हुपरी : महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील चांदीच्या-रुप्याच्या उत्तम कलाकुसरीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेले शहर. लोकसंख्या २८,९५३ (२०११). कोल्हापूर या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून पूर्वेला २३ किमी., तर हातकणंगले या तालुक्याच्या ठिकाणापासून १७ किमी.वर ते वसले आहे.
रूप्याचे कलात्मक दागिने बनविणे, हा येथील प्रमुख रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग आहे. कृष्णाजी रामचंद्र पोतदार यांनी १९०४ मध्येयेथे पहिला रौप्य कामाचा कारखाना सुरू केला. हुपरी व याच्या परि-सरातील काही गावांतील कारागीर चांदीचे दागिने बनविण्याच्या व्यवसायातगुंतले आहेत. या व्यवसायामुळेच या गावास ‘रजत नगरी’ म्हणून संबोधिले जाते. येथे चांदीच्या कलात्मक दागिन्यांमध्ये प्रामुख्याने ९०% पायल( पैंजण) बनविण्यात येतात. तसेच घुंगरू व इतर दागिने आणि वस्तूही बनविल्या जातात. चांदीचे दागिने बनविण्यासाठी लागणारा कच्चा मालहा जयपूर, कोईमतूर व मुंबई येथून आणला जातो. येथील तयार वस्तूव दागिने खरेदीसाठी मुंबई, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद इ. ठिकाणांहून अनेक व्यापारी येतात. हुपरी येथे अनेक सहकारी औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत. चांदी कारखानदार (उद्योजक) संघटनाही येथेआहे. भविष्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) हुपरीपासून जवळच कागल येथे ‘चांदीचा पट्टा’ म्हणून १०० हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच्या आसमंतात ऊस व नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. येथे जवाहर शेतकी सहकारी साखर कारखाना आहे. येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. येथील अंबाबाईचे व महादेवाचे पुरातन मंदिर प्रसिद्ध आहे.
पवार, मनिषा शशिकांत
“