हॅलिफॅक्स-२ :कॅनडाच्या नोव्हास्कोशा राज्याची राजधानी व याच नावाच्या परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,९७,९४३ (२०१३). हॅलिफॅक्स हे अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील बर्फमुक्त मुख्य नैसर्गिक बंदर असून ते सतत गजबजलेले असते. येथे अनेक गोद्या आहेत. येथे जहाजबांधणी व दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणात चालते.

 

हे शहर १७४९ मध्ये वसविण्यात आले. ब्रिटिश नौदलाने विविध युद्धावेळी मुख्य बालेकिल्ला म्हणून वेळोवेळी या शहराचा वापर केला. हवाई व नौदल तळ, गलबतावर मालाची चढउतार करण्याचे केंद्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शक म्हणून या बंदराने पहिल्या व दुसऱ्या जागतिक महायुद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. मासेमारीसाठी या बंदरातून गलबतांची मोठ्या प्रमाणात ये-जा चालते. व्यापारी मासेमारी मोठ्या प्रमाणात चालत असल्यामुळे येथे माशांवर प्रक्रिया करणारेकारखाने आहेत. याशिवाय येथे लोह व पोलादाच्या ओतभट्ट्या, साबण व पादत्राणे, विजेची उपकरणे, मद्य इ. निर्मितिउद्योग आणि तेल शुद्धीकरणाचे कारखाने आहेत. हे लोहमार्ग प्रस्थानक असून येथून देशभर महामार्ग जातात. हे कॅनडाचे अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरील पूर्वेकडील सैन्याचे मुख्य ठिकाण आहे.

 

येथे डलहौसी विद्यापीठ (१८१८), सेंट मेरी विद्यापीठ (१८४१), नोव्हास्कोशा तांत्रिक महाविद्यालय (१९०७) मौंट सेंट व्हिन्सेंट विद्यापीठ (१९१४) या शैक्षणिक संस्था आहेत. पॉइंट प्लिझंट पार्क, व्हिक्टोरिया पार्क, डार्टमथ कॉमन्स, सर स्टॅनफर्ड फ्लेमिंग पार्क ही येथील प्रेक्षणीय स्थळे आहेत.

कुंभारगावकर, य. रा.