हिंगण : (हिंगणबेट हिं. हिंगोल, हिंगोट क. इंगिलुका, इंगळगिडा सं. इंगुदी इं. डेझर्ट डेट लॅ. बॅलॅनाइट्स रॉक्सबर्घाय, बॅ. ईजिप्टिका कुलसिमॅरुबेसी) . हा एक सदाहरित लहान वृक्ष किंवा काटेरी क्षुप आहे. बॅलॅनाइनाट्स प्रजातीतील बॅ. ईजिप्टिका ही जाती मूळची ईजिप्तमधील असून तिचा प्रसार आफ्रिकेतील उष्ण प्रदेशांत, भारत व म्यानमार येथे आहे. सेनेगलमध्ये ती सामान्य आहे. म्यानमार येथे बॅ. ट्रायफ्लोरा ही जाती आढळते. भारतात बॅ. रॉक्सबर्घाय जातीचा प्रसार कमी पावसाच्या प्रदेशांत (आग्नेय पंजाब व दिल्ली ते सिक्कीम, राजस्थान, बिहार, कच्छ, खानदेश, दख्खन इ. ठिकाणी) आहे. तसेच ती इझ्राएल, जॉर्डन, सौदी अरेबिया व येमेन येथे आढळते.
हिंगण वनस्पती १० मी.पर्यंत वाढते. तिचे खोड सरळ व सु. ६० सेंमी. व्यासाचे फांद्या अनियमित पसरलेल्या व लोंबत्या असतात. कोवळे भाग करडे व लोमश त्यावर तीक्ष्ण, मजबूत, आरोही व एकाकी काटे ( शूल) त्यावर क्वचित पाने व फुले असतात. साल पिवळसर, राखाडी किंवा करडी व जाड पाने गडद हिरवी, द्विदली संयुक्त, अल्पवृंत दले दीर्घवृत्ताकृती, अखंड, सूक्ष्म केसाळ व चिवट फुले हिरवट पांढरी, ८–१४ मिमी. व्यासाची, द्विलिंगी व सुवासिक असून ४–१० फुलांच्या वल्लऱ्यांत एप्रिल-मेमध्ये येतात. संदले व प्रदले प्रत्येकी पाच व परिहित केसरदले १० व शंकूसारख्या बिंबाच्या तळाशी चिकटलेली फळ अश्मगर्भी, १.५–३ सेंमी. लांब व १.५–४ सेंमी. व्यासाचे, कठीण, लंबगोल, साधारण टोकदार, करड्या रंगाचे, त्यावर पाच खोलगट रेषाव आठळीत एक बी, मगज ओशट व दुर्गंधी असतो. या वनस्पतीला५–७ वर्षांनी फुले व फळे लागतात. तसेच १५–२० वर्षांनी अधिकाधिक बीजनिर्मिती होते. एका वृक्षापासून सु. १०,००० फळे मिळतात.
हिंगण या वनस्पतीचे सर्व भाग उपयुक्त आहेत. कोवळा पाला, फळे व फांद्या जनावरांसाठी खाद्य आहेत. तिच्या सालीपासून मजबूत धागा मिळतो. बियांमध्ये सु. ४४% पिवळट, सौम्य, स्थिर व रुचिहीन तेल असते ते औषधी आहे. आठळीतील बी काढून त्यात बंदुकीच्या दारूची पूड भरून स्फोटक गोळे बनवितात. फळात ⇨ सॅपोनिने असल्याने मगजाचा उपयोग रेशीम व साधे कापड स्वच्छ करण्यासाठी करतात.तसेच कच्ची व पक्व फळे खाद्य आहेत. लाकूड जळणास, हातात धरावयाच्या काठ्या, उपयुक्त फळ्या इत्यादींकरिता वापरतात.
![]() |
हिंगण वनस्पती भारतात सर्वसाधारणपणे आढळणारी, परंतु दुर्लक्षित वनस्पती आहे. पारंपरिक पद्धतीने तिचा उपयोग वांतिकारक, कृमिनाशक, कवकरोधी, रेचक, तीव्र विरेचक, पोटशूळ, डांग्या खोकला, त्वचा-रोग आदी रोगांत केला जातो. आयुर्वेदानुसार साल कृमिरोधी, खोकला आणि त्वचा रोगात तर पाने कृमिरोधी व मुळे वांतिकारक म्हणूनवापरतात. सालीचा लेप इजा झालेल्या शरीराच्या भागासाठी बाहेरून वापरला जातो. संपूर्ण वनस्पतीचा वापर सर्पदंशात करतात. बिया पोटशूळ व खोकल्याच्या द्रव औषधांत वापरतात. त्वचारोग व भाजणे यांवरगाभा वापरतात. मुळे व फळांत डायोसजेनीन नावाचे रसायन असते. यातील स्टेरॉइडे (सॅपोजेनीन) बाह्य रीत्या घेण्यात येणाऱ्या गर्भनिरोधक औषधांत वापरतात. वेदना व सूज यांवर वनस्पतीची साल वापरतात. या वनस्पतीत प्रजननक्षमताविरोधी गुणकारिता आणि प्रतिशोथकारक कार्यक्षमता असते. हिच्यातील सॅपोनीन स्टेरॉइडांमध्ये जंतुनाशक व मृदुकाय प्राणिनाशक गुण असतात.
जमदाडे, ज. वि.
![]() |
हिंगण |
“