हीमू : (? – ५ नोव्हेंबर १५५६). दिल्लीच्या मुसलमान सत्तेच्या वैभव काळात उदयाला आलेला एक हिंदू पराक्रमी सेनापती. मुस्लिम इति-वृत्तांतून त्याचा हेमू, हेमचंद्र, हीमूशाह असा उल्लेख आढळतो. त्याच्या पूर्वजीवनाविषयी फारशी माहिती ज्ञात नाही परंतु त्याचा जन्म गरीब बनिया ज्ञातीतील धनसार शाखेत झाला. तो अलबारमध्ये लहानाचा मोठा झाला आणि वाण्याचा धंदा करीत असे. योगायोगाने तो इस्लामशाह सूरीच्या नजरेस आला आणि त्याने हीमूची चलाख बुद्धी, धंद्यातील सचोटी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व पाहून त्याला दिल्लीच्या बाजारपेठेचा (शाहूना) अधीक्षक नेमले. याशिवाय त्याच्याकडे गुप्तहेरखात्याचे प्रमुखपद आणि टपालखाते (दरोगा-इ-डाकचौकी) सुपूर्त केले. तसेच इस्लामशाहने लष्कराशी संबंधित महत्त्वाचे व विश्वसनीय व्यवहार त्याच्याकडे सोपविले. इस्लामशाहच्या मृत्यूनंतर (१५५४) अंतःस्थ कलह माजला. त्याचा अज्ञान मुलगा गादीवर आला होता. त्याचा मुबारिझखान याने खून करून गादी बळकाविली आणि मुहम्मद आदिलशाह हे बिरुद धारण केले. राजपुत्राच्या वधामुळे आदिलशाहची नाचक्की झाली आणि राज्याच्या विविध भागांत बंडे उद्भवली. आग्य्राचा राज्यपाल इब्राहीमखान सूर, लाहोरचा राज्यपाल सिकंदर सूर आणि बंगालचा राज्यपाल मुहम्मदखान सूर यांनी बंड करून स्वतंत्र सुलतान झाल्याचे जाहीर केले. इतरही काही छोट्या सरदारांनी हेच धोरण अंगीकारले. तेव्हा आदिलशाहने हीमूची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. त्याला हीमूच्या कार्यक्षमतेची, पराक्रमाची कल्पना होती. त्याने त्याच्यावर सर्व राज्यकारभाराची जबाबदारी टाकली. या आणीबाणीच्या काळात हीमूच्या हाती प्रशासन व लष्कर यांचे सर्वाधिकार होते. त्याने ही जबाबदारी कार्यक्षम रीत्या निभावली. एवढेच नव्हे, तर बंडखोरांबरोबर युद्धे करून त्यांना वठणीवर आणले. अबू-अल्-फज्ल आणि अब्दुल बदाऊनी ह्या दोन मुस्लिम इतिहासकारांनी त्याच्या लढायांची व त्यांत मिळविलेल्या विजयांची जंत्री दिली आहे. या तीन राज्यपालांव्यतिरिक्त त्याने ताजकरारानी आणि रुक्नखान यांचाही युद्धात पराभव केला. त्याने एकूण२२ लढायांत मुबारिझखान याच्या शत्रूंना जिंकून नामोहरम केले.
उत्तर हिंदुस्थानातील अफगाण सरदारांच्या आपापसांतील संघर्षांचा फायदा घेऊन हुमायूनने १५५५ मध्ये काबूलमधून हिंदुस्थानवरील मोहिमेला प्रारंभ केला आणि रोहतास, लाहोर, दिपालपूर, जालंदर वगैरे शहरे जिंकून दिल्ली काबीज केली. त्या वेळी आदिलशाहने बंगाल पादाक्रांत करून तिथे शाहबाझखानाला राज्यपाल नेमून तो चुनार येथे राहू लागला आणि हुमायूनला प्रतिकार करण्यासाठी त्याने हीमूला पाठविले. दरम्यानहुमायूनच्या अपघाती मृत्यूनंतर (जानेवारी १५५६) अल्पवयीन अकबर मोगलांच्या गादीवर आला. तेव्हा हीमूने ग्वाल्हेर ते आग्रा अशी लष्करी मोहीम आखली. आग्य्राचा राज्यपाल इस्कंदरखान उझबेग हीमूचे प्रचंड लष्कर पाहून दिल्लीला पळून गेला. त्यानंतर हीमूने दिल्लीचा राज्यपाल टार्डी बेग याचा पराभव करून दिल्ली घेतली. या युद्धात हीमूला १६० हत्ती, एक हजार अरबी घोडे आणि अमाप सोनेनाणे मिळाले. त्याच्या अखत्यारीत आग्रा व दिल्ली ही दोन महत्त्वाची मोगल ठाणी आली. आग्रा व दिल्ली काबीज केल्यावर हीमूला स्वतंत्र हिंदू राज्य स्थापण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. त्याने राजा विक्रमादित्य हे बिरुद धारण केले. हीमूचेशौर्य, अफाट सैन्य आणि त्याला मिळालेले लष्करी सामर्थ्य यांमुळे मोगल सरदारांनी अकबराचा पालक बैरामखान यास असा सल्ला दिला की, हिंदुस्थानातून मोगलांनी माघार घ्यावी परंतु त्यांचा सल्ला धुडकावून हीमूविरुद्ध मोहीम आखण्याचा निर्णय झाला. हीमूच्या बलाढ्य सैन्याच्या तुलनेत मोगलांचे सैन्य मर्यादित होते. हीमूपाशी १,५०० हत्ती व एकलाख सैन्य होते, तर मोगलांकडे फक्त २०,००० सैन्य होते. पानिपतयेथे ५ नोव्हेंबर १५५६ रोजी युद्धाला तोंड फुटले. हीमूने मोगलांच्या डावी-उजवीकडील सैन्याची फळी फोडून त्वेषाने हल्ला चढविला. अकबराचा पराभव व्हावयाचा, एवढ्यात एक बाण हीमूच्या डोळ्याला लागला आणि तो बेशुद्ध झाला. या अपघातामुळे निर्नायकी होऊन हिमूचे सैन्य दुभंगले गेले. हीमू पकडला गेला. त्याचा शिरच्छेद करण्यात येऊन मोगलांनी हे युद्ध जिंकले. हीमूची देदीप्यमान कारकीर्द संपुष्टात आली.
पहा : पानिपतच्या लढाया सूर घराणे.
संदर्भ : Majumdar R. C. Ed. The Moghul Empire, Bombay, 1998.
देशपांडे, सु. र.
“