हॉथॉर्न : (इं. मे हॉथॉर्न, थॉर्नॲपल, हॉ, व्हाइट थॉर्न लॅ. क्रॅटीगस ऑक्सिकँथा कुल-रोझेसी ). हा लहान सु. ६ मी. उंच काटेरी व पानझडी वृक्ष आहे. तो मूळचा यूरोप, उत्तर अमेरिका व उत्तर आफ्रिकेतील असून उत्तर गोलार्धातील समशीतोष्ण प्रदेशांत त्याचा प्रसार झालेला आहे. क्रॅटीगस प्रजातीत सु. १,२०० जाती आहेत. भारतामध्ये हिमालयात समशीतोष्ण भागांत, काश्मीर व हिमाचल प्रदेश या ठिकाणी सस.पासून १,८००–३,००० मी. उंचीपर्यंत तो आढळतो. क्रॅटीगस हा लॅटिन शब्द क्रॅटोस म्हणजे लाकडाची कठीणता या अर्थाच्या ग्रीक शब्दापासून तसेच ऑक्सिकँथा हा लॅटिन शब्द ऑक्सस म्हणजे तीक्ष्ण आणि अकँथा म्हणजे काटा या अर्थाच्या ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे.
अमेरिकेच्या पूर्व भागात हॉथॉर्न वनस्पतीच्या अनेक रानटी (जंगली) जाती आढळतात. त्यांमध्ये ग्रीन हॉथॉर्न (क्रॅ. व्हिरिडिस), मे हॉथॉर्न (क्रॅ. ओपेका), ॲलीगेनी हॉथॉर्न (क्रॅ. इंट्रिकाटा), ठिपकेदार हॉथॉन (क्रॅ. पंक्टॅटा) व फ्लेशी हॉथॉर्न (क्रॅ. सक्युलेंटा) यांचा समावेश होतो. अमेरिकन जाती कॉकस्पर हॉथॉर्नमध्ये (क्रॅ. क्रस-गॅली) काटे सरळ व सु. ८ सेंमी. लांब असतात, तर तिच्या काही प्रकारांमध्ये काटे नसतात. वॉशिंग्टन हॉथॉर्न (क्रॅ. फीनोपायरम किंवा क्रॅ. कॉर्डेटा) तिच्या वसंत ऋतूतील रंग व नारिंगी-लाल रंगाच्या फळाच्या झुबक्यांसाठी प्रसिद्धअसून सुशोभीकरणासाठी वापरली जाते. तांबडा किंवा लाल हॉथॉर्न( क्रॅ. मोलिस) याच्या कोवळ्या डहाळ्यांवर पांढुरक्या रंगाचे केस असून पाने तांबडी असतात.
हॉथॉर्न वनस्पतीची पाने साधी, १.५ – ५ सेंमी. लांब, एकाआडएक, लहान देठाची, चकचकीत, ३ – ५ खंडीय व दातेरी असतात. फुले पांढरी किंवा गुलाबी संदले ५ व केसरदले (पुं-केसर) ५–१८ बहुधा ५–१० गुलुच्छ फुलोऱ्यावर वसंत ऋतूत येतात. फळ लहान, ८?१२ मिमी. व्यासाचे, चकचकीत, सफरचंदासारखे लाल, क्वचित निळे वाकाळे असून अश्मगर्भी (आक्रांत) फळात १-२ आठळ्या असतात.याचे काटे बळकट व १–३ सेंमी. लांब असतात. याच्या फुलांनाखवट (कुजक्या माशासारखा) वास येतो. सर्व जातींमध्ये लाकूडकठीण असते. मोठ्या प्रमाणात तिची लागवड बागेत शोभेकरिता तसेच विशेषतः कुंपणाकरिता करतात. कारण ती काटक असून पाने, फुले वफळे यांमुळे आकर्षक दिसते. तसेच तिच्या काट्यांमुळे गुरेढोरे व डुकरांना अटकाव (प्रतिबंध) होतो.
हॉथॉर्न वनस्पतीच्या पाने, फुले व फळे यांमध्ये बायोफ्लेव्होनॉइडे असतात. त्यामध्ये ऑलिगोमेरिक प्रोसायनिडीन, व्हिटेक्सीन, क्वरसिटीन व हायपेरोसाइड या संयुगांचा समावेश होतो. त्यामुळे प्रतिऑक्सिडीकारकव प्रतिदाहरोधक म्हणून तिचा उपयोग अनेक रोगांत होतो. तसेचतिच्यात क जीवनसत्त्व, सॅपोनिने, टॅनिने, कार्डिओटॉनिक अमाइने, प्यूरिने इ. रसायने असतात. पारंपरिक उपयोगांमध्ये मुळांचा काढा जठरव्रणावरव फळे मधुमेहावर उपयुक्त आहेत. होमिओपॅथीमध्ये क्रॅ. ऑक्सिकँथा ही वनस्पती हृद्रोगासंबंधी विकार (उदा., दीर्घकालिक विस्फारण, हृद् निष्फलता, हृद्शूल, हृदय वसापकर्ष, हृद्स्नायुशोथ, हृदंतस्तरशोथ इत्यादींवर) तसेच गलशोथ व अतिरिक्त रक्तदाब यांवर उपयुक्त आहे.
हॉथॉर्न वनस्पतीला पर्ण ठिपके, करपा व तांबेरा हे रोग होतात. त्यामुळे तिची पानगळ होऊन ऱ्हास होतो.
जमदाडे, ज. वि. मगर, सुरेखा अ.
हॉथॉर्न |
“