हूल्ट्श, अर्न्स्ट : (२९ मार्च १८५७–१६ जानेवारी १९२७). प्राचीन भारतीय लिपींचे व प्राच्यविद्येचे पुरालेखविद्याविशारद व संशोधक. त्यांचा जन्म सुशिक्षित कुटुंबात ड्रेझ्डेन (जर्मनी) येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी झाले असून त्यांनी ड्रेझ्डेन कॉलेज ऑफ द सिक्रेट क्रॉसमधून उच्च शिक्षण घेतले आणि नंतर ते लाइपसिक विद्यापीठात १८७४ मध्ये पुढील शिक्षणासाठी गेले. तेथे त्यांनी अभिजात वाङ्मय व प्राच्यभाषांचा अभ्यास केला. ब्रॉक हौस, अर्न्स्ट कर्टसीअस, व्हिन्डिश, फ्लायशर, ॲल्ब्रेख्ट इत्यादी प्राच्यविद्यापंडितांची व्याख्याने ऐकली. त्यानंतर त्यांनी लाइपसिक विद्यापीठातून पीएच्.डी. (१८७९) घेतली. त्यांच्या संशोधनात्मक प्रबंधाचा विषय Prolegomena Zudes Vasantaraja Cakuna hebst Textproben. तत्पूर्वी ते युनिव्हर्सिटी ऑफ लाइपसिकमध्ये व्याख्याते म्हणून अध्यापन करीत होते. त्या काळात १८८२ मध्ये ते अभ्यागत व्याख्याता म्हणून व्हिएन्ना विद्यापीठात गेले असताना थोर प्राच्यविद्यापंडित व संस्कृत विभागाचे प्राध्यापक योहान ब्यूलर यांच्याशी त्यांचा संबंध व संपर्क आला. त्यामुळे त्यांच्या भावी जीवनास कलाटणी मिळाली. त्यांनी आपल्या प्रबंधानंतर बौधायन धर्मशास्त्र हा ग्रंथ प्रसिद्ध केला (१८८४). १८८६ पर्यंत त्यांचे व्हिएन्ना विद्यापीठात जाणे-येणे होते. मध्यंतरी १८८४-८५ दरम्यान त्यांनी उत्तर हिंदुस्थानची दीर्घ सफर केली. त्यांच्या भाषाविषयक ज्ञानाचा विचार करून भारत सरकारने त्यांची लिपिशास्त्रज्ञ म्हणून मद्रास इलाख्याच्या पुराभिलेखागार खात्यात नियुक्ती केली. या खात्यात त्यांनी १८८६ ते १९०३ याकाळात लिपिशास्त्रज्ञ म्हणून काम केले. त्यानंतर ते हॉल विद्यापीठात प्राच्यविद्याविषयाचे प्राध्यापक म्हणून अध्यापन करीत असत. 

 

त्यांचे संशोधनात्मक व संपादित लेखन विपुल आहे. त्यांपैकी एपिग्राफिया इंडिका या नियतकालिकाचे जे आठ खंड प्रकाशित झाले (१८९२–१९०८), त्यांपैकी पहिला खंड जेम्स बर्जेस यांनी हूल्ट्श यांच्या सहकार्याने संपादित केला (१८९२). त्यापुढील चार खंड (१८९४–१९०१) हे हूल्ट्शनी संपादिले. सात व आठ हे खंडही त्यांनीचसंपादून प्रस्तावनेसह प्रकाशित केले (१९०२–०८). याशिवाय त्यांनी स्वतंत्र रीत्या साउथ इंडियन इन्स्क्रिप्शन्स हा ग्रंथ प्रकाशित केला (१८९०). तसेच कॉर्पस इन्स्क्रिप्शनम् इंडिकॅरम या ग्रंथाच्या पहिल्या खंडाची सुधारित दुसरी आवृत्ती इन्स्क्रिप्शन्स ऑफ अशोक, खंड-१ प्रसिद्ध केली (१९२५). याव्यतिरिक्त त्यांनी तत्कालीन नियतकालिकांतून काही स्फुट शोधनिबंध लिहिले. त्यांच्या संपादित ग्रंथांच्या प्रस्तावनांतूनही त्यांच्या संशोधनात्मक कार्याची तसेच चिकित्सक व काटेकोर अनुमानाची प्रचिती येते. हूल्ट्श यांनी संस्कृत वाङ्मयाचा ऐतिहासिक व तौलनिक दृष्ट्या अभ्यास केला होता आणि कोरीव लेखांचे विविध लिप्यांतील त्यांचे वाचन अचूक असे. वलभीच्या राजांच्या कोरीव लेखांचे भाषांतर करताना काही विद्वानांनी ‘भट्टारक मैत्रकांविरुद्धच्या लढाईत यशस्वी झाला’, असे म्हटले होते. हूल्ट्शनी ते चुकीचे असून भट्टारक हा मैत्रक घराण्यातील राजा होता, असे सिद्ध केले आणि त्यांचा अन्वयार्थ बहुतेक सर्व विद्वानांनी मान्य केला. तसेच त्यांनी ऋतुसंहाराचा लेखक कालिदास असल्याचे विविध लेखांच्या आधारे दाखविले. हूल्ट्श यांचे कोरीवलेखांच्या संदर्भातील कार्य हे मूलभूत स्वरूपाचे मानले जाते. 

 

हॉल येथे त्यांचे निधन झाले. 

देशपांडे, सु. र.