हिडाका : हीडाका. जपानच्या होक्काइडो बेटावरील दक्षिणोत्तर पसरलेली सु. १३० किमी. लांबीची पर्वतरांग. ही पर्वतरांग पॅसिफिक महासागरातील एरिमो-मिसाकी भूशिरापर्यंत पसरलेली आहे. हिडाका हा होक्काइडो बेटावरील ईझो पर्वताचाच एक भाग असून इशिकारी आणि टोकाची या येथील दोन मैदानांमधील तो जलोत्सारक आहे. पर्मियन कालखंडातील भूद्रोणींविषयक हालचालींच्या काळात या रांगेची निर्मिती झाली असून तिच्यामध्ये मध्यजीव महाकल्पातील लाव्हाजन्य गाळाचे संचयन आढळते. या पर्वतरांगेत १,५००–२,००० मी. उंचीची अनेक शिखरे आहेत. त्यांपैकी पोरोशिरीडाके हे २,०५२ मी. उंचीचे ज्वालामुखी विरहीत सर्वोच्च शिखर आहे. शिखराजवळ हिमगव्हर (पूर्वीच्या हिम-नदीचे अवशेष) असून पर्वतपायथा उपआर्क्टिक सूचिपर्णी जंगलांनी आच्छादलेला आहे.
कुंभारगावकर, य. रा.
“