचय-प्रकोपादि-गतीनुसार विचार करुन चिकित्सा करावी असे सांगितले आहे. या चिकित्सा करण्याच्या कालावधीस त्यांनी ‘क्रियाकाल’ अशी संज्ञा दिली आहे. वातज, पित्तज व कफज असे तीन प्रकारचे जिव्हाकंटक असून त्याशिवाय सुश्रुताचार्यांनी अलस व उपजिव्हा असे रोग समाविष्ट करुन पाच जिव्हारोगांचे वर्णन केले आहे. तसेच त्यांनी तालुरोगाचे नऊ प्रकार, सर्वसर (संपूर्ण मुखाला, मुखातील अवयव, ओठ, जीभ व्याप्त करुन होणाऱ्या) रोगाचे चार प्रकार आणि शिरोरोगाचे अकरा प्रकार सांगितले आहेत.
सुश्रुत यांना त्वचारोपण तंत्र, मोतीबिंदू काढणे इ. शस्त्रक्रियांची माहिती होती. प्रसूती योग्य मार्गाने होत नसल्यास मूल बाहेर काढण्याचे उपाय त्यांनी सांगितले आहेत. असाध्य वाटणाऱ्या व्याधीही रसायन चिकित्सेने बऱ्या होऊ शकतात असे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी आपल्या सुश्रुतसंहिता ग्रंथात बालरोगविज्ञानावर ‘कौमारभृत्य’ हे प्रकरण लिहिले आहे. त्यांनी स्थूलता व मधुमेह यांच्या संबंधातील तसेच हा विकार पुढील पिढ्यांमध्ये बीजाद्वारे (आनुवंशिकतेने) प्रेषित होत असल्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी ग्रंथिद्रव्याचा औषधी उपयोग प्रथम केला.
सुश्रुतसंहिते वर जैय्यट (जज्जट वा जैज्जट) आणि गयदास यांनी लिहिलेल्या प्राचीन टीका आज उपलब्ध नाहीत. चक्रदत्त आणि डल्हण यांच्या अनुक्रमे अकराव्या व बाराव्या शतकातील भानुमती व निबंधसंग्रह या टीका उपलब्ध आहेत. सुश्रुतसंहिता या ग्रंथाचे लॅटिन, जर्मन, इंग्रजी तसेच फार्सी -अरबी भाषांत अनुवाद प्रसिद्घ झाले आहेत.
इसवी सनापूर्वी आणि त्यानंतर कित्येक शतके भारतामध्ये सुश्रुत यांची शल्यविद्या प्रमाण मानली जात होती. बौद्घ काळातही सुश्रुत यांचे वैद्यक मूलभूत मानीत.
पहा : आतुरचिकित्सा आयुर्वेदाचा इतिहास शल्यतंत्र व शालाक्यतंत्र.
संदर्भ : १. जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, तिसरी आवृत्ती, वाई, २००५.
२. भिषकरत्न, के. के. सुश्रुतसंहिता, खंड पहिला, दुसरी आवृत्ती, वाराणसी, १९६३.
सूर्यवंशी, वि. ल. साळुंके, प्रिती म.