हास्य : (लाफ्टर ). जोराने श्वास घेऊन आत घेतलेली हवा छातीच्या स्नायूंच्या व पोटाच्या पडद्याच्या झटकाबंद (स्पॅझमॉडिक) आकुंचन-प्रसरणांच्या योगाने तोंडावाटे ‘हॉ हॉ’ असा आवाज करत स्फोटाप्रमाणेबाहेर फेकल्याने हास्याची प्रतिक्रिया सिद्ध होते. हास्याचा आकारबंधप्रत्येक प्रत्येक व्यक्तीत विशिष्ट असतो, ज्यामुळे पडद्याआडून पण हसणेऐकून हसणारा माणूस ओळखता येतो.
हसण्याची शारीरिक प्रतिक्रिया सर्व माणसांत सारखी असली, तरी या प्रतिक्रियेला जन्म देणाऱ्या मानसिक कारणांत मात्र विविधता आहे. त्यांत केवळ शारीरिक गुदगुल्यांमुळे फुटलेल्या बालकाच्या निरागस, आनंददर्शक हास्यापासून ते लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या चाणक्यनीतिज्ञ राजकारणपटूच्या छद्मी हास्यापर्यंत अनेक प्रकार आहेत. बालकांमध्ये हास्य केवळ आनंदाचे निदर्शक असते. परंतु प्रौढांमध्ये मात्र हास्यामागची मानसिक भूमिका विविध प्रकारची असू शकते. ही विविधता हास्याचे वर्णन करणाऱ्या विविध शब्दयोजनांनी स्पष्ट होते. उदा., निरागस हास्य, तिरस्कारयुक्त हास्य, तुच्छतादर्शक हास्य, उपहासात्मक हास्य, निंदाव्यंजक हास्य, छद्मी हास्य वगैरे. अशा ह्या वैविध्यपूर्ण हसण्याचे विश्लेषण व मीमांसा करण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी आपआपल्या दृष्टिकोनांतून केला आहे. पण ‘सहा आंधळे व हत्ती’ या गोष्टीप्रमाणे प्रत्येकाच्या मीमांसेत आंशिक तथ्य आहे तथापि ती हास्याचे पूर्ण स्वरूप विशद करू शकत नाही. हास्याच्या विविधतेच्या शास्त्रीय व तात्त्विक विश्लेषणापेक्षा सहानु-भूतिशील कलाकारच त्याचे अधिक मार्मिकतेने आकलन करू शकेल. बुद्धी व विचाराप्रमाणेच हास्यामध्ये भावनेचा पण अंश आहे, इतकेच नव्हे तर सुखात्मिकेतून भावनेचे उच्चाटन केले, तर मागे हास्यनिर्मिती करण्याजोगे काय शिल्लक राहील, याची शंकाच आहे.
हास्यविनोद हा खेळकरपणाचा व गंभीरतेचा सुरेख संगम आहे. विनोदामुळे गंभीर संदेशाला खेळकर स्वरूप देता येते. त्यात करुणेचे पण अध्यांश असतात. त्याचप्रमाणे बुद्धी, चातुर्य व सम्यक् आकलनवृत्ती यांचा पण मोठा वाटा आहे. विट् (wit) हा विनोदाचा प्रकार शब्दांच्या चातुर्यपूर्ण उपयोगावर अवलंबून असतो. त्यात उत्तम प्रकारचा विनोद वहीन अभिरुची ही दोन्ही टोके आहेत. इंग्रजीत ‘To humour’ याचा अर्थ टवाळी करणे असा होतो. विनोदी चुटका (जोक) त्यातील मर्माच्या आकलनाशिवाय हास्यजनक होऊ शकत नाही. यामुळेच एखादा चुटका एका व्यक्तीचा हास्यस्फोट करेल, तर दुसरी व्यक्ती त्याला थंडपणाची प्रतिक्रिया देईल.
जॉर्ज मेरेडिथच्या म्हणण्याप्रमाणे विचारयुक्त हास्य निर्माण करणे, हीच सुखात्मिकेची खरी कसोटी आहे, तर जर्मन तत्त्वज्ञ ⇨ आर्थर शोपेनहौअर हास्यजनक प्रसंगाच्या आंतरिक विसंगतीवर बोट ठेवून त्यालाच हास्याचे हार्द मानतो. दोन परस्परसंबंध नसणाऱ्या विचारसंदर्भांचा एकाच द्य्वर्थी शब्दाने उल्लेख करणे हे हास्य निर्माण करणारे असते. जॅक हॉब्जच्या मताप्रमाणे हास्य हा जेत्याचा आत्मप्रौढीयुक्त पुकार आहे. अशी आत्म-प्रौढी पूर्व प्राथमिक (प्रिमिटिव्ह) अथवा जंगली टोळ्यांनी राहणाऱ्या मानवाच्या हास्यात कदाचित व्यक्त होत असेल पण आजच्या सुधारलेल्या, सुसंस्कृत माणसात ती तितक्या प्रमाणात असेल का, याची शंकाच आहे. एवढे मात्र खरे, की हसणाऱ्याच्या मनात तो ज्याला हसतो त्याच्यापेक्षा थोडीतरी श्रेष्ठत्वाची भावना असते. ⇨ इमॅन्युएल कांट याच्या सिद्धांता-प्रमाणे हास्य हे अपेक्षाभंगातून निर्माण होते. घटना घडत असताना किंवा तिचे वर्णन ऐकत असताना आपल्या मनात प्रत्येक क्षणी पुढे काय घडेल, याची थोडी अपेक्षा निर्माण होते व प्रत्यक्षात त्याऐवजी दुसरेच काही घडले तर हसू फुटते. पण या अपेक्षाभंगात दोन लक्षणे आवश्यक आहेत. एक म्हणजे ही अपेक्षा इतकी तीव्र नसावी, की जिचा भंग झाल्यासनैराश्य व दुःखच होण्याचा संभव अधिक आणि दुसरे म्हणजे या अपेक्षेत हसणाऱ्याचे व्यक्तित्व गुंतलेले नसते. तो थोडा पक्षातीत असावा. तसे नसेल तर अपेक्षाभंग नैराश्य व दुःखजनक होण्याचा संभव असतो.ब्रिटिश तत्त्वज्ञ ⇨ हर्बर्ट स्पेन्सर हास्याच्या शारीरिक कारणांचे विश्लेषण करतो. व्यक्तीला हास्योत्पादक इंगिताचे बोधन होते, तेव्हा मेंदूमधील मज्जाकीय ऊर्जा ओसंडून जाऊन नेहमीच्या सवय असलेल्या स्नायुमार्गा-बाहेर पडून हास्याच्या स्नायूमार्गे वाहते व त्यामुळे माणूस हसतो. आजच्या शरीरमनोविज्ञानाच्या परिभाषेत हे वर्णन कोठेच बसत नाही. विख्यात ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ ⇨ सिग्मंड फ्रॉइड हास्योत्पादक विट्चे वर्णन करून त्यातल्या ⇨ अबोध मनाच्या यंत्रणेचे विश्लेषण करतो. विट् हास्याला जन्म देऊन शारीरिक व मानसिक श्रमाची बचत करते. ज्यात शब्दांवरचा बौद्धिक खेळ आहे, असे चुटके विनोदी व हास्यजनक असतात. हास्यामुळे प्रतिबंधकाच्या सेन्सॉर निरोधनशक्तीची बचत होते. विट्मधील बौद्धिक खेळ ऐकणाऱ्याच्या विनोदबुद्धीला व भाषाचातुर्याला आवाहन देतो. विट्च्या मानसिक यंत्रणेमध्ये अबोध मनाची अनेक कार्यतत्त्वे कार्यान्वित होतात, जी स्वप्नामध्येही कार्यान्वित असतात. विट् निरोधनशक्तीची बचत करते हास्य (कॉमिक्) हे प्रातिनिधिक विचारशक्तीची (रिप्रिझेन्टेटिव्ह थॉट) बचत करते, तर वेदना सहन करण्यात खर्चल्या जाणाऱ्या शक्तीची बचत करणे हे विनोदाचे कार्य असते. ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ ⇨ विल्यम मॅक्डूगल हास्याला सहानुभूतिपूर्ण दुःखाचे प्रतिऔषध मानतो. सहानुभूती वाढणे, अनुभवणे ही माणसाची मूल प्राकृतिक मनोवृत्ती आहे. दुसऱ्याचे दुःख पाहून आपण त्यात सहानुभूतीने सहभागी होतो. परंतु ‘दुःख पर्वताएवढे’ असल्यामुळे आपणाशी संबंध येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक दुःखात सहानुभूतीने सहभागी होऊ लागलो, तर आपण दुःखातच बुडून जाऊ. तेव्हा दुसऱ्याच्या व काही काही वेळेला स्वतःच्याही लहानसहान दुःखांपासून अलिप्त राहण्यासाठी हास्य हा तोडगा आहे, ज्याच्यामुळे मानवाची दुःखाची मात्रा अंशतः कमी होईल. अति झाले अन् हसू आले असे म्हणतात ते यामुळेच. मॅक्डूगलच्या ह्या विश्लेषणात थोडे तथ्य आहे परंतु त्याने त्याचे अवडंबर फार केले आहे. कित्येक वेळेला दुःखजनक नाहीत अशा प्रसंगांत पण हास्यनिर्मिती होते. एवढे खरे की, आपल्या सवंगड्यांच्या उणिवांमुळे येणाऱ्या उदासीनतेपासून बचाव करण्यासाठी ढाल म्हणून कित्येक वेळा प्रयत्नपूर्वक हास्याचा अवलंब केला जातो. फ्रेंच तत्त्ववेत्ता ⇨ आंरी बेर्गसाँ हास्याला सामाजिक नियंत्रणाचे एक साधन मानतो. त्याच्या सिद्धांताप्रमाणे जिवंत माणूस यंत्रासारखा वागू लागला, तर ते हास्योत्पादक असते. केळाच्या सालीवरून पाय घसरून मनुष्य पडला, तर पाहणाऱ्यामध्ये हास्यस्फोट होतो कारण मनुष्य यांत्रिक नियमाच्या आहारी जातो. परंतु आपण सर्वच प्रकारच्या यांत्रिक वर्तनाला हसत नाही. केळाच्या सालीवरून पाय घसरून पडणारा मनुष्य जर वयोवृद्ध असला किंवा पडणाऱ्यालागंभीर इजा पोहोचली असेल, तर आपल्याला त्याची दया येते व आपण त्याच्या मदतीला धावतो. हास्यास्पद वर्तन करू नये हे सर्वजण जाणतात. लहान मुलाला अयोग्य वर्तन करण्यापासून परावृत्त करण्यासाठी वडीलमाणसे त्याला ‘लोक हसतीलङ्ख म्हणून धाक घालतात. पुढे मुलाच्या व्यक्तित्वाच्या विकासाबरोबर अन्य नीतितत्त्वांप्रमाणेच हास्यास्पद वर्तन करू नये, हे तत्त्वही थोड्याफार प्रमाणात आत्मसात केले जाते. काही हास्यजनक प्रसंगांत यांत्रिकतेचा अंश असतो, यात शंका नाही. पण हास्याचे खरे स्वरूप कधीकाळी दिसणाऱ्या यांत्रिकतेपेक्षा त्याच्यासंबंधी स्वच्छंदी कल्पनेच्या विहंगभरारीतच आहे. उपहास (रिडिक्यूल) व उपरोध (सटायर) हा चुकणाऱ्या व्यक्तीला लहानसहान दोषांपासून सुधारण्याचा चाबूक आहे. या दोन्हींमध्ये हसणाऱ्याची थोडी आत्मश्रेष्ठत्वाची भावना असते परंतु ती आत्मप्रौढीची नसते, तर ती समाजाच्या श्रेष्ठतेची प्रतिनिधी असते.
काहीही असले तरी एवढे खरे, की जो विशुद्ध हास्य निर्माण करतो तो त्याच्या आसपासच्या लोकांचे जीवन प्रकाशमय करतो, हलके करतो, सुसह्य करतो. हास्य हे शरीर व मन दोन्हींचे टॉनिक आहे, उपकारक आहे, आरोग्यकारक आहे. ‘लाफ अँड बी फॅटङ्ख या उक्तीपेक्षा ‘लाफ अँड बी हेल्दीङ्ख ही उक्तीच अधिक समर्पक आहे. हास्याची खरी उपयुक्तता त्याच्या सामाजिकतेत आहे.
हास्याच्या विरुद्ध गंभीरपणा आहे. त्याच्यामुळे मानसिक तणाव उत्पन्न होतो. हास्य तणावविमोचनाचे कार्य करते. मुक्त हास्याचा व्यक्तीवर विरेचनात्मक प्रभाव पडतो. हास्य व दया परस्परप्रभावी आहेत. हास्याची जंगली निर्दयता केव्हा केव्हा दयेच्या सहानुभूतीने सौम्य व सुसह्य बनते,तर केव्हा केव्हा मूर्खपणामुळे उत्पन्न होणाऱ्या उदासीनतेपासून हास्य आपले संरक्षण करते.
आजकालच्या खडतर जीवनास सुसह्य करण्यासाठी व्यक्तीला तसेच समाजालाही हास्याची जरूरी आहे. जीवनातील दुःखद प्रसंग, तणाव, ओढाताण वगैरे वाढत चालल्यामुळे त्याला तोडगा म्हणून हास्य-विनोदाचीही जरूरी वाढली आहे.
रोजचे ताणतणाव कमी करता यावेत, यासाठी हल्ली काही शहरांमध्येरोज सकाळी खेळाची मैदाने आणि बागा येथे ‘हास्य क्लबां ङ्खत काहीप्रौढ व्यक्ती एकत्र येऊन जोरजोरात हसत असतात. खोटे खोटे हसताना त्यातूनच खऱ्या हास्याची निर्मिती होते. जोरजोरात हसण्याने शरीराला व मनाला व्यायाम होतो. सकाळी सकाळी खूप मोठा ‘ऑक्सिजन’ आत घेतला जातो. रक्ताभिसरणाचा वेग वाढतो. स्नायू मोकळे होतात. आनंद आणि हास्य यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. हसण्याने चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. निखळ हसण्याने चेहरा प्रसन्न दिसू लागतो. ताण-व्यवस्थापनामध्ये ‘हास्योपचार’ ही एक उपचारपद्धती म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. हसरी माणसे स्वतः प्रसन्न असतात तसेच इतरांनाही प्रसन्न ठेवतात. विधायक विचारसरणीची माणसे चेहऱ्यावर हास्य ठेवतात.
भोपटकर, चिं. त्र्यं.
“