हीसिअड : प्राचीन ग्रीक कवी. त्याच्या जीवनाविषयी फारशीमाहिती मिळत नाही तथापि त्याच्याच काही शब्दांतून थोडी माहिती मिळते. त्याचे वडील आशिया मायनरमधील सायमी ह्या शहराचे रहिवासी होते. दारिद्य्राला कंटाळून ते मध्य ग्रीस-मधील बीओशा येथे आले आणि त्या भागातल्या ॲसक्रा ह्या शहरा-जवळ शेती करू लागले. हीसिअडने आपल्या वडिलांच्या शेतावर काम केले असणार. तो सांगतो, की शेळ्या-मेंढ्या राखीत असताना संगीतादी कला आणि साहित्य ह्यांच्या देवता (म्यूझेस) त्याच्या समोर आल्या आणि काव्यरचना करण्याची आज्ञा त्यांनी त्याला केली. शक्य आहे, की शेती करता करता तो काव्यरचनाही करू लागला.
आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेच्या वाटणीवरून हीसिअड आणि त्याचा भाऊ पर्सेस ह्यांच्यात वाद निर्माण झाला. हीसिअडला कवी म्हणून लौकिक प्राप्त झाल्यानंतर एका काव्यरचना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याला यूबीआ ह्या ग्रीसमधील बेटावर जावे लागले. ह्या एकाच प्रसंगी आपण समुद्र पार केला, असे हीसिअड सांगतो.
हीसिअडची दोन महाकाव्ये उपलब्ध आहेत. एक, थिऑगनी. देवतांच्या आदेशानुसार त्याने लिहिलेला हा देवदेवतांचा काव्यरूप इतिहास आहे. केऑस ह्या आद्य स्थितीपासून आरंभ करून गी वा गेइआ (पृथ्वी) आणि इरॉस अवतीर्ण झाल्यानंतरचा देवदेवतांचा इतिहास ह्या महाकाव्यात तो सांगतो. गेइआने युरेनसला (स्वर्गाला), पर्वतांना आणि पाँटसला, म्हणजे समुद्राला जन्म दिला आणि त्यानंतर यूरेनसबरोबर समागम करून अन्य अनेक देवदेवतांना जन्म दिला. त्यांना हीसिअडच्या निवेदनानुसार टायटन म्हणतात. ह्या टायटनांपैकी एक असलेला क्रोनस ह्याने यूरेनसविरुद्ध बंड करून त्याला पौरुषहीन केले आणि झ्यूस देवाकडून पराभूत होईपर्यंत त्याने राज्य केले. ही कथा म्हणजे थिऑगनीचा मध्यवर्ती विषय होय.
थिऑगनी हीसिअडनेच लिहिली काय याबद्दल शंका प्रकट केलीगेली तथापि आता त्याबद्दल शंका राहिलेली नाही. अर्थात ह्या महाकाव्यात उत्तरकालीन कवींनी घातलेली काही भर निश्चितपणे आहे.
द वर्क्स अँड डेज हे हीसिअडचे दुसरे महाकाव्य. त्याचे स्वरूपबरेचसे व्यक्तिगत आहे. आपला लबाड भाऊ पर्सेस ह्याला उद्देशून ते रचिलेले आहे. अधिकाऱ्यांना लाच देऊन पर्सेसने वडिलांच्या मालमत्तेतला मोठा वाटा मिळवला होता पण तिचे व्यवस्थापन तो योग्य प्रकारे करू शकला नव्हता. त्याला नीतिबोध करण्यासाठी हीसिअडने हे काव्य रचिले आहे. शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनाचे एक वर्ष त्यात त्याने वर्णिलेआहे. हे करताना पशुपक्ष्यांची, झाडाझुडपांची वर्णने त्याने केली आहेत. त्यामुळे यूरोपचा पहिला निसर्गकवी म्हणूनही त्याचे महत्त्व आहे. माणसांच्या सुखदुःखांची तो बारकाईने वर्णने करतो आणि हे करताना अनेक उद्बोधक मिथ्यकथाही सांगतो. प्रामाणिकपणा, न्याय, कठोर परिश्रम ह्यांचे महत्त्व त्याने सांगितले आहे. हे काव्य पर्सेसला उद्देशून लिहिले गेले असले, तरी त्याने केलेला नीतिबोध आणि त्याचे व्यावहारिक सल्ले सर्वच शेतकऱ्यांना लागू पडण्यासारखे आहेत. हीसिअड शुभाशुभ दिवस कोणते हेही सांगतो. दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रसंगांत माणसांनी कसे वागले पाहिजे, ह्याबद्दलचा बोधही तो करतो. झ्यूस हा देव न्यायाचा मूलस्रोत आहे त्यामुळे न्यायाने वागणेच उचित ठरते. चुकीचे वर्तन करणाऱ्यांना झ्यूस शासन करील, हे त्याचे सांगणे आहे. द वर्क्स अँड डेज हे महाकाव्य शूर, पराक्रमी योद्ध्यांचे नाही तर ते साध्यासुध्या शेतकऱ्यांसाठीचे आहे.
ह्या महाकाव्याच्या एका भागात हीसिअड याने मानवेतिहासातली पाच युगे वर्णिली आहेत. सुवर्णयुग, रौप्य युग, ब्राँझ युग, वीर युग आणि लोहयुग ही ती युगे होत. क्रोनसची कारकीर्द हे सुवर्णयुग. त्यानंतरच्या युगांत मानवजातीची अधोगतीच होत गेलेली आहे, असे त्याचे म्हणणे आहे. आपण स्वतः लोहयुगात राहतो आहोत, असे हीसिअडला वाटते. त्या लोहयुगात फक्त जाच आहे, दुःख आहे, कष्ट आहेत आणि संघर्ष आहे अशी त्याची धारणा आहे.
ह्या महाकाव्यात अनेक उद्बोधक मिथ्यकथाही आलेल्या आहेत. पुरुषांना शिक्षा देण्यासाठी झ्यूसच्या आज्ञेने निर्माण करण्यात आलेल्या पँडोरा ह्या पहिल्या स्त्रीची प्रसिद्ध मिथ्यकथाही ह्या महाकाव्यात आहे.
प्राचीन कवी हीसिअडच्या म्हणून गणल्या गेलेल्या काही कविता आता त्याचे अनुकरण करणाऱ्या कवींच्या असल्याचे मानले जाते. ‘कॅटलॉग्ज ऑफ विमेन’ ही ह्या वर्गात मोडणारी कविता मात्र हीसिअडचीच असल्याचा संभव काही अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे. ह्या कवितेत देवतांचे प्रेम आणि त्यांची अपत्ये यांसंबंधी लिहिले असल्याचे दिसते.
⇨ होमरप्रमाणे हीसिअडनेही आयोनियन बोलीभाषेत काव्यलेखनकेले. महाकाव्यांच्या रचनाकारांचे डॅक्टिलिक हेक्झॅमीटर हे वृत्त त्याने वापरले मात्र होमरच्या तुलनेत त्याची भाषा अधिक साधी आहे. व्यक्तिगत सुरात बोलणारा तसेच बोधवादी काव्यरचना करणारा हीसिअड हा पहिला यूरोपीय कवी होय.
हीसिअडचा जीवनावधी नेमका कोणता, याबाबत विविध मतप्रवाह आढळतात. प्राचीन ग्रीकांनी त्याला होमरचा समकालीन मानले. आधुनिक अभ्यासकांच्या मते तो इ. स. पू. ७०० च्या आधीचा असावा. काही अभ्यासकांच्या मते हीसिअडचे लेखन होमरच्या महाकाव्याच्या नंतर (पण फार नंतर नव्हे) झाले असावे कदाचित इ. स. पू. आठव्या शतकात.
संदर्भ : 1. Burn, Andrew Robert, The World of Hesiod, 1936 2nd Ed. 1967.
2. Sager, Werner Wilhelm, Paideia : The Ideals of Greek Culture, Vol. 1 2nd Ed. 1945.
कुलकर्णी, अ. र.
“