हुंझा : जम्मू व काश्मीरच्या वायव्य भागातील गिलगिट-बाल्टीस्तान प्रदेशातील पर्वतीय खोरे. हे हुंझा नदीच्या उत्तरेस व पश्चिमेस सस.पासून २,५०० मी. उंचीवर आहे. क्षेत्रफळ सु. ७,९०० चौ. किमी. या खोऱ्याच्या उत्तरेस अफगाणिस्तान व हिंदुकुश पर्वत, दक्षिणेस नगर (नगिर) राज्य व हुंझा नदी असून या खोऱ्याच्या मध्यभागी काराकोरम पर्वताचा उत्तरभाग आहे. या खोऱ्यात रकपोशी (७,७८८ मी.), हुंझा (६,२७० मी.), दरमयनी (६,०९० मी.), बब्लीमौंटन (लेडी फिंगर शिखर, ६,००० मी.) इ. उंच हिमाच्छादित शिखरे आहेत. या खोऱ्यातील अल्टर होप्पर हिमनद्या प्रसिद्ध आहेत. येथे २०१० मध्ये भूमिपात होऊन अताबाद हे सरोवर निर्माण झाले आहे. 

 

हुंझा खोऱ्यातील हवामान थंड आहे. येथे मे महिन्यातील कमालतापमान २७° से. व किमान १४° से. तर ऑक्टोबरमध्ये कमाल१०° से. व किमान –१०° से. पर्यंत असते. येथे गुलाब, पॅन्झी, लिली इ. फुलझाडे पॉप्लर, फर इ. वृक्ष तर हिमचित्ता, बकरी, याक, कोल्हा, मार्को पोलो मेंढ्या इ. प्राणी आढळतात. 

 

हे खोरे पूर्वीच्या हुंझा या वैभवशाली राज्यात असून हे राज्य हुंझाचेमीर यांच्या आधिपत्याखाली होते. येथे मीर यांना थूम म्हणत. हे खोरेव राज्य १८९२ ते १९४७ पर्यंत ब्रिटिशांच्या अखत्यारीत होते. १९७२ नंतर याचा काश्मीरच्या पाकव्याप्त प्रदेशात समावेश झाला आहे. येथे बहुसंख्य शिया मुस्लिम असून बुरूशस्की, वारवी, शिना या त्यांच्या बोली भाषा आहेत. काराकोरम राष्ट्रीय महामार्ग हा येथील प्रमुख दळणवळणाचे माध्यम आहे. 

 

या खोऱ्यात अल्तीत, बल्टिट, अलियाबाद ही प्रमुख शहरे आहेत.या खोऱ्यातील उंच बर्फाच्छादित शिखरे, हिमनद्या, खोल दऱ्या, विविध वृक्ष यांमुळे हे खोरे निसर्गसुंदर असून ते पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. 

 

गाडे, ना. स.