हुसर्ल, एटमुंट : (८ एप्रिल १८५९–२७ एप्रिल १९३८). रूपविवेचनवादी चळवळीच्या केंद्रस्थानी असलेला जर्मन तत्त्वज्ञ. जन्म प्रोसनट्झ, मोराव्हिया येथे. हे शहर पूर्वी ऑस्ट्रियन साम्राज्यात होते. त्याचे सांप्रतचे नाव प्रोस्टयॉव्ह( चेकोस्लोव्हाकिया) असे आहे. व्हिएन्ना आणि ओलम्यूटस येथील शाळांतून शिक्षण घेतल्यानंतर १८७६ मध्ये त्याने लाइपसिक विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे भौतिकी, गणित, खगोलशास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांचा त्याने अभ्यास केला. गणितात त्याची बुद्धिमत्ता विशेष तल्लख होती. १८७८ मध्ये तो बर्लिन विद्यापीठात दाखल झाला. तेथे त्याने गणिताचा विशेष अभ्यास केला. त्याच्या काळातील प्रमुख गणितज्ञांचा सहवासही त्याला तेथे लाभला. नंतर तो व्हिएन्ना विद्यापीठात गेला. त्या विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची डॉक्टरेट त्याने संपादन केली (१८८२). त्यानंतर व्हिएन्नामध्येच विख्यात जर्मन तत्त्वज्ञ ⇨ फ्रँझ बे्रन्टानो ह्याच्याकडे त्याने तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.
१८८७–१९०१ ह्या कालावधीत हुसर्लने हाले विद्यापीठात अध्यापन केले. ह्या काळातच ‘लॉजिकल इन्व्हेस्टिगेशन्स’ (१९००-१९०१ इं. शी.) हा ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर गटिंगन विद्यापीठात त्याला विद्यापीठीय व्याख्याता म्हणून बोलावण्यात आले. १९०१–१६ पर्यंत तो तेथे होता. १९१६–२९ पर्यंत त्याने फ्रायबर्ग विद्यापीठात अध्यापन केले. निवृत्तीनंतर प्रसिद्ध झालेले त्याचे ग्रंथ–सर्व इं. भा.–असे : फॉर्मल अँड ट्रॅन्सेंडेंटल लॉजिक (१९२९), कार्टेशिअन मेडिटेशन्स (१९३१), द क्रायसिस ऑफ द यूरोपियन सायन्सिस अँड ट्रॅन्सेंडेंटल फिनॉमिनॉलॉजी (१९३६). फिनॉमिनॉलॉजिक सायकॉलॉजी हा त्याचा ग्रंथ त्याच्या मृत्यूनंतर–१९६२ मध्ये–प्रसिद्ध झाला.
हुसर्ल हा ⇨ रूपविवेचनवादाचा (फिनॉमिनॉलॉजी) प्रमुख प्रवर्तक होता. तत्त्वज्ञानाचे स्वरूप आणि कार्यक्षेत्र ह्यांच्याविषयीच्या एका सिद्धांतावर रूपविवेचनवादाची उभारणी झाली आहे. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांना साक्षात प्रतीत होणाऱ्या विषयांचे म्हणजे प्रतीतांचे वर्णन करणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य होय, हा तो सिद्धांत. विख्यात अस्तित्ववादी तत्त्वज्ञ ⇨ मार्टिन हायडेगर ह्याच्या तत्त्वज्ञानाचा उगम रूपविवेचनवादात सापडतो.
फ्रायबर्ग येथे हुसर्ल याचे निधन झाले.
पहा : रूपविवेचनवाद.
कुलकर्णी, अ. र.
“