हिमोढ : हिमनदीतून वाहून आणलेल्या व निक्षेपित झालेल्या खडकाच्या डबरीला हिमोढ म्हणतात [→ धोंडेमाती]. हिमोढ हेहिमनदीच्या निक्षेपण कार्यातील प्रमुख भूरूप आहे. अतिथंड हवामाना-मुळे पाण्याचे अपवादात्मक प्रसरण होऊन खडकाचे होणारे विदारण, ⇨ हिमलोट,भूमिपात किंवा बर्फाच्या घर्षणाने हिमनदी वाहत असलेल्या दरीची झीज अशा कारणांनी हिमनदीच्या पात्रात प्रचंड आकाराच्या दगडापासून चिकणमातीच्या कणाइतक्या बारीक गाळाचा ढीग होतो. हिमनदीला पडलेल्या भेगांतून यातील काही गाळ तिच्या तळाशी पोहोचतो, तर काही भेगांमध्येच अडकून पडतो. तळाशी जाऊन पोहोचणारे दगड हिमनदीच्या प्रवाहामुळे उताराकडे लोटीत नेले जातात. त्यांच्याघर्षणाने हिमनदीच्या खोऱ्याचा तळभाग खरवडला जातो आणि त्यातील खडकांचे लहान-मोठे तुकडे सुटे होऊन प्रवाहपतित होतात. हिमनदीच्या पात्रात तिच्या तळाशी हिमाचे द्रवीकरण व पुनर्गोठण या क्रिया आळी-पाळीने चालू असतात. यामुळेही तळाच्या खडकांना तडे पडतात व त्याचा परिणाम कालांतराने खडकांचे तुकडे सुटे होऊन हिमनदीबरोबर वाहण्यात होतो. अशा रीतीने निरनिराळ्या मार्गांनी खडकाळ माती हिमनदीच्या पात्रात वाहू लागते. बर्फ वितळला की या दगडांचे व मातीचे ढीग तेथेच पडून राहतात, त्यांनाच हिमोढ म्हणतात व स्थानानुरूप निरनिराळ्या नावांनी ते ओळखले जातात. 

 

हिमनद्यांप्रमाणेच हिमस्तरांनी तयार केलेले हिमोढ सखल प्रदेशांत आढळतात. त्यांनी व्यापलेले क्षेत्र बरेच मोठे असते आणि ते निरनिराळ्या कालखंडांचे निदर्शक असतात. 

 

संचयनाच्या स्थितीवरून हिमनदी-हिमोढाचे पुढील वेगवेगळे प्रकार पडतात. डोंगराळ प्रदेशातील हिमनदीच्या मुखाशी जे हिमोढ तयार होतात, त्यांना अंत्य हिमोढ म्हणतात. या प्रकारचे संचयन बहुधा अर्धचंद्राकृती असते. हे संचयन शेकडो मीटर रुंद व अनेक किमी. लांब असू शकते. अग्रभागाची स्थिती बदलत असेल, तर अशा हिमोढामुळे विस्तृत प्रदेश व्यापला जाऊन तेथील खोलगट भागात बर्फ वितळून सरोवर तयारहोते. हिमनद्यांच्या काठाशी जे हिमोढ तयार होतात त्यांना पार्श्व हिमोढ म्हणतात. या प्रकारच्या हिमोढांची सलग अशी रांग काठाला समांतर पसरलेली असते. दोन हिमनद्या ज्या भागात एकमेकींना येऊन मिळतात, त्या भागात हिमनद्यांचे पार्श्ववर्ती हिमोढ एकत्र येतात. अशा पार्श्ववर्ती हिमोढाचे संचयन होऊन निर्माण होणाऱ्या ढिगांना मध्य हिमोढ असे म्हणतात. हिमनदीच्या बर्फात गुरफटलेल्या खडकाळ मातीस हिमांतर्गत हिमोढ म्हणतात, तर बर्फाला पडलेल्या मोठमोठ्या भेगातून खाली गेलेल्या खडक व इतर घटकांच्या संचयनास अधोहिम हिमोढ म्हणतात. हिमनद्यांचा विस्तार हळूहळू कमी होत असताना त्या त्यांच्या खोऱ्यांतील तळभागावर खडकाळ माती कमी-अधिक प्रमाणात पसरवीत जातात. पसरविलेल्या या मातीच्या थरांची जाडी सर्वत्र एकसारखी नसल्याने खोऱ्यातील भूमिस्वरूप बदलते. काही ठिकाणी लहान टेकड्या तर काही ठिकाणी खोलगट भाग तयार होऊन मधून मधून लहान-मोठे दगड व गोटेत्यात विखुरलेले असतात. खडकाळ मातीच्या या विशिष्ट प्रकाराने पसरविलेल्या ढिगांना भू हिमोढ असे म्हणतात. याची जाडी क्वचित५ मी. असून ते २० मी.पर्यंत जाड होऊन शकते. 

 

हिमस्तरांमुळे बनलेल्या हिमोढांचे क्षेत्र व सापेक्षस्थिती यांनुसार चार प्रकार पाडले जातात. अंत्य हिमोढ, भू हिमोढ, हिमस्तरांच्या अंतर्पाळीतील हिमोढ व हिमस्तरांच्या आकुंचनावस्थेतील हिमोढ असे ते प्रकार होत. हिमस्तरक्षेत्राच्या बाह्यसीमेवर तयार झालेले हिमोढ हे अंत्य हिमोढ होत. हिमस्तराचे क्षेत्र कमी होत असता बाह्यसीमेचेही आकुंचन होते पण जरही हिमस्तराची बाह्यमर्यादा आकुंचनाच्या अवस्थेतही एकाच ठिकाणीबराच काळ स्थिरावली, तर तेथे तयार होणाऱ्या हिमोढांना आकुंचना-वस्थेतील हिमोढ असे म्हणतात. दोन विभिन्न हिमस्तरांच्या पाळ्यांच्या दरम्यान जे हिमोढ तयार होतात, त्यांना हिमस्तरांच्या अंतर्पाळीतीलहिमोढ असे म्हणतात. हिमस्तरांचे क्षेत्र संकुचित होत असतानाखडकाळ मातीचे ढीग सर्वत्र पसरविले जातात त्यांच्या ढिगांना भूहिमोढ म्हणतात. 

 

हिमोढातील खडकाळ माती म्हणजे लहान-मोठे दगडधोंडे, वाळू, माती यांचे मिश्रण होय. परंतु, हिमोढातल्या दगडांना नदीने वाहून नेलेल्या दगडांसारखा गोलपणा येत नाही. हिमनदीबरोबर वाहत जात असताना ज्या दगडांचे घर्षण होते त्यांनाच फक्त चरे पडतात व झिलई येते. इतर हिमोढ तसेच नेले जातात. हिमनद्यांनी बनलेल्या अंत्य हिमोढातले बहुसंख्य दगडधोंडे खडबडीत, धारदार कडा असलेले असे असतात व तासलेली, झिलईदार व चरे पडलेली पृष्ठे असलेल्या दगड-धोंड्यांची संख्या अल्प असते. हिमनदी नाहीशी होऊन दीर्घ काळ लोटला नसेल तर तिच्या हिमोढांचे ओळखू येण्याजोगे अवशेष शिल्लक राहतात. 

 

हिमस्तरांनी तयार झालेले हिमोढ आकाराने लहान म्हणजे क्वचितच तीस मीटरपेक्षा जास्त उंच असतात. हिमनद्यांनी बनविलेले हिमोढ भरीव व आकाराने मोठे असतात व त्यामुळे भूमिस्वरूपात त्यांनी घडवून आणलेला बदल झटकन नजरेस येतो. डोंगराळ प्रदेशातील खोऱ्यांत आढळणारे पार्श्व हिमोढ खोऱ्यांच्या उंच भिंतींना समांतर होत गेलेले असून खोऱ्यांकडील त्यांचा उतार बराचसा प्रमाणबद्ध व मंद झालेला असतो. त्यांची उंचीही बरीच जास्त असते. अलास्कातील काही पार्श्व हिमोढांची उंची ३०० मी.भरते. काही ठिकाणी ह्या पार्श्व हिमोढांची लांबी उताराकडे वाढत जाऊन ते शेवटी खाली अंत्य हिमोढास जाऊन मिळालेले दिसतात. या त्यांच्या संयोगाने तेथे एक नालाकृती टेकडी तयार होते. मध्य हिमोढ मात्र भू हिमोढांपासून स्पष्टपणे ओळखण्यास कठिण जातात. त्यांची उंची जास्त असली तरच त्यांच्या टेकड्या इतर भू हिमोढांपासून निराळ्या दिसू शकतात. भू हिमोढाने निर्माण झालेल्या उंचसखलपणामुळे अशा भागात डबकी, तळी, दलदलीची जमीन, ⇨ हिमविदरे व टेकड्यांचे विविध प्रकार विस्तृत प्रमाणात आढळतात. आल्प्स, हिमालय, ध्रुवीयकटिबंध असे बर्फाच्छादित प्रदेश किंवा उत्तर अमेरिका, यूरोप अशांसारखे हिमकालीन घडामोडीचे प्रदेश या ठिकाणी हिमोढांचे विविध प्रकार व त्यांचे परिणाम दृष्टीस पडतात. 

 

हिमकालात पृथ्वीवरील आजच्या हिमनद्या अधिक लांब होत्या, असे त्यांच्या दऱ्यांच्या अधिक सखल व आता हिमाच्छादित नसलेल्या भागांतील हिमोढांवरून दिसून येते. उदा., हिमालयातल्या हिमनद्यांचा शेवट सिक्किम-मध्ये सु. ४,००० मी., कुमाऊँमध्ये ३,७०० मी., काश्मिरमध्ये २,५०० मी. एवढ्या उंच भागांत होतो पण यांपेक्षा बऱ्याच (सु. १,७०० मी. इतक्या) सखल प्रदेशांत पूर्वी बनलेल्या हिमोढ-राशी आढळतात. 

 

पहा : झीज व भर हिमनदी व हिमस्तर. 

वाघ, दि. सु. गोडसे, एम्. व्ही.