हारून अल्-रशीद : (२० मार्च ७६३–२४ मार्च ८०९). अब्बासी खिलाफतीतील एक कर्तबगार सेनापती व अब्बासी वंशातील पाचवा खलिफा. याचे संपूर्ण नाव हारून अल्-रशीद इब्न मुहम्मद अल्-महदी इब्न अल्-मन्सूर अल्-अब्बासी असे होते. तो रायी येथेअल्-महदी व अल्-खयझुरान या दांपत्यापोटी जन्मला. याह्या या शिक्षकाने त्यास इस्लामी परंपरेनुसार शिक्षण दिले. वडीलमुलगा मूसा अल्-हेदी याला बाजूस सारून त्याला गादी देण्याचे त्याच्या पित्यानेच ठरविले होते पण हारूनने मात्र वडीलभावाचा अधिकार मानल्याने पित्यामागून मूसाच चौथा खलिफा (७८५-८६) झाला. त्यानंतर हारून ७८६ मध्ये खलिफा झाला. ग्रीक, बायझंटिन व खजर राज्यकर्त्यांचा पराभव करून त्याने आपल्या सैन्याची व शहरांची उत्तम व्यवस्था ठेवली. पहिला नायसेफोरस या पूर्व रोमन साम्राज्याच्या बादशहाचा पराभव करून (८०६) त्याच्यावर त्याने आपल्या असंख्य अटी लादल्या. हारून आणि त्याचा मुलगा अल्-मामून (७८६-८३३) यांच्या कारकिर्दीत अब्बासी खिलाफतीचा अंमल आशिया-आफ्रिकेतील मोठ्या मुलखावर होता. बगदाद ही त्यांची राजधानी विद्या, कला आणि इस्लामी संस्कृतीचे, विशेषतः अरेबिकचे, प्रमुख केंद्र होती. हारूनच्या विस्तीर्ण साम्राज्यामध्ये त्या वेळी मोठमोठ्या मशिदी, भव्य प्रासाद, किल्ले व सुबक कारंजी बांधली गेली. या संपन्न राजधानीत सरदार मंडळी व हारूनच्या राण्या भरमसाठ खर्च करू लागली. अब्बासी घराण्या-तील राणी झुबयादच्या वापरात रत्नजडित सोन्या-चांदीची भांडी असत. राजप्रासादात राण्यांशिवाय रखेल्या, दासी, तृतीयपंथी, गायिका होते. तो संगीताचा मर्मज्ञ असूनही संगीत ऐकण्याऐवजी कुत्री व कोंबड्यांच्याझुंजी पाहत असे. वेषांतर करून तो रात्री फिरत असे, अशी वदंता आहे. या भ्रमंतीत त्याच्यासोबत बहुधा मसरूर (फाशी देणारा), बार्मकिड्झ( बार्मसाइड्झ) घराण्यातील जाफर व कवी अबू नुवास हे मित्र असत.
हारूनने बार्मकिड्झ घराण्यातून आपले कर्तृत्ववान वझीर निवडले. त्यांपैकी एक याह्याबिन खलीद होता. हारूनने बगदादमध्ये रुग्णालये बांधली. कागदाचे कारखाने काढले. अरेबियन नाइट्समध्ये (अरबी विनोदी कथांचा संग्रह) त्याचे व्यक्तिमत्त्व चमकताना आढळते. अली वंशीयांनी अनेकदा बंडे केली पण हारूनने नेमलेला वझीर याह्याबिन खलीद याने त्यांचा मोड करून राज्य भरभराटीस आणले. त्यानंतर हारूनचा आपल्या वझीरावरील विश्वास उडाला आणि फदर बिन्न रबिआ याची नेमणूक त्याने वझीरपदी केली. याह्या व त्याची मुले यांना देहान्तशासन केले (८०४). अखेरच्या दिवसांत बार्मकिड्झ घराण्याबद्दल त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला आणि राज्यात बंडाळी माजली. उत्तर आफ्रिका व ट्रान्सऑक्सिएना हे प्रांत त्याला गमवावे लागले तथापि उर्वरित प्रदेशांत सुव्यवस्था होती. शार्लमेन व हारून यांचे मित्रत्वाचे संबंध होते. ते परस्परांना देणग्याही धाडीत असत. हारूनइतका उदार आश्रय न्यायकोविद, वैयाकरण, काजी व लेखक यांना दुसऱ्या कोणत्याही खलिफाकडून लाभलेला नव्हता. त्याची विलक्षण व उच्च अभिरुची प्रसिद्ध असून त्याच्या पदरी असलेल्या कलावंतांनी आणि इतिहासकारांनी त्याची त्याबद्दल स्तुतीही केलेली आहे. तो कर्मठ होता. त्यामुळे अनेकदा नमाज पढत असे. त्याने बऱ्याचदा मक्केची यात्राही केली होती.
तूस या ठिकाणी स्वारीवर असताना मेंदूतील रक्तस्रावाने त्याचे निधन झाले.
करंदीकर, म. अ.
“