हाफकिन, वॉल्डेमार मॉर्डीकाय वुल्फ : (१५ मार्च १८६०–२० ऑक्टोबर १९३०). प्रसिद्ध रशियन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञआणि प्लेग व कॉलरा या रोगप्रतिबंधक लशींचे संशोधक. हाफकिनयांचा जन्म ओडेसा (रशिया) येथे झाला. रशियात ते व्ह्लड्यीम्यिर खावकीन या नावाने ओळखले जात असत. १८७९ मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ओडेसामधील मालोरोसियास्की विद्यापीठातील निसर्ग-विज्ञाने या विभागात प्रवेश घेतला आणि भौतिकी, गणित व प्राणिशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. विद्यापीठात शिकत असताना हाफकिन यांच्यावर वैद्यकाचे नोबेल पारितोषिक विजेते ⇨ इल्या इल्यीच म्येच्न्यिकॉव्ह यांचा प्रभाव पडला. ज्यू धर्मियांच्या चाललेल्या चळवळीत हाफकिन यांनी सक्रिय सहभाग घेतल्याने रशियाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. मात्र, म्येच्न्यिकॉव्ह यांच्या मध्यस्थीमुळे त्यांची सुटका झाली.
हाफकिन यांनी निसर्गविज्ञाने या विषयात १८८३ मध्ये पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्राणिसंग्रहालयात काम क र ण्या स सुरुवात केली. धार्मिक कारणांवरून त्यांनी १८८८ मध्ये स्वित्झर्लंड येथे प्रयाण केलेव जिनीव्हा वैद्यकीय शाळेत वर्षभर स हा य क म्हणून काम केले. ते १८८९ मध्ये पॅरिस (फ्रान्स) येथे गेले आणि तेथे जगप्रसिद्ध पाश्चर प्रयोगशाळेत काम करू लागले. त्यांचे प्रारंभीचे ⇨ पटकी रोगप्रतिबंधक लशीचे काम यशस्वी झाले. गरम हवेच्या झोतात त्यांनी कॉलरा सूक्ष्मजंतूचे (बॅक्टिरियाचे) क्षीणक स्वरूप निर्माण केले. प्राण्यांवर अनेकदा प्रयोग करून त्यांनी लशीची गुणकारिता निश्चित केली होती. जुलै १८९२ मध्ये त्यांनी स्वतःवर त्या लशीचा प्रयोग केला. भारतात मार्च १८९३ मध्ये कॉलऱ्याची साथ सुरू असलेल्या कोलकाता येथे आले आणि त्यांनी आपल्या नवीन कॉलरा लशीची ओळख करून दिली. सुरुवातीला स्थानिक वैद्यकीय वर्गाकडून त्यास विरोध झाला, परंतु त्यानंतर त्यांची लस सर्वदूर स्वीकारली गेली. ऑक्टोबर १८९६ मध्ये प्लेगची साथ पसरली असताना हाफकीन मुंबईला आले. त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजची प्रयोगशाळा अद्ययावत करून तेथे प्लेग प्रतिबंधासाठी व निवारणासाठी काम सुरू केले. प्लेग विरोधातील पहिली लस चाचणी जानेवारी १८९७ मध्ये भायखळा जेलमधील स्वयंसेवकांवर करण्यात आली. त्यांच्या या कामाचे कौतुक झाले. आगा खान यांनी हाफकीन यांना नवीन ‘प्लेग संशोधन केंद्र’ (प्लेग रिसर्च लॅबोरेटरी) स्थापन करण्यासाठी इमारत दिली आणि मुंबईच्या इतर प्रतिष्ठितांनी त्यांच्या संशोधनाला सहकार्य दिले. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचा त्यांना फारसा पाठिंबा नव्हता. १९०२ मध्ये धनुर्वाताच्या १९ घटना घडल्या. त्यामुळे चौकशी आयोग नेमण्यात आला, ज्यात आयोगाने हाफकिन यांना दोषी ठरवून संचालक पद सोडण्यास सांगितले. मात्र, इंग्लंडमधील लिस्टर इन्स्टिट्यूट येथील आयोगाने या निर्णयाला रद्दबातल ठरविले व अंतःक्षेपणे देणाऱ्या डॉक्टरांना दोषी धरले. मुंबई येथीलत्यांच्या पदावर इतर व्यक्तीची नियुक्ती झाल्याने हाफकीन कोलकात्याला रवाना झाले व निवृत्तीपर्यंत तेथेच राहिले (१९१४). यानंतर हाफकिन फ्रान्सला गेले व बुलॉञ-स्यूर-सेन येथे स्थायिक झाले. १९०६ मध्ये प्लेग रिसर्च लॅबोरेटरीचे नाव बदलून ‘बाँबे बॅक्टेरिऑलॉजिकल लॅबोरेटरी’ असे ठेवण्यात आले. त्यानंतर १९२५ मध्ये हाफकिन यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ’ हाफकीन इन्स्टिट्यूट’ असे नामकरण करण्यात आले.
हाफकिन यांनी १९२७ मध्ये ओडेसाला पुनर्भेट दिली. मात्र, रशियन राज्यक्रांतीनंतर झालेल्या प्रचंड प्रमाणातील बदलांना ते स्वीकारू शकले नाहीत. ते १९२८ मध्ये लोझॅन (रोमान्डी, स्वित्झर्लंड) येथे राहण्यासगेले. तेथेच त्यांचे निधन झाले.
पहा : हाफकिन इन्स्टिट्यूट
वाघ, नितिन भरत
“