हार्टली, डेव्हिड : (८ ऑगस्ट १७०५–२८ ऑगस्ट १७५७). इंग्रज तत्त्वज्ञ. जन्म आर्मले, यॉर्कशर (इंग्लंड) येथे झाला. चर्च ऑफ इंग्लंडच्या धर्मोपदेशकासाठी आवश्यक ते शिक्षण त्याला देण्यात आले होते, पण त्या चर्चच्या ३९ कलमांना पूर्णपणे मान्यता देण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे त्याने धर्मोपदेशकाची दीक्षा घेतली नाही. केंब्रिज येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर त्याने नेवार्क, नॉटिंगहॅमशर, इंग्लंड आणि बाथ येथे वैद्यकीय व्यवसाय केला. शरीरक्रिया मानसशास्त्राचा (फिजिऑलॉजिकल सायकॉलॉजी) पुरस्कर्ता म्हणून तो ओळखला जातो. ⇨ डेव्हिड ह्यूमनंतर ⇨ अनुभववादाचा मुख्य प्रवाह ज्यांच्या विचारांतून वाहत राहिला आणि अनुभववादी परंपरा दृढ व विकसित होत गेली, त्या अनुभववाद्यांमध्ये त्याचा समावेश केला जातो. ऑब्झर्व्हेशन्स ऑन मॅन, हिज फ्रेम, हिज ड्यूटी अँड हिज एक्सपेक्टेशन्स (दोन खंड, १७४९)ह्या ग्रंथामुळे तो विशेष प्रसिद्धीस आला. ⇨ साहचर्यवादाचा पुरस्कर्ता म्हणून तो ओळखला जातो. साहचर्यवादाच्या सर्व मानसिक प्रक्रियांचे विवेचन करण्याचा पहिला आणि अत्यंत पद्धतशीर असा प्रयत्न त्याने उपर्युक्त ग्रंथाद्वारे केला. ‘साहचर्य सिद्धान्त’ आणि ‘स्पंदन सिद्धान्त’ असे महत्त्वाचे दोन सिद्धान्त त्यात त्याने प्रतिपादिले आहेत. त्याच्या मते, जन्मतः आपले मन हे कोरेकरकरीत असते. त्यावर कुठलाही संस्कार उमटलेला नसतो. अनुभवाने आपल्याला जसजशी वेदने होऊ लागतात, तसतसे त्यांचे संस्कार आपल्या कोऱ्या मनावर उमटत असतात आणि ह्यातूनच आपली ⇨ बोधावस्था विकसित होत असते. आपल्या विकसित बोधावस्थेचा उगम मूलतः साध्या वेदनांतूनच झालेला असतो. वृद्धी नियम म्हणजेच एकानंतर एक असा प्रतीत होणारा सान्निध्य नियम होय. स्मरण, मनोविकार, विचारप्रक्रिया, ऐच्छिक व अनैच्छिक क्रिया इ. गुंतागुंतीच्या मानसिक प्रक्रियांचे विश्लेषण केले असता, त्या प्रक्रिया व्यक्तीच्या अनुभवातील मूलभूत अशा साध्या वेदनसंस्कारांतून व त्या संस्कारांच्या अनुक्रमांतूनच निर्माण झाल्या आहेत, असे दिसून येते आणि म्हणूनच आपल्या सर्व मानसिक प्रक्रियांचे स्पष्टीकरण केवळ साहचर्य नियमांच्या आधारे करतायेणे शक्य होते. आपल्या शरीरक्रिया मानसशास्त्राचा विकास न्यूटनच्या प्रिन्सिपिया ह्या ग्रंथाच्या आधारे केल्याचे त्याने नमूद केले आहे. शरीरक्रिया मानसशास्त्रातील ‘स्पंदन सिद्धान्ता ङ्खबद्दल तो म्हणतो, कीएखादे वेदन होत असताना नसांच्या अतिसूक्ष्म कणांचे प्रथम स्पंदन होते. नंतर ते स्पंदन नसांद्वारे प्रवाही होऊन मेंदूपर्यंत पोचविले जाते आणि त्या स्पंदनामुळे मेंदूत तत्सदृश अशी वेदने ग्रहण केली जातात. प्रस्तुत स्पंदनांचे तो ध्वनिस्पंदनांशी साम्य दर्शवितो. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभापूर्वी मात्र त्याच्या सिद्धान्ताचा फारसा प्रभाव पडला नाही.
बाथ, समरसेट (इंग्लंड) येथे त्याचे निधन झाले.
सुर्वे, भा. ग.
“