सुहार्तो, जनरल : (८ जून १९२१–२७ जानेवारी २००८). इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष, लष्करप्रमुख व हुकूमशाह. त्यांचा जन्म जावा बेटावरील केमुसू (जोगजाकार्ता) येथे झाला. या सुमारास इंडोनेशियन बेटे ही डचांच्या आधिपत्याखालील वसाहत होती. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन त्यांनी काही दिवस बँकेत कारकुनी केली व नंतर लष्करी विद्यालयातून इंडोनेशियन आर्मी स्टाफ व कमांड महाविद्यालयातून लष्करी शिक्षण घेतले आणि डच वासाहतिक लष्करात ते रुजू झाले. जपानने दुसऱ्या महायुद्घात इंडोनेशिया जिंकल्यावर ते १९४३ मध्ये लष्करात सामील झाले. जोगजाकार्ता येथे त्यांची रेजिमेंटल कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली (१९४५– ५०). तत्पूर्वी दुसऱ्या महायुद्घात त्यांनी जपानी सैन्यात नोकरी केली. या दरम्यान त्यांनी सिती होर्थिनाह या युवतीबरोबर विवाह केला (१९४७). त्यांना सहा मुले आहेत. त्यांनी १९४९–६५ दरम्यान लष्करात सेवा केली आणि राजकारणापासून ते अलिप्त राहिले. त्यांची प्रथम लेफ्टनंट म्हणून लष्करात नियुक्ती झाली (१९५०). पुढे कर्नल, ब्रिग्रेडिअर जनरल (१९६०) ह्या पदोन्नतीनंतर ते मेजर जनरल (१९६२) व पुढे लष्करातील परिवलन (रोटेशन) पद्घतीनुसार इंडोनेशियन राष्ट्रसेनेचे कमांडर इन चीफ झाले (१९६३) आणि आणीबाणीच्या प्रसंगी त्यांना राजकीय घडामोडीत हस्तक्षेप करण्याची अनुज्ञा देण्यात आली.
या सुमारास राष्ट्राध्यक्ष ⇨ सूकार्णो हे इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यानंतर इंडोनेशियन कम्युनिस्ट पक्षाच्या व चिनी राजवटीच्या कच्छपी गेले होते. त्यांचा उद्देश मुस्लिम धार्मिक समूहांचा प्रभाव, लष्कर आणि आग्नेय आशियातील पाश्चात्त्य देशांचे वर्चस्व नष्ट करण्याचा होता. ३० सप्टेंबर १९६५ रोजी सूकार्णो हे मृत्युशय्येवर आहेत, अशी अफवा उठली आणि कम्युनिस्टांनी उठाव करुन सत्ता काबीज करण्यासाठी लष्करावरच हल्ला केला. त्यांचा उद्देश इंडोनेशियाला चीनचे अंकित राष्ट्र बनविण्याचा होता. प्रथम त्यांनी सहा लष्करी अधिकाऱ्यांना ठार केले मात्र सुहार्तो बचावले आणि त्यांनी मोक्याच्या ठिकाणी नाकेबंदी करुन हा उठाव चिरडून टाकला. अनेक कम्युनिस्ट कार्यकर्ते व समर्थक यांना कंठस्नान घातले आणि सर्व सत्ता लष्कराच्या हाती घेतली. या बंडात सूकार्णोचा हात असल्याचे स्पष्ट झाले तथापि सुहार्तोंकडे त्यांना नाममात्र राष्ट्राध्यक्षपदी ठेवले. मार्च १९६६ मध्ये सूकार्णोंवर दबाव येऊन राज्याची सर्व सूत्रे सुहार्तोंकडे सुपूर्त करणे त्यांना क्रमप्राप्त झाले. जुलै १९६६ मध्ये सुहार्तो लष्करप्रमुख व पंतप्रधान झाले. त्याच्या पुढील वर्षी पीपल्स कन्सल्टेटिव्ह काँग्रेसने सार्वमताने त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली आणि त्यानंतर २७ मार्च १९६८ रोजी त्यांची पाच वर्षांकरिता राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी इंडोनेशियाची ढासळलेली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ‘न्यू ऑर्डर’ नावाचे धोरण जाहीर केले आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अमेरिकेतील अर्थतज्ज्ञांना पाचारण केले. पाश्चात्त्य देशांची आर्थिक मदत घेतली. तेलाचे उत्पादन वाढविले. त्यामुळे विकासकामांना गती मिळाली आणि सुहार्तोंची राष्ट्राध्यक्ष म्हणून बिनविरोध पुनर्निवड झाली. याशिवाय सूकार्णोंनी मुहम्मद हाट्टा (माजी उपाध्यक्ष) यांसारख्या काही प्रतिष्ठित व थोर व्यक्तींना तुरुंगात डांबले होते. त्यांना मुक्त करुन प्रशासनात वरिष्ठ पदे दिली. देशात सुव्यवस्था व सुबत्ता जशी दृढतर होऊ लागली, तशी सुहार्तोंची प्राधिकारवादी प्रवृत्ती वाढली. त्यांनी नागरी स्वातंत्र्यावर निर्बंध लादले. त्यांचा आप्तानुग्रह आणि भ्रष्टाचार उघडकीस येऊन देशभर त्यांविरुद्घ निषेध सभा व निदर्शने होऊ लागली. एक देशभक्त ते अतिभ्रष्ट या त्यांच्या जीवनप्रवासामुळे एकेकाळी लोकांच्या मर्जीतील सुहार्तो देशद्रोही ठरले आणि त्यांची बत्तीस वर्षांची एकाधिकारशाही संपुष्टात आणण्यासाठी विद्यार्थी, जनता, राजकीय पक्ष व विविध मानवी हक्क संघटनांनी मोठा उठाव केला (१९९७). अखेर वाढता संघर्ष लक्षात घेता सुहार्तोंना सक्तीने सत्तात्याग करावा लागला. त्यांच्यावर खटले भरण्यात आले परंतु प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करुन त्यांनी त्यातून सुटका करुन घेतली (२०००). त्यांचे वादग्रस्त चिरंजीव टॉमी यांच्याविरुद्घ भ्रष्टाचाराचे आरोप सिद्घ होऊन त्यांना पंधरा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती परंतु उच्च न्यायालयाने ते आरोप फेटाळले. नामुष्कीचे उर्वरित जीवन सुहार्तोंनी जाकार्तात व्यतीत केले व त्यांचे तिथेच निधन झाले.
सुहार्तोंना संयुक्त राष्ट्राचे पॉप्युलेशन अवॉर्ड (१९८९) मिळाले असून त्यांनी सुहार्तो, माय थॉट्स, वर्ड्स अँड डीड्स (१९८९) या शीर्षकार्थाने आत्मचरित्र लिहिले आहे.
देशपांडे, सु. र.
“