हाउसमन, ॲल्फ्रेड एडवर्ड :(२६ मार्च १८५९–३० एप्रिल १९३६). इंग्रज कवी आणि विद्वान. जन्म इंग्लंडमधील फॉक्बरी, वूर्सेस्टरशर येथे. त्याचे वडील ‘सॉलिसिटर’ होते. त्याच्या बाराव्या वर्षी त्याची आई मरण पावली. आईबद्दल त्याला अपार ओढ असल्यामुळे ह्या दुःखद घटनेचा त्याच्या मनावर मोठा आघात झाला. पुढे ऑक्सफर्डमध्ये शिकत असताना आपल्यात समलिंगी कामुकतेची प्रवृत्ती आहे, ह्याची जाणीव झाल्यावर तो अत्यंत अस्वस्थ झाला. ह्या समलिंगी कामुकतेतूनच त्याच्या एका तरुण सहाध्यायावर त्याचे उत्कट प्रेम जडले तथापि त्याने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आलेल्या वैफल्यग्रस्त मनःस्थितीमुळे तो बुद्धिमान असूनही अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नाही.
१८८२–९२ ही दहा वर्षे तो लंडनच्या ‘पेटंट ऑफिस’ मध्ये कारकून म्हणून काम करीत होता. ह्या काळात संध्याकाळी तो रोज ब्रिटिश म्यूझिअमच्या वाचन कक्षात जाऊन लॅटिन संहितांचा अभ्यास करीतअसे. हे करीत असताना त्याने पाठचिकित्सेवर प्रभुत्व मिळविले. तसेचह्या अभ्यासातून त्याने लिहिलेले लेख अनेक ज्ञानपत्रिकांतून (जर्नल्स) प्रसिद्ध होऊ लागल्यावर विद्वानांचे त्याच्याकडे लक्ष गेले. परिणामतः’ युनिव्हर्सिटी कॉलेज’, लंडन येथे त्याची लॅटिनचा प्राध्यापक म्हणूननियुक्ती झाली. ह्यानंतरचे आपले सारे आयुष्य त्याने अभिजात साहित्याला वाहून टाकले. श्रेष्ठ लॅटिन कवी ⇨ सेक्स्टस प्रॉपर्शस ह्याचा त्यानेअभ्यास केला. तसेच ⇨ जूव्हेनल, ⇨ ल्यूकन आणि मॅनिलिअस ह्या लॅटिन कवींच्या साहित्यकृतींच्या आवृत्त्या प्रसिद्ध केल्या (१९०३–३०). मॅनिलिअस हा तसा फारसा मोठा कवी नव्हे परंतु फलज्योतिषावरील एका दीर्घकवितेने हाउसमनच्या आयुष्याची अनेक वर्षे व्यापली. ⇨ एस्किलस, ⇨ सॉफोक्लीझ आणि ⇨ युरिपिडीझ ह्यांच्या नाट्यकृतींतील उद्देशिकांची (ओड्स) त्याने भाषांतरे केली. हाउसमन परिपूर्णतावादी होता त्यामुळे अभ्यासात त्रुटी आढळल्या, की तो संतापत असे.
हाउसमन बालवयातच कविता करीत असे आणि कवी म्हणून त्याला कीर्तीही लवकर लाभली. कवी म्हणून ⇨ हाइन्रिख हाइन,⇨ विल्यम शेक्सपिअर आणि स्कॉटिश बॅलड ह्यांचा आदर्श आपल्या-पुढे आहे, असे तो म्हणत असे. १८९६ मध्ये श्रॉपशर लॅड हाआपला काव्यसंग्रह त्याने स्वखर्चाने काढला. त्याला अनुकूल प्रतिसाद मिळाला. लास्ट पोएम्स (१९२२) ह्या संग्रहाच्या प्रस्तावनेतच त्यानेकवी म्हणून निरोपाची भाषा केली होती. आपल्याला मिळालेला प्रत्येक सन्मान नाकारण्याची त्याची वृत्ती होती. आपल्या मृत्यूनंतर उच्च दर्जाच्याआपल्या कल्पनांना खऱ्या उतरतील अशाच कविता प्रसिद्ध करण्याची जबाबदारी त्याने लॉरेन्स ह्या आपल्या भावावर टाकली होती. लॉरेन्सने मोअर पोएम्स हा वेचक कवितांचा संग्रह १९३६ मध्ये प्रसिद्ध केला. १९४० मध्ये कलेक्टेड पोएम्स हे त्याच्या कवितांचे संकलन आणि १९७१ मध्ये त्याची पत्रे प्रकाशित झाली.
हाउसमन हा पारंपरिक पण मौलिक प्रतिभेचा कवी होता. त्याच्या कवितेचे अनुकरणही बरेच झाले. त्याच्या श्रॉपशर लॅडमधील मुले हातात नांगर धरतात, सॉकर खेळतात, कुस्त्या खेळण्यासाठी जत्रेला जातात, मद्य घेतात आणि फसव्या हृदयाच्या मुलींकडे प्रेमाची याचना करतात आणि प्रसंग आल्यास साम्राज्याच्या रक्षणासाठी युद्धावरही जातात. कवितेच्या बाबतीत तो फार सजग असे. काही कवितांना परिपूर्ण रूप देण्यासाठी त्यांच्या पहिल्या खर्ड्यांवर तो अनेक वर्षे संस्कार करीतराही. त्याच्या कवितेतून येणारा नैराश्याचा सूर आणि त्याच्या आईचेनिधन ह्यांत अवश्य काही नाते आहे. आपल्याला निष्प्रेम जीवन जगायचे आहे ह्या जाणिवेतूनच तो कवितेकडे अधिकाधिक वळत गेला. प्रेमाची क्षणभंगुरता, सौंदर्याचे अल्पजीवित्व आणि अत्यंत मर्यादित, छोटे असे मानवी जीवन हे विषय त्याच्या कवितांतून पुनःपुन्हा येतात.
हाउसमनने केलेली काव्यरचना खूप नाही त्याचा आवाकाही मर्यादित आहे तथापि आपल्या मर्यादांच्या चौकटीत त्याने इंग्रजी साहित्याला काही उत्कृष्ट भावकविता दिल्या.
केंब्रिज येथे तो मरण पावला.
राऊत, अमोल
“