हिरानंदाणी, पोपटी रामचंद : (१७ सप्टेंबर १९२४–१६ डिसेंबर २००५). स्वातंत्र्योत्तर भारतातील सिंधी भाषेच्या प्रसिद्ध लेखिका. जन्म पाकिस्तानातील कराची येथे एका उच्चभ्रू सिंधी कुटुंबात. त्या दहा वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आपल्या सात मुलांसह त्यांच्या आईने हैदराबाद (पाकिस्तान) येथे राहण्याचा निर्णय घेतला. सात मुलांचा सांभाळ करताना आईला होणारे कष्ट, करावा लागणारा संघर्ष यांतून हिरानंदाणी यांनी धैर्य आणि संयम हे गुण आत्मसात केले. सिंधी उच्चभ्रू समाजातील तत्कालीन हुंडाप्रथेला तीव्र विरोध करत अविवाहित राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबई येथे स्थायिक झाले. सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयातून बी.ए.ची पदवी संपादन केली. मुंबईतील के. सी. कॉलेजमधून सिंधी विभागाच्या प्रमुख म्हणून त्या निवृत्त झाल्या (१९८०).
नोकरीत असतानाच हिरानंदाणी यांनी स्वतःला लेखनासाठी वाहून घेतले. अरेबिक लिपीतून सिंधी लिखाण करणाऱ्या स्त्रीवादी सिंधी साहित्याच्या प्रमुख व निर्भीड लेखिका म्हणूनही त्यांची ओळख आहे. वैविध्याने नटलेल्या त्यांच्या ललित साहित्याचा प्रमुख विषय स्त्री-पुरुष संबंध व स्वतःचे वैयक्तिक जीवन असा आहे. सु. ६० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. रुह सांदी रुंच (१९७५), मान सिंधी (१९८८) हे काव्यसंग्रह; पुकार (१९५३), जिंदगी-ए-जी-फोत्री (१९९३) हे लघुकथासंग्रह; मंजू (१९५०), हसरतुनि जी तुर्बत (१९६१), जीअ में झोरी, तन मे ताति (१९६८), सैलाब जिंदगी-अ-जो (१९८०) या कादंबऱ्या; सिंधी कलाहाई अजु (१९८५), चुरनि चिपकनि चितमें (१९९०) हे निबंधसंग्रह शाह-सिंधी-तहजीब जो रूह (१९८३), तनकीदी मज्मुन (१९८४) हे समीक्षाग्रंथ; भाषाशास्त्र (१९६२, भाषाविषयक); मणिक-मोतीलाल (१९९३, चरित्रग्रंथ); मुहिंजे हयातीअ जा सोना-रोपा वर्क (१९८०, आत्मचरित्र); हिस्टरी ऑफ सिंधी लिटरेचर (१९८४) इ. त्यांची उल्लेखनीय पुस्तके होत. मुहिंजे हयातीअ … या त्यांच्या ग्रंथास १९८२ चा साहित्य अकादमी पुरस्कार लाभला असून स्मृतीची चाळता पाने या नावाने त्याचे मराठी भाषांतर झाले आहे (२००१).
हिरानंदाणी यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार लाभले असून त्यांपैकी महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार (१९९०), आंतरराष्ट्रीय लतीफ पुरस्कार (१९९०), सिंधी नवरतन पुरस्कार (१९९८), अखिल भारतीय सिंधी बोली आणि साहित्य सभेचा गौरव पुरस्कार (१९९८) इ. महत्त्वाचे होत. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयात सिंधी भाषा सल्लागार समितीच्या सदस्या, साहित्य अकादमीच्या समितीवर निमंत्रक (१९७०–९३), केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निवड समितीच्या सदस्या आदी पदेही त्यांनी भूषविली.
मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
हर्दवाणी, लछमन