हान नदी : (हान शुई ). चीनच्या पूर्व भागातील शेन्सी, होनान व हूपे (हूबे) प्रांतातून सर्वसाधारणपणे उत्तर-दक्षिण दिशेने वाहणारी यांगत्सी नदीची एक प्रमुख उपनदी. हिची लांबी सु. १,५३२ किमी. व जलवाहनक्षेत्र सु. १,७५,००० चौ. किमी. आहे. ही नदी शेन्सी प्रांताच्या नैर्ऋत्य भागातील शोनच्याओ पर्वतात उगम पावते. चिनलिंग व तॅपा पर्वतांमधून पूर्वेकडे वाहत जाऊन, हूपे प्रांतातील ग्वांगह्वा येथे यांगत्सी नदीच्या मध्य खोऱ्यात येते. शिअँग फॅनच्या नजीक ही दक्षिणेकडेनागमोडी वळण घेऊन पूर्वेकडे वाहत जाऊन वूहान नगरसमूहामध्ये यांगत्सी नदीस मिळते. ही नदी उगमाकडील भागात यू-ताई-हो व यांग-शुई या नावांनी, मेन हचिन येथे मेन शुई व नानचुंगपासून हान शुई या नावाने ओळखली जाते.
उगमाकडील भागात ही पर्वतमय प्रदेशातून खोल दरीतून वाहते मात्र ग्वांगह्वापासून ती यांगत्सी-हान शुई या सखल मैदानी प्रदेशातून वाहते. या भागात ती आपला प्रवाहमार्ग वारंवार बदलते व नदीच्या पाण्यात काही प्रमाणात वाढ झाली, तरी किनारी प्रदेशात पूरस्थिती निर्माण होते. शूनशेन जवळ टॅन ही उपनदी हान नदीस मिळते, येथे हान नदीवर पूरनियंत्रण, जलसिंचन व जडवाहतुकीत वाढ या दृष्टीने १९७० मध्ये धरण बांधण्यात आले आहे. येथे सहा जनित्रांतून विद्युत्निर्मिती करण्यात येते. शिअँग फॅनच्या नजीक पै शुई ही उपनदी हान नदीस मिळते, त्याठिकाणी १९५० मध्ये नदीपात्रात जास्त साठवण क्षमतेचा खोलगट भाग तयार केलाआहे. पूरनियंत्रण, पुराच्या पाण्याची साठवणुकीची व हान नदीप्रवाहसुरळीत ठेवणे हे त्यामागील मुख्य उद्देश आहेत. या भागात चार जलसिंचन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. नदीमुखाकडील भागात नदीप्रवाहातील पाणी उत्तर चीन मैदानी प्रदेशाच्या दक्षिण भागात अनेक खाड्या व सरोवरे यांमध्ये पसरते. यांगत्सी-हान नदीसंगमाच्या दक्षिणेस पुरापासून संरक्षणासाठी, १९५४ मध्ये नदीपात्रात दुसरा खोलगट भाग तयार केला आहे.
टॅन, पै शुई, सन हो या हिच्या प्रमुख उपनद्या आहेत. हान नदीप्रवाह या विभागातील प्रमुख जलमार्ग आहे. शासी व वूहानपर्यंत गलबते जाऊ शकतात. हान नदीकिनाऱ्याचा प्रदेश सखल, सुपीक मैदानी असल्याने व येथे जलसिंचन सुविधा उपलब्ध असल्याने यास शेतीच्या दृष्टीने महत्त्व आहे. वूहान, शिअँग फॅन, शूनशेन, मेन हचिन, ग्वांगह्वा, नानचुंग ही हान नदीच्या किनाऱ्यावरील प्रमुख शहरे आहेत.
गाडे, ना. स.
“