हुरा : (हिं. व म. हुर्ना सं. तीक्ष्ण दुग्धा लॅ. सेपियम इंडिकम कुल-यूफोर्बिएसी) . हा सु. २१ मी. उंच वाढणारा सदापर्णी वृक्ष भारतात ओलसर भागात विशेषतः समुद्रकिनारपट्टीच्या प्रदेशांत, सुंदरबन (पश्चिम बंगाल), मलबार व त्रावणकोर येथे आढळतो. याची पाने तीक्ष्ण टोके असलेली, तळास टोकेरी किंवा पसरट असून असमतल असतात. पानांचा देठ ४-५ सेंमी. लांब असतो. याला पिवळट, एकलिंगी, ७–९ मिमी. आकाराची फुले टोकावर येतात. याची फळे प्रथम मांसल, नंतर काष्ठमय (बोंडे) व २.५–३.२ सेंमी. व्यासाची असून त्रिखंडी असतात. बिया अनेक, लंबगोल, थोड्या चपट्या, गुळगुळीत व फिकट रंगाच्या असतात.
हुरा वनस्पतीच्या पानांचा उपयोग सुताला हिरवट पिवळा रंग देण्यासाठी करतात. फळांचा वापर मत्स्यविषाकरिता करतात. मुळांच्या सालीचा काढा रेचक व वांतिकारक असून तो चित्तभ्रम व अलर्क रोग (जलद्वेष) यांवर देतात. या वृक्षाचा ⇨ चीक विषारी असून त्यामुळे त्वचेवर फोड येतात. पक्व बिया मसाल्यात घालतात. लाकूड जळणास वापरतात.
सेपियम इन्सायने ह्या पानझडी जातीस दुदला व हुरा हीच हिंदी नावे वापरलेली आढळतात. ती हिमाचल प्रदेश ते कुमाऊँ येथे आढळते. कोकण व उत्तर कारवार येथील शेरोर व शेरोड हे वृक्ष हुरा वृक्षाचा मलबॅरिका प्रकार मानला आहे. मेक्सिकोमध्ये याचा चीक हानिकारक म्हणून प्रसिद्ध असून अमेरिकेत आदिवासी लोक बाणांच्या टोकाला लावण्यासाठी वापरतात. याचे लाकूड पांढरे, नरम व विरळ (स्पंजासारखे) असून ते नंतर करडे दिसते. ते मध्यम कठीण व थोडे हलकेअसते. त्याचा उपयोग तरंडाकरिता (तरंगण्याच्या साधनाकरिता) व खोके, सजावटी सामान, ड्रम, ढोल, खेळणी, आगपेट्या व चप्पल( खडावा) इत्यादींकरिता वापरतात.
पहा : अक्रोड उरा.
परांडेकर, शं. आ.
“