हूपू : पक्षिवर्गातील कोरॅसिफॉर्मिस गणाच्या उपूपिडी कुलातील एकमेव पक्षी. याचे शास्त्रीय नाव उपूपा इपॉप्स असे आहे. हूपू जवळपास सर्वत्र आढळत असला तरी तो मुख्यतः उष्ण प्रदेश पसंत करतो. तो उघड्या सपाट जागेत, तुरळक झाडीत, नदी-ओढ्यांच्या काठी असणाऱ्या झाडांवर राहतो; त्यामुळे त्याला शिकाऱ्यांपासून संरक्षण मिळते. आशिया खंडामध्ये हूपू गवताळ प्रदेशातील रानांत, नदीखोऱ्यांत, डोंगर-पायथ्याशी पाईन किंवा ओक वृक्षांच्या विस्कळीत जंगलांत आढळतो. घनदाट अरण्याचे प्रदेशतो शक्यतो टाळतो. पश्चिम आफ्रिकेचा किनारी प्रदेशाचा वगळता तो संपूर्ण खंडात आढळतो. तो हिमालयात सस.पासून सु. ६,४०० मी. उंचीवर आढळतो. उत्तर यूरोपमध्ये शेतात मोठ्या प्रमाणात फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमुळे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. 

हूपू (उपूपा इपॉप्स) : घरट्यातील पिलांसह नर व मादी.

हूपू हा सुंदर देखणा पक्षी साळुंखीएवढा असून त्याचा रंग तपकिरी असतो. पाठ, पंख आणि शेपूट यांवर काळे व पांढरे पट्टे असतात. डोक्यावर उघडता व मिटता येणारा पंख्यासारखा पिसांचा तुरा असतो. डोळे लाल-तपकिरी आणि पाय करडे-काळपट असतात. चोच लांब, बारीक आणि थोडीशी बाकदार असते. हूपूची लांबी सु. २८ सेंमी. असून वजन ८०० ग्रॅ.–१.३६० किग्रॅ. एवढे असते. त्याच्या पंखांची लांबी ४३–४८ सेंमी. असते.

हूपू उघड्या किंवा थोड्याफार गवताने झाकलेल्या मैदानात अन्नाचा शोध घेतो. त्यासाठी त्याला त्याच्या लांब टोकदार चोचीचा उपयोग होतो. तोंडाचे मजबूत स्नायू जमिनीखाली चोच उघडायला मदत करतात. गायी-गुरे चरणाऱ्या भागात त्यांच्या शेणातून हूपूकरिता कीटक व अळ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. झाडाच्या बुंध्यावर तो चोचीने जोरात ठोकतो, त्यामुळे सालीत दडलेले कीडे व अळ्या बाहेर पडतात. वाळवी, नाकतोडे, कोळी, गोगलगायी आदी त्याचे अन्न आहे. तसेच तो कधीकधी बेडूक, लहान साप आणि सरडे देखील खातो. तो मोठे भक्ष्य गिळण्याअगोदर त्याचे लहानलहान तुकडे करतो. तसेच भक्ष्याचे न पचणारे भाग (पाय, पिसे आदी) छोट्या गोळ्यांच्या स्वरूपात बाहेर टाकतो. 

मादीस आकर्षित करण्यासाठी नर हूपूचे प्रणयाराधन वैशिष्ट्यपूर्ण असते. नर डोके खाली घालून, मान फिरवत, तुरा खाली करत मृदू, परंतु ठळक हूप हूप हूपऽऽऽ असा आवाज वृक्षांच्या शेंड्यांवरून काढतो. कधीकधी तो तासन् तास आवाज काढतो. त्याचा आवाज रिकाम्या बाटलीत फुंकर मारल्यानंतर येणाऱ्या आवाजासारखा असतो. आपले पंख अर्धवट उघडे टाकून नर हूपू मादीभोवती पिंगा घालतो. तो पुनःपुन्हा तिच्या उघडलेल्या चोचीत आपली चोच खुपसतो. नर आपल्या भागात इतर नरांना फिरकू देत नाही. तो त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी ते ‘द्वंद्वगीत’ गातात. त्यात एकमेकांच्या आवाजावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी प्रत्यक्ष लढाईला देखील सुरुवात होते. ते आपापली छाती फुगवून एकमेकांसमोर उभे राहतात, तुरे उभारतात आणि चोचींनी प्रतिस्पर्ध्याची पिसे उपटतात. 

हूपूचे घरटे झाडांच्या ढोलीत, वाळवींच्या वारुळात, इमारतींच्या जुन्या भिंतींच्या जमिनीलगतच्या खोबण्यांत गवत, शेवाळ किंवा पानांनी बनविलेले असते; परंतु जर अशा जागा सापडल्या नाहीत, तर मादी दगड-खडकांच्या बेचक्यांत, झाडांच्या मुळांखाली किंवा जमिनीखाली देखील अंडी घालते. मादी ७-८ अंडी घालते. अंड्यांचा रंग करडा ते फिकट निळा असून त्यावर ठिपके असतात. मादी साधारण १८ दिवस अंडी उबविते. या काळात नर तिला अन्न भरवितो. मादी पिलांसमवेत आठवडाभर राहते, नंतर ती नरास अन्न शोधण्यासाठी मदत करते. ३-४ आठवड्यांत पिले उडायला लागतात. सुमारे एक वर्षांनी ती प्रजननक्षम होतात. प्रजननाचा काळ प्रदेशनिहाय बदलतो. 

अनेक पक्ष्यांप्रमाणे हूपूची घरटीही वास मारणारी असतात, त्यामुळे त्यापासून शिकारी दूर राहतात. हूपूचा डोक्यावरील तुरा, उडण्याची तुटक आणि हळू पद्धती यांमुळे तो सहजपणे नैसर्गिक शिकाऱ्यांचे लक्ष्य होतो. धोक्याची जाणीव झाल्यानंतर तो पंखांच्या काळ्या-पांढऱ्या कडांची वैशिष्ट्यपूर्ण हालचाल करतो, ज्यामुळे शिकाऱ्यांचे लक्ष विभागले जाते. हूपू गरुड पक्ष्याचे आवडते खाद्य आहे. हूपूचे आयुष्यमान अज्ञात आहे. 

इझ्राएल देशात यूरेशियन हूपू (उ. इपॉप्स) याला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा देण्यात आला आहे. इतर वर्गीकरण पद्धतीनुसार हूपूची दुसरी जाती (उ. आफ्रिकाना) इथिओपिआ ते दक्षिण आफ्रिका येथे आढळते. 

ग्रीस, ईजिप्त व पश्चिम आशियाई देश यांच्या दंतकथांत तसेच प्राचीन ईजिप्त व क्रीट येथील भित्तिचित्रांत तो आढळतो.हायरोग्लिफिक लिपीत टिटवीप्रमाणेच हूपूचेही चित्र स्पष्ट वापरलेले आढळते. तसेच अनेक देशांत त्याला पवित्र मानले जाते. (चित्रपत्र).

वाघ, नितिन भरत

हूपू (उपूपा इपॉप्स) : पंख पसरलेले असताना हूपू (उपूपा इपॉप्स) : पिलास भरविताना.