हीलिओझोआ : प्रोटोझोआ (आदिजीव) संघाच्या सार्कोडिना वर्गाच्या ॲक्टिनोपोडा उपवर्गातील एक गण. या गणातील प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : (१) हे प्राणी गोलाकार असून बहुतेक प्राणी गोड्या पाण्यात, तर काही खाऱ्या पाण्यात राहतात. ते पाण्यात तरंगणारे किंवा देठासारख्या भागाने खडकास चिकटलेले असतात. (२) या प्राण्यांच्या शरीराभोवती पातळ कवच किंवा कोशिकावरण असून ते सिलिका वा सेंद्रिय पदार्थांपासून बनलेले असते. (३) काही प्राण्यांमध्ये बाह्यकवच शल्कयुक्त (खवले) किंवा काटेरी असून ते प्राण्याच्या स्रावापासून तयार होते. यामुळे प्राण्यांमध्ये विविध आकार तयार होतात. त्याचा उपयोग प्राणी ओळखण्यासाठी होतो. (४) या प्राण्यांच्या कोशिकेच्या सर्व बाजूंनी पादाभ निघतात. त्यामुळे हे प्राणी पाण्यावर तरंगत राहतात. या पादाभांना ‘ॲक्झोपोडिया’ असे म्हणतात. या पादाभांचा उपयोग अन्न मिळविण्यासाठी तसेच हालचाल करण्यासाठी होतो. (५) आदिजीव प्राणी, शैवाल व इतर सूक्ष्म प्राणी हे या प्राण्यांचे अन्न आहे. बहुतेक प्राण्यांत तोंड नसते. पादाभांच्या साहाय्याने अन्न शरीरात घेतले जाते व त्याचे पचन अन्नरिक्तिकेत होते. (६) या प्राण्यांच्या जीवद्रव्याचे बहिर्द्रव्य व अंतर्द्रव्य असे दोन थर असतात. बहिर्द्रव्य अकणिकामय व पारदर्शक असते. (७) या प्राण्यांचे अलैंगिक प्रजनन द्विभाजन पद्धतीने व मुकुलनाने होते. (८) काही कशाभिकायुक्त प्राण्यांमध्ये युग्मक तयार होतात व लैंगिक पद्धतीने प्रजनन होते.
हीलिओझोआ गणातील सन ॲनिमलक्यूले (ॲक्टिनोफ्रिस सोल) हा गोड्या पाण्यात राहाणारा प्राणी आहे. ग्रीन सन ॲनिमलक्यूले (ॲकँथोसिस्टीस टरफॅसिया) या प्राण्याच्या शरीरावर झुक्लोरेलानावाचे हिरव्या रंगाचे शैवाल असून दोघे सहजीवन जगत असतात. ॲक्टिनोस्फीरियम या प्राण्यात अनेक केंद्रके असून या प्राण्याचा व्यास१ मिमी. इतका असतो. ते गोड्या पाण्यात तसेच तलावात आढळतात.ते ॲक्झोपोडियाच्या साहाय्याने (आकुंचन व प्रसरणामुळे) हालचाल करतात. अमीबासारखे सूक्ष्म प्राणी हे त्यांचे अन्न आहे. असे प्राणी ॲक्झोपोडियातील द्रवाच्या साहाय्याने बेशुद्ध करून नंतर ते शरीरातघेतले जातात.
पहा : प्रोटोझोआ सार्कोडिना.
पाटील, चंद्रकांत प.
“