हिमगव्हर : (सर्क) . सामान्यपणे चूर्णीय (कॅल्शियमयुक्त) प्रदेशात पर्वताच्या उंच भागावर असलेल्या तीव्र उताराचे विवृत्ताकार किंवा सर्व बाजूंनी वेढलेले जवळजवळ वर्तुळाकार असे अगदी आधीचे भूरूप म्हणजेगव्हर होय. हा आराम खुर्चीसारखा अर्धवर्तुळाकार खोलगट भाग असून शीर्षभित्ती (पाठीमागच्या तीव्र उताराचा कडा), शीलातळभाग आणि तलसीमा किंवा उंबरठा (हिमनादेय दरीच्या जमिनीवरील आधारशिलेचा कमी उंच आडवा वरंबा वा कटक) हे त्याचे तीन भाग असतात. हिम-गव्हरांचे आकार व रूपे विविध प्रकारची असतात. या खोलगट भागातबर्फ साठत जातो व तो सावकाशपणे घट्ट होत जाऊन मग गुरुत्वामुळे तो खाली सरकू लागतो. अशा रीतीने येथे हिमनदी उगम पावत असल्याने त्याला हिमगव्हर म्हणतात. स्कॉटलंडमध्ये कॉरी, जर्मनीत कॅरेन, वेल्समध्ये स्विम अशी वेगवेगळ्या देशांत हिमगव्हराला वेगवेगळी नावे आहेत. हिमगव्हराची लांबी सामान्यपणे उंचीच्या तीनपट असते. काही गव्हरांचा संबंध तेथील खडकांच्या संरचनेशी असतो तथापि बहुतेक गव्हर हिम-नद्यांच्या क्षरणातून (झीजेतून) निर्माण झालेले आहेत. हिमगव्हर मुख्यतः अग्निज व रूपांतरित खडकांत तयार होतात.
पूर्वी पाण्यामुळे झीज होऊन खोलगट भाग तयार झालेला असतो.नंतर गोठणक्षरणाद्वारे (बर्फाखालील खडकाच्या वा मृदेच्या मुख्यतः हिम-तुषारक्रियेने होणाऱ्या झिजेद्वारे) गव्हर तयार होतो. त्यांत काठोकाठ बर्फ साचल्याने गोठणे व वितळणे या क्रिया वारंवार होतात. हिमसंचयात( साठलेल्या बर्फात) ताण निर्माण झाल्याने भेगा निर्माण होतात. त्यांना ⇨ हिमविदर म्हणतात. बर्फात हालचाल झाल्याने या भेगा रूंद होतात. गोठणे व वितळणे या क्रियेमुळे तळाचा व शीर्षभित्तीचा खडक उघडापडतो. त्याची झीज होते, तर बर्फामधील आंतरकणीय व कणांतर्गत हालचालींमुळे अपघर्षण (खरवडले जाण्याची क्रिया) होऊन गव्हराचा मागील भाग झिजून मागे जात राहतो. पर्वतरांगेचा पलीकडील भाग याचप्रमाणे झिजून मागे आला म्हणजे पर्वतरांग सुळक्यासारखे आकार धारण करते. अशा सुळक्यांना शृंगे म्हणतात. ओळीने असलेल्या गव्हरांच्या बाबतीत अशा शृंगांची मालिकाच तयार होते. शृंगमालिका हिमालयात सामान्यपणे आढळतात. गव्हरातून बाहेर पडताना हिमनदी उंबरठा ओलांडते तेव्हा गव्हर खोल असल्याने तेथे पाणी साचते. अर्थात हिमनदीच्या उत्तरायुष्यात असे घडते. अशा रीतीने तयार झालेल्या सरोवराला हिमानी सरोवर (टार्न) म्हणतात. उंबरठ्याजवळ गाळ साचतो. अशा रीतीने मूळ अर्धवर्तुळाकार खोलगट भाग व तोही एकाच प्रकारच्या खडकाचा बनलेला असणे आणि बर्फाचा विपुल व सततचा पुरवठा या हिमगर्तनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत.
हिमनदी हिमरेषेच्या वरच निर्माण होत असते. त्यामुळे प्राचीन हिमगव्हरांच्या उंचीची पाहणी केली असता जलवायुमानातील (दीर्घकालीन सरासरी हवामानातील) बदल आणि पूर्वीच्या काळातील हिमरेषेचे स्थान यांविषयी माहिती मिळते.
गायकवाड, सत्यजित
“